9. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - काशी (वाराणसी) - 2

 आमच्या चार धाम यात्रेतील शेवटचा टप्पा -   

श्री जगन्नाथ पुरी यात्रा - काशी (वाराणसी) - 2

दिवस 8 - दि. 12.12.2023

वाराणसीत घाटावर सफारी

श्री जगन्नाथ पुरी यात्रेच्या प्रवासातील आजचा आठवा दिवस.

 काल सुप्रसिद्ध श्री काशी विश्वेश्वराचे दर्शन झाल्यामुळे आज उर्वरित काशी शहर , घाट,  मंदिरे इत्यादी बघायचे होते.  त्यानुसार सकाळी लवकर निघून आम्ही सुप्रसिद्ध असे बनारस हिंदू विश्वविद्यालय बघण्यासाठी गेलो.  अतिशय भव्य दिव्य असा परिसर आहे. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र विभाग, त्याची स्वतंत्र इमारत आणि विस्तीर्ण असा परिसर.  ज्ञानार्जनासाठी जे वातावरण अपेक्षित असते ते येथे पुरेपूर जाणवते.

बनारस हिंदू विद्यापीठ (BHU) हे बनारसमधील एक केंद्रीय विद्यापीठ आहे . विद्यापीठाची स्थापना महान पंडित मदन मोहन मालवीयजी यांनी 1916 मध्ये केली होती.  आज देशातील अग्रगण्य अशा संस्थांमध्ये या  विद्यापीठाला उच्च दर्जा प्राप्त आहे.

विद्यापीठाच्या आवारात विश्वनाथजींची अनेक मंदिरे आहेत. त्यातल्याच एका सुंदर अशा पुरातन मंदिराचे आम्ही दर्शन घेतले.

पुढे रस्त्यात प्राचीन, प्रसिद्ध असे भारत माता मंदिर लागते, ते पाहण्यासाठी थांबलो. 

भारत माता मंदिर हे महात्मा गांधी काशी विद्यापीठ (वाराणसी) च्या आवारात आहे . हे डॉ. शिवप्रसाद गुप्ता यांनी बांधले आणि गांधीजींनी 1936 मध्ये त्याचे उद्घाटन केले . या मंदिरात कोणत्याही देवाचे किंवा देवीचे चित्र किंवा मूर्ती नाही, परंतु जमिनीवर संगमरवरी कोरलेला अविभाजित भारताचा 3D भौगोलिक नकाशा आहे . या नकाशात पर्वत, पठार, नद्या आणि महासागर हे सर्व चांगले दाखवले आहे.

 येथून पुढे  सारनाथ या ऐतिहासिक स्थळी गेलो. 

वाराणसी जिल्ह्यात, वाराणसी शहरापासून १३ किमी अंतरावर गंगा व गोमती नदींच्या संगमावर स्थित सारनाथ येथे भगवान गौतम बुद्धांनी सर्वप्रथम धम्मचे प्रशिक्षण दिले होते असे सांगण्यात येते. येथे  गौतम बुद्धांची 85 फूट उंच भव्य मूर्ती हे प्रमुख आकर्षण आहे.  त्याचप्रमाणे सारनाथ संग्रहालय देखील प्रसिद्ध आहे. अनेक वास्तूंची, शिल्पांची पडझड झाल्याने केवळ अवशेष शिल्लक आहेत, किंवा या जागेवर अमुक अमुक होते असा केवळ बोर्ड लावलेला. त्यामुळे आणि वेळेअभावी आम्ही संग्रहालय पाहणे टाळले आणि पुढे निघालो. 

बस नमो घाटाजवळ लावून रिक्षाने आम्ही शहरातील बाजारपेठेत आलो.  बनारसी साड्यांची खरेदी करायची म्हटल्यावर महिला वर्ग अतिशय खुशीत होता.  सूर्यवंशी काकांच्या ओळखीने  एका दुकानात खरेदीसाठी पोहोचलो.  आधीच उल्लेख केल्याप्रमाणे येथील गल्ल्या अतिशय अरुंद आणि दुकानेही जुन्या वाड्यांच्या वेगवेगळ्या मजल्यावर  आहेत. खालून बघितलं तर येथे दुकान आहे हे समजत देखील नाही. कुठलाही झगमगाट किंवा प्रदर्शन नाही,  साड्या गाठोडयात बांधून ठेवलेल्या.  आत दुकानात जायचं म्हणजे अलिबाबाची गुहाच होती. कोणत्या रस्त्याने मध्ये गेलो आणि कुठून बाहेर पडायचे तेच कळत नव्हते. असो, आता खरेदी म्हणजे किमान दोन तास तरी जाणार म्हटल्यावर, दुकानातच एका बाजूला आमच्यापैकी काहींनी साड्यांच्या गाठोड्यांवरच मस्तपैकी ताणून दिली.  जाणकार आणि रसिक असलेले शेलार काका, जगदीश सोनवणे, कुलकर्णीजी, शिवाजीराव हे मात्र हिरीरीने महिला वर्गाच्या सोबतीने खरेदीसाठी पुढे बसले होते.  धनंजय मात्र मारून मुटकून बसवल्यासारखा एका कोपऱ्यात वहिनींच्या मागे मम म्हणायला बसला होता.  दोन तास झाले तरी खरेदी आटोक्यात येईना, म्हटल्यावर आम्हीच घाई करून, खरेदी अर्धवट ठेवून घाटावर जाण्यासाठी निघालो.  (अर्थात उर्वरित खरेदी पूर्ण करण्यासाठी दुकानदार रात्री हॉटेलवर येणार होता).

वाराणसीतील घाट हे गंगा नदीच्या काठावरील भूषण. शहरात 84 घाट आहेत. बहुतेक घाट हे स्नान आणि पूजा विधींचे घाट आहेत, तर मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र या दोन घाटांचा उपयोग केवळ अंत्यसंस्कारासाठी केला जातो . 

दशाश्वमेध घाट हा विश्वनाथ मंदिराजवळ असून सर्वात लोकप्रिय घाट आहे.  पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने येथे दहा अश्वमेध यज्ञ केले. दररोज संध्याकाळी या घाटावर शिव, देवी गंगा, सूर्य, अग्नी, तसेच संपूर्ण विश्वाला समर्पण म्हणून आरती केली जाते.

आम्ही देखील एका बोटीवर बसून नदीतूनच  सर्व घाटांचे दर्शन घेत या घाटापर्यंत पोहोचलो.  बोटीत बसूनच आरतीचा आनंद घेतला आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. पुन्हा नमो घाटात जवळ येऊन पोहोचलो. येथील एक पुल खरोखरच विज्ञानाच्या प्रगतीचा दर्शक आहे. खाली नदीतून बोटीने वाहतूक, त्यावर पुलाच्या पहिल्या मजल्यावर रेल्वेची वाहतूक, व त्याच्यावर दुसऱ्या मजल्यावर मोटार गाड्यांची वाहतूक.  एकाच वेळेस तीनही ठिकाणाहून वाहने जाताना पाहताना वेगळाच आनंद येतो..

उशीर बराच झाल्यामुळे लगेचच आमच्या बसने हॉटेलवर येऊन पोहोचलो. 



विश्वेश्वर मंदिर

मनकर्णिका घाट






खरेदी दरम्यान निवांत क्षणी
भारत माता मंदिर
सारनाथ येथील बुध्द मूर्ती




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1. आमची श्री जगन्नाथ पुरी यात्रा

2. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - , कोणार्क

4. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - गंगासागर