7. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - गया, बोधगया

 आमच्या चार धाम यात्रेतील शेवटचा टप्पा -   

श्री जगन्नाथ पुरी यात्रा - गया, बोधगया

दिवस 6 - दि. 10.12.2023



आजचा यात्रेचा सहावा दिवस.  आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान बिहारमधील गया स्थानकावर पोहोचलो. आमचे मुक्कामाचे ठिकाण येथून 11 किलोमीटर अंतरावर बोधगया येथे असल्याने बसमध्ये हॉटेलवर (हॉटेल जातका ) पोहोचलो आणि आवरून लगेच परत गया येथे जाण्यास निघालो.

गया हे बिहार राज्यामधील जिल्ह्याचे मुख्यालय व पाटणा खालोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. गया शहर पाटणाच्या १०० किमी दक्षिणेस फल्गू नदीच्या काठावर वसले असून ते हिंदू, बौद्ध व जैन धर्मीयांसाठी एक पवित्र स्थान आहे. अंदाजे 5 लाख लोकसंख्येच्या या शहरात हिंदीसोबतच येथे मगधी ही भाषा देखील वापरली जाते.

आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आपण आपल्या हिंदू धर्माप्रमाणे त्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करून त्याला मोक्ष प्राप्ती व्हावी यासाठी धार्मिक पवित्र अशा ठिकाणी जाऊन त्याचे पिंडदान करतो. अशा या ठिकाणांमध्ये गया हे स्थान सर्वोच्च मानले गेले आहे.

गया भूमीला मोक्षभूमी देखील म्हणतात. असे म्हणतात की, स्वतः भगवान रामांनीही माता सीतेसोबत या गयाक्षेत्री 3 दिवस मुक्काम करून, आपले पिता राजा दशरथ यांचे फाल्गु नदीच्या काठावर पिंडदान केले, त्यानंतरच दशरथ राजाला स्वर्गप्राप्ती झाली.  या फाल्गु नदीच्या काठावरच भगवान विष्णूचे विष्णुपद मंदिर  उभे आहे.

आम्ही सर्वांनी देखील या ठिकाणी पूर्ण श्रद्धेने आपल्या सर्व  मृत पूर्वजांचे विधिवत श्राद्ध कर्म करून पिंडदान केले,. त्यानंतर भगवान विष्णूचे दर्शन घेऊन अतिशय मोकळ्या आणि प्रसन्न मनाने येथून निघालो. 

आपल्या सर्व पूर्वजांचे नातेसंबंध, त्यांची पूर्ण नावे आपल्याला माहीत नसतात. या पूजा विधीच्या वेळी जेव्हा पुरोहित आपल्याला ती नावे घेऊन पिंडदान करायला लावतात, त्यावेळी आपली तारांबळ उडते.  लगेचच दुसऱ्या आप्तेष्ठांना फोन लावून ती नावे विचारण्याची आमची लगबग पाहण्यासारखी होती., (सोय आहे म्हणून), पण अंतर्मुख करणारी देखील होती..

बोधगया हे ऐतिहासिक स्थान गयाच्या ११ किमी दक्षिणेस स्थित असून ते बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वाच्या ४ पवित्र स्थळांपैकी (बोधगया, कुशीनगर, लुंबिनी व सारनाथ ) एक आहे. येथील बोधी वृक्षाखाली बसून गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती असे मानण्यात येते.   शाक्य वंशाचे राजकुमार असलेल्या सिद्धार्थ गौतमांना या ठिकाणी पूर्णज्ञान प्राप्त झाल्याने त्यांच्या या स्थानास महाबोधी विहार असेही म्हणतात.

अत्यंत शांत, धीरगंभीर आणि पवित्र वातावरणात आम्ही गौतम बुद्धांचे दर्शन घेतले आणि भव्य असा परिसर पाहत बाहेर निघालो. या ठिकाणी अनेक देशांच्या बौद्ध धर्मविषयक संस्था, अभ्यासकेंद्रे वेगवेगळ्या इमारतींमध्ये आहेत. अनेक परदेशी साधक देखील येथे पूजापाठ, साधना, ध्यान धारणा करतांना दिसतात. नेमके आज आमच्या सौ ना जुलाब व उलटीचा त्रास झाल्याने माझी मात्र चांगलीच तारांबळ उडाली. असो आठवणीत राहण्यासाठी हेही नसे थोडके...

उशीर झाला होता, त्यामुळे सरळ हॉटेलवर परतलो....





बोधगया - महाबोधी मंदिर


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1. आमची श्री जगन्नाथ पुरी यात्रा

2. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - , कोणार्क

4. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - गंगासागर