2. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - , कोणार्क
आमच्या चार धाम यात्रेतील शेवटचा टप्पा -
श्री जगन्नाथ पुरी यात्रा - श्री जगन्नाथ मंदिर, कोणार्क
दिवस 1 - 05.12.2023
पूर्वपार ऐकत आलोय की आयुष्यात एकदा तरी चार धाम यात्रा केली पाहिजे. ज्याची चार धाम यात्रा पूर्ण होते, त्याला मोक्ष मिळतो. सर्वांचीच ही यात्रा पूर्ण होते असेही नाही. अतिशय कठीण असते ही यात्रा. पूर्वीच्या काळी चारधाम यात्रेला मनुष्य निघाला, की तो परत येईल याची शाश्वती नसायची. त्यामुळे त्याला तशा पद्धतीने निरोप द्यायचे. परंतु हल्ली भरपूर सोयी झाल्यात. दळणवळणाची साधने खूप वाढली आहेत आणि ते सहज उपलब्ध देखील आहेत. त्यामुळे पूर्वी इतक्या यात्रा अवघड राहिल्या नाहीत. तरीदेखील एक अनामिक हुरहूर ही असतेच. जमेची बाजू ही की आमचे तीनही धाम पूर्ण झाले आणि त्यातल्या त्यात सोपे असलेले शेवटचे धाम सुरू करत होतो, त्यामुळे उत्साह शिगेला पोहोचलेला होता. या उत्साहात प्रसन्न वातावरणातच सकाळी आठ वाजेच्या दरम्यान श्री जगन्नाथ पुरी स्टेशनवर उतरलो. नेहमीप्रमाणे आम्हाला घेण्यासाठी गाडी हजर होतीच. गाडीतून लगेचच *हॉटेल स्विमिंग* या समुद्रकिनाऱ्यावरील सुंदरशा हॉटेलला पोहोचलो. सायंकाळी निवांत दर्शन घेता येईल असा विचार करून लगेचच नियोजनात बदल करून आम्ही कोणार्क येथील प्रसिद्ध सूर्य मंदिर येथे जाण्याचा बेत आखला आणि नाश्ता करून निघालो देखील. समोरच समुद्र होता . खूप खोलवर गेलेला त्याचप्रमाणे किनाऱ्यावर देखील त्याची खोली जाणवणारा आणि अवाढव्य लाटा घेत किनाऱ्यावर आपली दहशत वाजवणारा असा अरबी समुद्र वेगळाच वाटला. किनाऱ्या किनाऱ्याने चालता चालता गाडी कधी हम रस्त्याला लागली ते कळाले देखील नाही., आणि या गडबडीतच सौ शुभांगी वहिनींनी कधी माइक आणि सोबत सर्वांवर ताबा मिळवला हे समजले देखील नाही. त्यांची अध्यात्माची गोडी आणि त्याचा अभ्यास खरोखरच वाखण्यासारखा आहे. आपल्या सुंदर आवाजात त्यांनी भक्ती गीते आणि देवांची स्तुती पर कवणे म्हणायला सुरुवात केली आणि सर्वांची साथ देखील मिळवली. त्याने प्रेरित होऊन आमच्या या यात्रेत नवख्या असलेल्या सौ माधवी दास्ताने वहिनी, गोड स्वभावाच्या व शांत अशा सौ अवंती वाड वहिनी, आमच्या ग्रुप चे यात्रेतील धार्मिक गुरू ह भ प बाळासाहेब कोठुळे आणि स्वभावाने अबोल व धार्मिक प्रवृत्तीचे श्री संपतराव जाधव (साडू) यांनीही आपल्या स्वतंत्र गायनाने त्यांना साथ दिली. बाकी री ओढायला आम्ही सर्व होतोच. याने एक वेगळीच वातावरण निर्मिती होऊन एक नवी ऊर्जा प्रत्येकात भरते असा आमचा अनुभव आहे.
या सर्वात 30 ते 35 की मी चे अंतर तासाभरात कधी पार पडले, आणि आम्ही कोणार्क येथे कधी पोहोचलो ते समजले देखील नाही...
दुरूनच कोणार्कच्या प्रसिद्ध सूर्य मंदिराची छबी दिसली अन उत्सुकता ताणली गेली.
कोणार्क येथील सूर्य मंदिर हे ओडिशा राज्याच्या कोणार्क गावामध्ये तेराव्या शतकात बांधलेले हिंदू मंदिर असून याची निर्मिती राजा नरसिंहदेव (इ.स. १२३६ - १२६४) याने केली आहे. ते युनेस्कोचे एक जागतिक वारसा स्थान आहे. हे मंदिर पुरी पासून ३५ किमी तर भुवनेश्वर पासून ६५ किमी आहे.
मंदिराच्या वास्तुकलेविषयी आम्हाला गाईड ने भरपूर माहिती दिली.
प्रचंड आकाराची बारा चाके असलेला सूर्यरथ आणि त्याला जोडलेले सात घोडे अशी या मंदिराच्या स्थापत्याची एकमेव कल्पना आहे. प्रमुख मंदिराचा गाभारा त्याच्या पडझडीमुळे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मंदिराचे फक्त बाहेरूनच निरीक्षण करता येते. मंदिराच्यापुढे नटमंदिर हा स्वतंत्र मंडप आहे. या सर्वच वास्तू विविध शिल्पांनी सजलेल्या आहेत. येथील दरवाजांवर असलेले हत्ती, सिंह यांची शिल्पे देखील मोडक्या अवस्थेत आहेत. सूर्याच्या उपस्थितीत पडणाऱ्या सावलीनुसार अचूक वेळ दाखविणारी भव्य चक्र येथे आहेत. भव्य अश्या बारा खांबांवर त्या त्या महिन्यात सूर्याची किरणे पडतात असे म्हणतात,. किती जबरदस्त वास्तुकला आणि त्याचे अद्भुत प्रतिभावान शिल्पकार!!! केवळ अवर्णनीय...
येथे देवाचे बाल, युवा आणि वृद्धावस्था स्वरूप दर्शक काळ्या पाषाणातील (ग्रॅनाइट मधील) मूर्त्या आणि त्या अनुषंगाने विविध शिल्पे संपूर्ण मंदिरावर कोरलेली दिसतात. त्या काळातील उत्तम आणि प्रगत वास्तुकलेचा अप्रतिम नमुना पाहून थक्क व्हायला होते. या शिल्पाचे वर्णन करायला शब्द थिटे पडतात.
गाईड च्या सांगण्यानुसार या मंदिराचे पौराणिक महत्त्व पुढील प्रमाणे सांगितले आहे.
हे मंदिर सूर्य देव यांना समर्पित होते, ज्यांना स्थानिक लोक 'बिरंचि-नारायण' म्हणून संबोधत असत. या कारणामुळे, या प्रदेशास अर्क-क्षेत्र (अर्क=सूर्य) किंवा पद्म-क्षेत्र म्हटले गेले. पुराणानुसार भगवान श्रीकृष्णाचा मुलगा सांब यांना त्याच्या शापामुळे कुष्ठरोगाचा त्रास झाला होता. सांब यांनी मित्रवन येथील चंद्रभागा नदीच्या समुद्राच्या संगमावर कोनार्कमध्ये बारा वर्षे तपश्चर्या केली आणि सूर्य देवाला प्रसन्न केले. सूर्यदेव, सर्व रोगांचा नाश करणारा होता. सूर्यदेवांने सांबचा आजार बरा केला होता. त्यानुसार सांबने सूर्य देवाचे मंदिर बांधायचे ठरवले. सांब यांचा आजार बरा झालानंतर, चंद्रभागा नदीत स्नान करून त्यांना सूर्यदेवाची मूर्ती सापडली.
ही सूर्यदेवाची मूर्ती शरीराच्या त्याच भागातून देवशिल्पी श्री विश्वकर्मा यांनी बनविली होती. सांब यांनी आपल्या बांधलेल्या मित्रवनमधील मंदिरात ही मूर्ती स्थापित केली, तेव्हापासून हे स्थान पवित्र मानले गेले.
अतिशय उत्तम अशी कलाकृती पाहिल्याचा आनंद मनात आणि नजरेत साठवत, बरेचसे फोटो काढत तेथून निघालो. परतीच्या वाटेवर चंद्रभागा नदी व सागराच्या संगम क्षेत्रात किनाऱ्यावर वाळू - शिल्पाचे प्रदर्शन भरले होते, ते पाहण्याची संधी मिळाली. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ओडीसा येथील सुप्रसिद्ध वाळू शिल्पकार श्री सुदर्शन पटनायक यांच्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या शिल्पांना प्रत्यक्ष तयार होत असतांना पाहण्याचा अनुभव विलक्षण होता. विध्यार्थ्यांना वाळुत लीलया विविध आणि आकर्षक अशा कलाकृती साकारतांना पाहून आश्चर्यचकीत व्हायला होते.
वाळू शिल्प प्रदर्शन बघून चार धाम पैकी एक असलेल्या श्री जगन्नाथ पुरी येथील प्रसिद्ध मंदिरास भेट व दर्शनासाठी निघालो..वाटेत एका ठिकाणी चहासाठी थांबलो. तेथे एकाची नवी बुलेट गाडी उभी होती. तिचा मी मनस्वी चाहता असल्याने मी लगेच तिच्यावर बसून फोटो काढला, सोबत सौ ना घेऊन जोडीचा फोटो काढला, अन मग काय सांगू ... सर्वांनीच जोडीने बुलेटवर बसून फोटोची हौस करून घेतली. गाडीचा मालक देखील खुश,. माझ्या गाडीचा इतका सन्मान म्हणून. असो, मानवी स्वभावच हा अनुकरणप्रिय आहे.
पुढे सायंकाळच्या सुमारास पुरीत पोहोचलो. अपेक्षेप्रमाणे गर्दी भरपूर होती...आपण नेहमी दूरदर्शनवर पुरीचा जो यात्रा महोत्सव पाहतो, त्याच 2 ते 3 किमी रस्त्यावरून आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो.
या मंदिराविषयी बऱ्याच कथा-दंतकथा ऐकल्या असल्याने ते सर्व प्रत्यक्ष पाहण्याचा दांडगा उत्साह आणि कुतूहल होते.
उदा. मंदिरावरील ध्वज हवेच्या विरुद्ध दिशेने फडकतो, मंदिरावरून कोणताही पक्षी अगर विमाने इत्यादी फिरकत नाहीत, मंदिराच्या कळसावर असलेले सुदर्शन चक्र कोणत्याही दिशेने पाहिले तरी ते सरळच दिसते, मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर समुद्राचा आवाज बंद होतो, तिसऱ्या पायरीवर पाय देऊ नये इत्यादी इत्यादी...
जगन्नाथपुरीलाच श्रीक्षेत्र, पुरुषोत्तमक्षेत्र अशी अन्य नावेही आहेत. जगन्नाथपुरी मंदिरामध्ये श्री जगन्नाथ, श्री बलभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत. जगन्नाथ मंदिराची रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यात होते. त्यावेळी मूर्ती विराजमान झालेला प्रचंड वजनाचा लाकडी रथ ओढायला शेकडो माणसे लागतात. (म्हणून फार मोठे काम करणे याला जगन्नाथाचा रथ ओढणे असे म्हणतात,)
या मूर्ती लाकडाच्या असून दर १२ वर्षांनी त्या बदलल्या जातात. परंतु रथयात्रा आषाढ महिन्यात होत असल्याने जेव्हा अधिक आषाढ महिना येतो तेव्हाच नवीन मूर्ती घडवून जुन्या मूर्ती बदलतात. त्यामुळे कधीकधी मूर्ती बदलण्यास १२हून अधिक वर्षे लागू शकतात. देवळासमोरील अरुण स्तंभाची स्थापना मराठ्यांच्या राजवटीत झाली.
वर उल्लेख केलेल्या दंतकथांपैकी हवेच्या विरुद्ध दिशेने फडकणारा ध्वज, कोणत्याही दिशेने पाहिले असता सरळ दिसणारे सुदर्शन चक्र, समुद्राच्या पाण्याचा आवाज यांचा आम्ही मागोवा घेतला, आणि त्यातली सत्यता प्रत्ययास आली. अतिशय आश्चर्यकारक गोष्टी आहेत या... दुसऱ्या प्रयत्नात मनसोक्त दर्शन झाल्यानंतर तेथील प्रसादालयाची पाहणी केल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. मंदिरामध्ये मोबाईल ला परवानगी नसल्यामुळे कोणालाही काही फोटो काढता आले नाहीत.
येथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे येथील विक्षिप्त पुजारी. लोकांना देवाच्या मूर्तींचे सहज दर्शन होऊ दिले जात नाही. दर्शनासाठी जबरदस्तीने दक्षिणा टाकण्याचा आग्रह केला जातो. हातातील दक्षिणा अक्षरशः ओढून घेतली जाते. जे दक्षिणा देतील त्यांनाच व्यवस्थित दर्शन करू दिले जाते, इतरांना मात्र हिडीस फिडीस करून पुढे ढकलले जाते कटू असले तरी हे सत्य आहे, आम्ही प्रत्यक्ष अनुभवले. यामुळे एवढया दूरवर येऊन श्री जगन्नाथाचे झालेले दर्शनाचा आनंद, तर दुसरीकडे पुजाऱ्यांची विक्षिप्त वागणूक अशा संमिश्र मनस्थितीत बाहेर पडलो. येथे परत खरेदीच्या नादात मागे पुढे झाल्याने शेलार काका-काकूंची व आमची ताटातूट झाली, थोड्याश्या गोंधळानंतर पुन्हा एकदा सर्व एकत्र आलो आणि हॉटेलवर परतलो...
ज्या प्रकारे सर तुम्ही तुमच्या सोबतच्या प्रवाश्यांचे वर्णन करता , त्या सर्वाना भेटायची उत्सुकता वाटते !!
उत्तर द्याहटवा🙏🙏🙏
हटवाहुबेहुब वर्णन मस्त
उत्तर द्याहटवापुढच्या लेखाची आतुरता
🙏🙏🙏
हटवा