4. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - गंगासागर
आमच्या चार धाम यात्रेतील शेवटचा टप्पा -
श्री जगन्नाथ पुरी यात्रा - गंगासागर
दिवस 3 - दि. 07.12.2023
सकाळी आठ वाजेच्या आसपास रेल्वेने शालिमार (कलकत्ता) येथे पोहोचलो. या ठिकाणी पावसानेच आमचे स्वागत केले., त्यामुळे पुढील प्रवासासाठी निघायला आम्हाला जवळपास एक तास उशीर झाला. सकाळी हॉटेल मिळणार नसल्यामुळे आम्ही परस्पर गंगासागर ला जाण्याचा निर्णय घेतला . कलकत्ता शहरातून बाहेर पडून गंगा, अर्थात हुबळी नदी (स्थानिक भाषेत - हूगळी नदी) च्या किनाऱ्या किनाऱ्याने डायमंड हार्बर रोड ने दक्षिणेस जवळपास 90 किलोमीटरचे अंतर पार केले. जवळच्या खाऊचा नाश्ता करीत आणि रस्त्यात एका ठिकाणी चहापानाचा आनंद घेत गाण्यांच्या भेंड्या खेळत मजेत वेळ गेला.
या आनंदाचे मूळ कारण होते ज्या यात्रेसाठी आलो आहे, पहिल्या दिवशीच त्या जगन्नाथाचे दर्शन झाल्यामुळे यात्रेचा मूळ हेतू सफल झालेला होता. आणि हा आनंद अनाहूतपणे सौ शुभांगी वहिनींच्या स्वरचित पुढील गाण्यातून उत्स्फूर्तपणे व्यक्त झाला आणि मग सर्वांनी त्यांच्या मागे त्या गाण्याची री ओढली.
गंगासागरच्या दर्शनाला जायाचं जायाचं.... आनंद पोटात माझ्या माईना माईना .... आनंद पोटात माझ्या माईना.
गेलो जगन्नाथ पुरीला थेट... घेतली कृष्णाची भेट घेतली कृष्णाची भेट..... घेतली कृष्णाची भेट.
या या डोळ्याची.... या या डोळ्याची हौस पुरी होईना होईना.... आनंद पोटात माझ्या माईना ..माईना... आनंद पोटात माझ्या माईना....
जमला माणसांचा मेळ....झाली बोटीची येळ.... झाली बोटीची येळ....
या या सागराला... या या सागराला भरती काही येईना येईना .... गंगामाई दर्शन काही देईना ..देईना .... गंगामाई दर्शन काही देईना अन आनंद पोटात माझ्या माईना....
धरिले मातोश्रीचे बोट, झाली चार धामांची भेट. झाली चार धामांची भेट... या या डोळ्यांची...या या डोळ्यांची हौस काही होईना. होईना. अन आनंद पोटात माझ्या माईना...
अशा प्रकारे आनंदी मनाने आणि उत्साहाने आम्ही काकद्वीप बेटावरील हारवूड पॉईंट पर्यंत पोहोचलो. समुद्राला ओहोटी सुरू असल्यामुळे बोटीसाठी अपेक्षित पाणी पातळी नव्हती, ती येण्याकरता जवळपास एक तास वाट बघावी लागली. नंतर बोट सुरू झाली. एका बोटी ने (फेरी ने) गंगासागरच्या उत्तर टोकाला असलेल्या कचुबेरियापर्यंत समुद्रातून 3.5 किमी अंतर पार केले.
बोटीतील प्रवास थोडासा असला तरी अतिशय आनंददायी होता. बोटीच्या सभोवताली सी बर्ड्स अर्थात समुद्र पक्षी थव्याने घिरट्या घालत होते, पर्यटकांनी दिलेला खाऊ हवेतल्या हवेत फस्त करत होते, किंवा पाण्यावर वरच्या वर लिलया उचलत होते. आपल्या अतिशय जवळून उडतांना पाहणे आणि त्यांचा आवाज ऐकणे अतिशय मनोरंजक होते. संपुर्ण दृश्यच अतिशय मनोहारी होते.
त्यानंतर तेथून गंगासागर येथील तीर्थक्षेत्रापर्यंत सुमारे 32 किमी चा प्रवास खाजगी कार (ऑटोरिक्षा) किंवा बस ने करावा लागतो. या प्रवासा दरम्यान ठिकठिकाणी छोटी छोटी गावे आहेत. संपूर्ण बेटाची लोकसंख्या ही जवळपास 12 हजाराच्या आसपास असल्याचे सांगितले जाते.
सागर बेटावरील गंगासागर हे हिंदू तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी गंगा बंगालच्या उपसागरात प्रवेश करते. त्यामुळे या संगमाला गंगासागर असेही म्हणतात. कुंभमेळ्याच्या नंतर गंगासागर तीर्थक्षेत्र यात्रा ही भारतातील सर्वात मोठी यात्रा मानली जाते असे म्हणतात.
सागर बेट हे गंगा डेल्टा (त्रिभुज प्रदेश) मधील एक बेट असून पश्चिम बंगाल राज्यातील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील काकद्वीप उपविभागात सागर नावाने ओळखले जाते. जरी सागर बेट हा सुंदरबनचा एक भाग असला तरी , एकूण सुंदरबन डेल्टाच्या वैशिष्ट्याप्रमाणे त्यात वाघांची वस्ती किंवा खारफुटीची जंगले किंवा लहान नदी, उपनद्या नाहीत. हे बेट हिंदू तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी (14 जानेवारी), लाखो हिंदू, गंगा नदी आणि बंगालच्या उपसागराच्या संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी आणि कपिल मुनी मंदिरात प्रार्थना ( पूजा ) करण्यासाठी जमतात.
दिवसातील 2 तास वाया गेल्यामुळे वेळेचे गणित चुकेल की काय या भीतीने खूप धावपळ करावी लागली. स्नान करायचे नाही फक्त हाथ पाय धुवून लगेच माघारी फिरू अशी चर्चा होते नाही तोपर्यंत आम्ही संगमावर पोहोचलो देखील., आणि मगच पुढचा विचार न करता सर्वानी पटापट डुबक्या मारल्या देखील. ज्यासाठी एवढ्या लांबवर आलो, ते न करता परतणे कोणाच्याच मानस पटलं नाही. घाईने संगमावर स्नान उरकून, कपिल मुनींच्या मंदिराचे दर्शन घेऊन पुन्हा शेवटची बोट पकडण्यासाठी रिक्षाने निघालो., अन्यथा बेटावरच मुक्काम करावा लागला असता. धावपळ करत शेवटची बोट आम्हाला मिळाली हायसे वाटले. मग बोटीमध्येच जवळचा खाऊ खात, फोटोग्राफी करत पुन्हा काकद्वीपावरील फॉरवर्ड पॉईंट ला येऊन, तेथून आमच्या बसमध्ये कलकत्त्यासाठी परत निघालो. साधारणतः रात्री नऊ वाजेच्या दरम्यान आम्ही कलकत्त्याच्या हॉटेल दि फर्न येथे पोहोचलो. हे सर्व शक्य झाले ते सूर्यवंशी काकांच्या यशस्वी व्यवस्थापन कौशल्याने आणि समयसूचकते मुळे. अन्यथा आजचे हे नियोजन बारगळले असते. आता जाणवले की
सारे तीरथ बार बार - गंगासागर एक बार
असे का म्हणतात ते....
खुपच सुंदर
उत्तर द्याहटवा🙏🙏🙏
हटवाअतिशय सुंदर... प्रभावी लेखन आणि छान प्रवासवर्णन.
उत्तर द्याहटवा🙏🙏🙏
हटवागीताची चाल काय आहे . ऐकायला आवडेल.
उत्तर द्याहटवाखूप छान प्रवास वर्णन
उत्तर द्याहटवा