1. आमची श्री जगन्नाथ पुरी यात्रा

 आमच्या चार धाम यात्रेतील शेवटचा टप्पा - 

श्री जगन्नाथ पुरी यात्रा

 प्रवास दिवस 1 व 2  - 03/04.12.2023

दि 3.12.23 ला नाशिकहून रेल्वेने निघून, दि 5 ते 14 डिसेंबर या कालावधीत श्रीक्षेत्र जगन्नाथ पुरी, कोणार्क येथील सूर्य मंदिर, भुवनेश्वर चिल्का सरोवर, गंगासागर कलकत्ता शहर, हावडा ब्रिज इत्यादी करून पुढे गया, बोध गया त्यानंतर वाराणसी आणि शेवटी प्रयाग (अलाहाबाद) करून विमानाने मुंबईला परत. अशा ठरलेल्या नियोजना प्रमाणे तयारी करून सर्वजण तीन तारखेला रात्री साडेदहा वाजता स्टेशनवर जमले आणि साडेअकराच्या ट्रेनची वाट बघू लागले.  तीन यात्रांचा दांडगा अनुभव पाठीशी असल्यामुळे यावेळेस तयारीसाठी पाहिजे तेवढे टेन्शन किंवा काळजी नव्हती.  

सर्व सहज सहज तयार झाले. संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांची कृपा आणि श्री जगन्नाथ पुरी भगवान यांचा आशीर्वाद यामुळेच सौ शुभांगी सूर्यवंशी वहिनींची रजा आदल्या दिवशी मंजूर झाली आणि त्यांचे जोडीने आपल्या सोबत येणे नक्की झाले. त्याचप्रमाणे यावेळेस आमच्या सोबत  जुन्यातले तीन सहकारी कमी झाले. दोन जण ऐनवेळी काही कारणामुळे रद्द झाल्याने  त्यांच्या जागी श्री शांताराम शेलार आणि  सुनील कुलकर्णी या दोन जोड्या सामील झाल्या.  श्री जगदीश सोनवणे व श्री सूनील दास्ताने हे नुकतेच सेवानिवृत्त झालेले आमचे सहकारी, अशा एकूण बारा जोड्या, म्हणजे 24 जणांचा मोठा ग्रुप तयार झाला होता. निघताना नेहमीप्रमाणे सर्व बालगोपाल आम्हाला निरोप देण्यासाठी स्टेशनवर आले होते.   रात्रभर प्रवासात गेला.  

येथे एक उल्लेख मात्र करावा लागेल.  संगीतामध्ये जशी दोन गायकांची जुगलबंदी लागते,  तशी झोपलेल्या व्यक्तींमध्ये देखील अशी जुगलबंदी लागलेली अनुभवास  येत होती. फक्त जुगलबंदी होती ती  घोरण्यावरून. घोरण्याऱ्या प्रत्येकाचे काय ते वेगवेगळ्या आवाजातील, तालबद्ध संगीत. अहाहा sss...

त्यांना मात्र याची जरादेखील जाणीव किंवा आपल्या घोरण्यामुळे आपण इतरांना मात्र परेशान करत आहोत याचा थोडा देखील ना गम ना पस्तावा ...असो व्यक्ती तितक्या प्रवृत्ती...

प्रवासाचा आजचा दुसरा दिवस चार डिसेंबर.  आजचा देखील पूर्ण दिवस प्रवासाचा असल्यामुळे कोणालाच काही काम नव्हते.  आंघोळीचा प्रश्नच नव्हता . सकाळचे प्रातर्विधी आटोपल्यानंतर चहापाणी घेऊन सर्वजण गप्पा मारायला बसले.  अकरा वाजेच्या दरम्यान गाडीने नागपूर सोडले होते.  नेहमीप्रमाणे महिला वर्गाने आमच्याशी तात्पुरती फारकत घेऊन आम्हास मोकळे रान करून दिले. आम्ही देखील आज्ञाधारकाप्रमाणे भजन करण्यात आणि महिला वर्ग त्यांच्या गप्पा आणि गाण्यात रंगला.  बाहेरचे निसर्ग सौंदर्य न्याहाळत मार्गक्रमण सुरू होते.  विदर्भाचा हा भाग मुख्यत्वे करून पूर्ण जंगलांनी आणि खाणींनी समृद्ध आहे याचे प्रत्यंतर ते पाहत असतांना येते.  आर्थिक दृष्ट्या जरी या विदर्भाच्या भागाला लोक मागासलेला म्हणत असतील तरी देखील नैसर्गिक दृष्ट्या अतिशय संपन्न असा हा प्रदेश आहे . सगळीकडे भात म्हणजे धानाचीच शेती दिसून येत होती. कापणी झालेली दिसत होती. तिथून पुढे छत्तीसगड आणि नंतर ओरिसा राज्यात प्रवेश केला.  तोपर्यंत सायंकाळ झाली होती.  मधल्या काळात सहप्रवाशांशी गप्पा मारत त्यांच्या चालीरीती जाणून घेत, त्यांच्याकडून त्यांच्या भागाची माहिती वगैरे घेता घेता वेळ कसा गेला कळाले देखील नाही. संध्याकाळी साडेपाच वाजता बाहेर सगळीकडे अंधार झाला होता.  आपण जसजसे पूर्वेकडे जाऊ तसतसे सूर्योदय आणि सूर्यास्त लवकर असेल याची प्रचिती प्रत्यक्ष आली. रात्री देखील जेवण करून सगळे लवकर झोपले.  विशेष करून ओरिसा राज्यात प्रवेश केल्यानंतर गाडी अनेक ठिकाणी हळू व्हायची याचे कारण शोधले असता या भागामध्ये हत्तींचे प्रमाण जास्त आहे, आणि अनेकदा ते रेल्वे ट्रॅक वर आल्यामुळे गाड्यांची धडक बसून अपघात होण्याची शक्यता असते., त्यामुळेच ही काळजी घेतली जाते असे सांगण्यात आले. दिवसभरात केवळ प्रवासच असल्यामुळे आजच्या दिवसाचे वर्णन लिहिण्याचे काही विशेष असे कार्य मला देखील नव्हते...



🙏🙏🙏

टिप्पण्या

  1. Whenever I read your blogs , feels like I was the part of the trip !! Amazingly written sir !

    उत्तर द्याहटवा
  2. खूप खूप छान ग्रुप मिस झाल्याची खंत वाटते चांगल्या आनंदाला मुकलो

    उत्तर द्याहटवा
  3. अतिशय सुरेख प्रवास वर्णन जसं काही आपल्या सोबत प्रवास करत आहोत असे फिलींग येते एकदमच छान नाना 👌👌👌

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

2. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - , कोणार्क

4. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - गंगासागर