श्री जगन्नाथ पुरी यात्रा - समारोप
आमच्या चार धाम यात्रेतील शेवटचा टप्पा -
श्री जगन्नाथ पुरी यात्रा - समारोप
दिवस 10 - दि. 14.12.2023
काल यात्रेच्या शेवटच्या दिवसाचे प्रवास वर्णन लिहिले असले तरी, समारोपाशिवाय प्रवास वर्णन पुरे होऊ शकणार नाही,. म्हणून आजचा हा लेखन प्रपंच ..
काल प्रयाग येथील संगमावरचे स्नान, मंदिर दर्शन इत्यादी गोष्टी झाल्यानंतर आम्हाला वेध लागले होते ते आजच्या परतीच्या विमान प्रवासाचे. विमान प्रवासात प्रत्येकाला केवळ 22 किलो पर्यंतच्या सामानाची मर्यादा असल्यामुळे खरेदी केलेले सामान बॅगेसह वजनाच्या मर्यादित कसे बसवायचे याचे...
सकाळी उठल्याबरोबर हॉटेलमध्ये असलेल्या वजन काट्यावर आपापल्या बॅगांचे वजन करीत, इकडचे सामान तिकडे, तिकडचे इकडे असे करत, काही अनावश्यक काढून टाकत सगळ्यांनी बॅगा भरल्या आणि दहा वाजता मी विमानतळाकडे कूच केले. एक वाजेचे विमान तीन वाजता आले. एवढा वेळ विमानतळावरच बसून इकडे तिकडे टाइमपास करणे एवढेच आमच्या हातात होते. जे काही थोडेफार खाऊचे पुडे उरले होते ते फस्त करत वेळ काढत होतो. विमानतळावरच अर्धा पाऊण तासाच्या छोटेखानी कार्यक्रमात सर्वांनीच यात्रेविषयी चे आपले अनुभव कथन केले आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्वानाच भूका लागल्या होत्या, पण विमानात एअर होस्टेस काहीतरी खायला देतील या आशेवर थांबलो होतो.. अखेर तीन वाजता विमान आले आणि आमची लगबग सुरू झाली. मोठ्या बॅगा तर अगोदरच गेल्या होत्या, हातातल्या बॅगा सावरत, सिक्युरिटी चे आदेश पाळत, विमाना पर्यंत घेऊन जाणाऱ्या बस मध्ये बसलो. 180 प्रवाशांचे विमान होते. विमानात बसल्यावर दहा मिनिटातच विमानाने मुंबईच्या दिशेने झेप घेतली. हवाई सुंदरी यांनी प्रथम सर्वांना सीट बेल्ट बांधण्याच्या सूचना, त्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत काय करावे याचे मार्गदर्शन (यांत्रिक) केले आणि त्यानंतर त्यांचे सर्वांना नाश्ता आणि चहापान वाटप सुरू झाले. आम्ही आशाळभूतपणे त्यांच्याकडे पाहत होतो. पण मग लक्षात आले की, आमच्या ग्रुपचे बुकिंगच विना नाश्ता-चहा सेवेचे झालेले होते. त्यामुळे एक तर विकत घ्या, नाहीतर गप्प बसा. याशिवाय पर्याय नव्हता. वीस रुपयाचा चहा शंभर रुपयांना आणि पन्नास रुपयाचा नाश्ता दोनशे रुपयाला घेणे नक्कीच परवडणारे नव्हते...
पाहता पाहता दोन तासात मुंबई दिसू लागली आणि काही मिनिटातच विमानाने मुंबई विमानतळावर आम्हाला सुखरूप उतरवले. पुन्हा बाहेर येऊन बॅगा ताब्यात मिळेपर्यंत जवळपास तासभर गेला, आणि त्यानंतर आम्हाला घ्यायला येणाऱ्या गाड्या उशिरा आल्याने, त्यांची वाट पाहण्यात तासभर गेला. येथे मात्र थोडेसे नियोजन चुकलेच. एक गाडी कमी बुक केल्याने सर्वांना दाटी-वाटीत बसून प्रवास करावा लागला. नाशिकच्या दिशेने लागल्यानंतर भिवंडीच्या आसपास जेवणासाठी थांबलो. जगदीश ची कालच्या वाढदिवसाची पार्टी बाकी होतीच, त्याने छान पैकी सर्वांना जेवणाची भेट दिली. दहा दिवसानंतर मिळालेल्या मराठमोळ्या मेनूला, बाजरीच्या भाकरीला आणि मिरचीच्या ठेच्याला, काळ्या मसाल्याच्या भाजीला सर्वांनीच दाद दिली आणि भुकेच्या सपाट्यात छान पैकी ताव मारला. संपूर्ण यात्रेतील आठवणींना उजाळा देत, एकमेकांना केलेल्या सहकार्याबद्दल आणि समजून घेतल्याबद्दल परस्परांचे आभार मानत आणि पुन्हा लवकर भेटण्याचे वारंवार आश्वासन देत सर्वांनी निरोप घेतला.
आणि अशा रीतीने आमच्या चारधाम यात्रेच्या या शेवटच्या धामाची यात्रा देखील अपेक्षेनुसार छान पार पडली, संस्मरणीय ठरली.
कुठलीही गोष्ट करायची असली तर ती एकमेकांच्या सहकार्याशिवाय पूर्ण होत नाही. यात्रेचे देखील असेच आहे. ग्रुप असल्यामुळे एकमेकांच्या बरोबर कठीण यात्रा देखील सहजपणे पार पाडली जाते. एकट्या दुकट्या कडून असे सहज शक्य नसते, आणि येथे तर आमचा ग्रुप म्हणजे सर्वच एकमेकाचे आधीपासून परिचित., एकाच विभागात काम केलेले, सोबत सेवानिवृत्त झालेले, एकमेकाच्या कुटुंबाविषयी माहिती व आस्था असलेले असल्यामुळे यात्रेत परकेपणा कधी जाणवलाच नाही. या ग्रुप मधील सर्व सहकारी, त्याचप्रमाणे या अगोदरच्या ग्रुप मधील सर्व सहकारी, जे या यात्रा ग्रुप मध्ये नव्हते, त्या सर्वांचे आणि ज्यांच्यामुळे आमची चारधाम यात्रा पूर्ण होऊ शकली, त्या मातोश्री ट्रॅव्हल्स चे संचालक श्री अरुण सूर्यवंशी (काका) आणि सौ शुभांगी ताई सूर्यवंशी यांचेबरोबरच त्यांच्या व्यवसायाचा पाठीचा कणा असलेले गौरव दादा आणि सुनबाई ऋतुजा यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद,
विशेष आभार सुनील दास्ताने व जगदीश सोनवणे यांचे. संपूर्ण यात्रेदरम्यान सामूहिक खर्चाच्या पैसे जमा करण्यापासून ते यात्रेदरम्यान सर्वांना चहा, नाश्ता, पाणी वेळेवर कसे मिळेल याची काळजी घेणे, खर्च करणे, हिशोब ठेवणे या सर्वांची जबाबदारी त्यांनी अगदी विनातक्रार, चोख पार पाडली त्याबद्दल सर्वांच्या वतीने त्या दोघांचेही खूप खूप आभार आभार..
या यात्रेदरम्यान मी माझ्याकडून सर्वांना संपूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न केला, सर्वांप्रती माझी कायम मदतीचीच भावना राहिली. तरी देखील, जाणते अजाणतेपणाने माझ्याकडून चेष्टेच्या भरात चुकून कोणाला काही बोलले असेल, कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मोठ्या मनाने माफ करावे.
पुन्हा एकदा मातोश्री ट्रॅव्हल्सला आणि चारधाम यात्रेतील सर्व सहकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि माझे हे प्रवास वर्णन येथेच संपवतो....
धन्यवाद...
जय हरी, जय शिवराय, जय महाराष्ट्र...
🙏🙏🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा