8. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - काशी - 1

     आमच्या चार धाम यात्रेतील शेवटचा टप्पा -   

श्री जगन्नाथ पुरी यात्रा - काशी (वाराणसी) - 1

दिवस 7 - दि. 11.12.2023




आमच्या जगन्नाथ पुरी यात्रेचा आजचा सातवा दिवस आज गया येथून निघून आम्ही वाराणसी येथे जाणार जवळपास अडीचशे किलोमीटरचे हे अंतर असल्यामुळे आजच्या दिवसात प्रवासाचा अधिक असणार हे नक्की त्यामुळे सकाळी लवकर निघालो दिल्ली कलकत्ता हायवे वर एका गावात  माता चंडी देवी चे मंदिर आहे . येथे दर्शनासाठी थांबलो. 

बिहारच्या सासाराम जिल्ह्यातील कलकत्ता दिल्ली हायवे वरील माँ तारा चंडी पीठ हे भारतातील 52 पीठांपैकी सर्वात जुने आहे.

असे मानले जाते की, पुराणानुसार भगवान शिवाची पत्नी सतीने,  आपल्या धन्याचा अपमान झाल्यामुळे  वडिलांचे घर सोडले व आत्मदहन केले. तेव्हा भगवान शिव क्रोधाने सतीचा मृतदेह उचलून भयंकर तांडव नृत्य करू लागले.  ह्या मूळे जगाच्या विनाशाचा धोका निर्माण होऊ लागला. भगवान विष्णूने जगाला वाचवण्यासाठी त्यांच्या सुदर्शन चक्राने सतीच्या मृत शरीराचे तुकडे तुकडे केले. ते सर्व भाग भारतीय उपखंडात वेगवेगळ्या ठिकाणी पडले. या सर्व ठिकाणांना ‘शक्तीपीठ’ म्हणतात. सर्व पीठे हिंदूंसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात. देवी सतीचा उजवा डोळा माँ तारा चंडीच्या या पिठाच्या स्थानी पडला होता असे मानले जाते. 

भक्ती भावाने दर्शन घेऊन पुढे निघालो. रस्त्यात महिला वर्गांच्या गाण्यांच्या भेंड्या तर पुरुषांचे हरी हरी भजन चालले होते. आजूबाजूच्या दृष्य न्याहाळत मार्गक्रमण सुरू होते.  बिहार संपून उत्तर प्रदेश कधी सुरू झाले ते कळाले देखील नाही.

साधारणतः एक वाजेच्या दरम्यान आम्ही वाराणसी मध्ये प्रवेश करून सुंदरपुर भागातील आमची निवास व्यवस्था असलेल्या हॉटेल उदय पॅलेस ला पोहोचलो व ताजेतवाने होऊन लगेचच काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी बाहेर पडलो. 

मी जवळपास 40 वर्षांपूर्वी बघितलेले बनारस आणि आजचे वाराणसी यात जमीन अस्मान चा फरक दिसत होता. ठिकठिकाणी उभारलेले आणि उभारण्यात येत असलेले मोठमोठे उड्डाणपूल पूल दिसत होते.  बऱ्यापैकी सुधारणा दिसत होत्या. 

आमच्या प्रवासी संस्थेच्या संचालिका सौ शुभांगी ताई यांच्या बहिण विश्व मांगल्य सभा या संस्थेसाठी कार्य करत असून त्या काशी येथे एका विशेष प्रकल्पावर कार्य करत आहेत.  त्यांच्याच आग्रहावरून आम्ही येथील एकमेव असलेल्या श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेलो. 

विश्व मांगल्य सभेने ब्रह्मा घाटावर असलेला नाना फणनवीस यांचा वाडा व परिसर ताब्यात घेतला आहे. पंढरपूरची विठ्ठल मंदिर प्रतिकृती या आवारात उभारण्याचे काम जानेवारीपासून सुरू होणार आहे. सध्या या परिसराचे नूतनीकरण केले जात आहे. याच वाड्याच्या परिसरात देशभरातील महिलांसाठी एक गेस्ट हाऊसही बांधण्यात येणार आहे. गरजूंसाठी येथे मोफत प्रसादालाय अर्थात अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. आम्हाला देखील येथे गरम गरम प्रसादाचा लाभ मिळाला प्रसाद तयार होईपर्यंत गाणे व भजनाचा आस्वाद सर्वांनी घेतला. 

 येथून काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी निघालो. काशी अर्थात बनारस /वाराणसी या नावाने ओळखले जाणारे हे शहर.  बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे श्री काशी विश्वेश्वराचे प्रसिद्ध आणि अत्यंत पवित्र असे मंदिर येथे आहे. या शहरात सुमारे १६५४ मंदिरे आहेत. त्यामुळे यास मंदिराचे शहर असेही म्हणतात. त्यात प्रमुख मंदिर काशी विश्वेश्वराचे दर्शन घेण्याआधी धुंडीराज किंवा ढुंढीराज विनायकाचे दर्शन घेण्याचा येथे प्रघात आहे. या मंदिराचे सभोवताली अष्ट दिशांचे अष्टविनायक आहेत. 

कैलासावर भस्म फासून रहाणाऱ्या शंकराची सर्व टिंगल करावयाचे म्हणून पार्वतीने 'मला कुणी चिडविणार नाही अश्या ठिकाणी घेऊन चला' अशी विनंती शंकराला केली. त्यामुळे शंकर येथे येऊन राहू लागले, अशी येथील आख्यायिका आहे.

काशी विश्वनाथाचे मुख्य मंदिरात मुख्य पिंड गाभाऱ्याचे एका टोकाला आहे. त्यावर गंगाजल व बिल्वपत्रे वाहण्यात येतात. ते काळ्या पाषाणाचे व सोन्या-चांदीने मढविले आहे. तेथे दर्शन घ्यावयाचे तर, तीन हार न्यायची पद्धत आहे. एक हार शंकराला, दुसरा पार्वतीला तर तिसरा हार तेथील पूजारी त्या भक्ताचे गळ्यात घालतो. अर्थात हे सर्व आधी माहिती नसल्याने आम्ही साधे सरळ दर्शन घेतले. 

 १६ व्या शतकात येथेच संत एकनाथांनी " श्रीएकनाथी भागवत" हा वारकरी सम्प्रदायाचा महान ग्रंथ लिहीला. येथेच याची हत्तीवरून मिरवणूक निघाली., असे सांगितले जाते. 

आमच्या जुन्या नाशिक प्रमाणे येथेही काशीच्या अनेक भागात जुनेच वाडे आणि बारीक गल्ल्याबोळी अजूनही तशाच आहेत. अतिशय अरुंद रस्ते आहेत. नुकतंच काही वर्षांपूर्वी शासनाने केलेल्या कॉरिडॉरमुळे मंदिर व घाटाच्या परिसरातील रस्ते बऱ्यापैकी मोठे केले आहेत व तेथे सुधारणा दिसून येत आहेत. फारशी गर्दी नव्हती त्यामुळे अर्धा ते एक तासात आमचे छान पैकी दर्शन झाले एवढ्या दूरवरून आल्याचे चीज झाले. पुजाऱ्याने गळ्यात हार घातल्यावर तर अधिकच धन्य झाल्यासारखे वाटले. (अर्थात दक्षिणा ठेवल्यानंतर)

मंदिरात फोटोग्राफी साठी मनाई असल्यामुळे कोठेही फोटो काढता आले नाही. 

काशी विश्वेश्वराच्या दर्शनानंतर काशीचा कोतवाल समजला जाणाऱ्या श्री कालभैरवाचे दर्शन घेणे क्रम प्राप्त असते.  त्यामुळे परत त्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. 

उशीर झाला असल्यामुळे दर्शन झाल्यानंतर लगेचच हॉटेलवर परतलो.  रात्रीच्या जेवणानंतर बनारसी पानाचा आस्वाद घेण्यास मात्र विसरलो नाही.











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1. आमची श्री जगन्नाथ पुरी यात्रा

2. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - , कोणार्क

4. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - गंगासागर