6. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - कोलकाता - 2
आमच्या चार धाम यात्रेतील शेवटचा टप्पा -
श्री जगन्नाथ पुरी यात्रा - कोलकाता - 2
दिवस 5 - दि. 09.12.2023
आजचा यात्रेचा पाचवा दिवस. आमच्या ग्रुप साठी हा एक स्पेशल दिवस म्हणावा लागेल कारण, आमच्या यात्रेचे संयोजक, सर्वेसर्वा श्री सूर्यवंशी काका व त्यांच्याही सर्वेसर्वा असलेल्या सौ शुभांगी वहिनी यांच्या लग्नाचा वाढदिवस. आम्हाला तो साजरा करण्याचे भाग्य लाभले. सकाळी उठल्यावर सर्वजण नाश्ता करण्यासाठी जेव्हा रेस्टॉरंट मध्ये आले, तेव्हा पूर्व नियोजनानुसार मागविलेला केक कापून त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. सर्वांनी त्यांना जोडीने केक भरवला आणि शुभेच्छा दिल्या. अतिशय धमाल आली. एकमेकांच्या साथी शिवाय असा पल्ला गाठणे अवघड असते. तेरा साथ है तो मुझे क्या कमी है... या गाण्यातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना या दोघांनाही अतिशय भरून आले होते. आयुष्यातले असे काही क्षण कायम मनात साठवून ठेवायचे असतात, आणि ते आपल्या मित्रपरिवारासोबतचे असतील तर अधिकच आनंद येतो.
ठरल्यानुसार आज पहिल्याने येथील प्रसिद्ध मैदान किंवा ज्याला मोठा बगीचा म्हणता येईल अशा इको पार्कला भेट दिली. जवळपास 50 एकर परिसरात पसरलेले हे अतिशय भव्य दिव्य बगीचा वजा मैदान आहे.
इको पार्क (किंवा प्रकृतीतीर्थ) हे भारतातील ग्रेटर कोलकाता येथील न्यू टाउनमधील एक शहरी उद्यान आहे. 480 एकर क्षेत्रफळ असलेले (104 एकर वॉटरबॉडीसह मध्यभागी एक बेट आहे). हे भारतातील सर्वात मोठे शहरी उद्यान आहे.
या उद्यानाचे तीन भाग करण्यात आले आहेत;
1) पाणथळ जागा, गवताळ प्रदेश आणि शहरी जंगले यांसारखे पर्यावरणीय क्षेत्र ,
2) थीम गार्डन्स आणि मोकळ्या जागा,
3) शहरी मनोरंजन जागा.
इको पार्क उद्यानात लोकांना भेट देण्यासाठी जगातील सात आश्चर्यांच्या प्रतीकृती तयार करण्यात आल्या आहेत. उद्यानात जंगली फुलांचे कुरण, बांबूची बाग, गवताळ प्रदेश, उष्णकटिबंधीय वृक्षांची बाग, बोन्साय बाग, चहाची बाग, कॅक्टस वॉक, हेलिकोनिया बाग, फुलपाखरू बाग अशी विविध क्षेत्रे आहेत.
हे पार्क संपूर्ण पणे पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी एक संपूर्ण दिवस पाहिजे, तास - दोन तासात पाहून होत नाही.
आम्ही येथील ट्राम सह तयार करण्यात आलेल्या रेल्वे स्थानक च्या प्रतिकृतीस भेट देऊन फोटो काढले. झाडांच्या सावलीत हिरवळीवर निवांत बसून गप्पा मारल्या, काहींनी जोडीने सायकल चालवण्याचा आनंद घेतला. अजून बरेच काही होते, पण वेळेअभावी येथून काढता पाय घेतला...
पुढचे ठिकाण होते -दक्षिणेश्वर काली मंदिर.
हे कोलकात्यामधील एक हिंदू नवरत्न मंदिर आहे . हुगळी नदीच्या पूर्वेकडील तीरावर स्थित असलेल्या या , मंदिराची प्रमुख देवता आदिशक्ती कालिका म्हणून ओळखली जाते.
दक्षिणेश्वर काली मंदिराची स्थापना १९ व्या शतकाच्या मध्यभागी राणी रश्मोनी यांनी केली होती .
येथे पोहोचलो तो मंदिर बंद होते. एक तासभर वाट बघिल्यांनंतर बाह्यद्वार उघडले गेले. आम्ही आत पोहोचतो तोपर्यंत दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली असल्याने वेळेअभावी केवळ कळसाचे दर्शन घेऊन बाहेर पडलो.
बेलूर मठ हे रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे मुख्यालय आहे , ज्याची स्थापना रामकृष्ण परमहंस यांचे मुख्य शिष्य स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये केली होती . हे हुगळी नदीच्या पश्चिम तीरावर बेलूर, पश्चिम बंगाल येथे आहे. 2003 मध्ये, बेलूर मठ रेल्वे स्थानकाचे उद्घाटन देखील करण्यात आले जे की बेलूर मठ मंदिराला समर्पित आहे.
बेलूर मठाच्या 40-एकर परिसरामध्ये रामकृष्ण, शारदा देवी आणि स्वामी विवेकानंद यांना समर्पित मंदिरे आहेत. बेलूर मठ हे कोलकात्याजवळील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक मानले जाते.
येथील प्रमुख मंदिरात कमालीची शांतता आणि धीर गंभीर वातावरण, त्यात सुरू असलेली सुरेल आवाजातील प्रार्थना वातावरणाला अधिकच पवित्र करत होती. गर्दी भरपूर असली तरी लोक स्वतःहून एक प्रकारची शिस्त पाळताना दिसत होते. अतिशय भव्य दिव्य अशा या वास्तू आहेत. बाजूलाच हुबळी नदीच्या किनाऱ्यावर थोडा वेळ बसून आम्ही प्रभुनामाचा जप केला. आणि मग प्रसन्न चित्ताने येथुन निघालो.
निघाल्यावर ड्रायव्हर ने आम्हाला हावडा ब्रिज वरून नेऊन ईडन गार्डन ला फेरी मारून परत हावडा ब्रिज मार्गे हावडा स्टेशन येथे सोडले अशाप्रकारे सकाळी काहींचे पाहायचे राहिलेले ईडन गार्डन बाहेरून का होईना पाहण्याची आणि हावडा ब्रिज वरून चक्कर मारण्याची हौसदेखील पूर्ण झाली.
हावडा स्टेशनच्या बाहेरच नदीच्या काठावर वंदे भारत रेल्वेच्या डब्यामध्ये एक रेस्टॉरंटची (रेल कोच रेस्टॉरंट) निर्मिती करण्यात आलेली आहे. सभोवताली हिरवळ असलेला बगीचा आणि पाठीमागे नदी, नदीच्या मागे समोरच दिसणारा विद्युतझोकात प्रकाशमान असलेला हावडा ब्रिज आणि नदीवरील पूर्णपणे विद्युत रोषणाई केलेल्या जहाजांमध्ये कार्यक्रमा निमित्त सुरू असलेला संगीताचा जल्लोश.
आणि अशा या धुंद वातावरणात आम्ही सूर्यवंशी काका वहिनींचा लग्नाचा वाढदिवस त्यांच्याकडून पार्टी घेऊन साजरा करत होतो. खरोखरच छोटेखानी आणि अतिशय स्वच्छ असलेले हे रेस्टॉरंट व त्याचबरोबर खाद्यपदार्थांची रुचकर चव मनाला भावून गेली.
दहाच्या सुमारास तेथून निघून सर्व स्टेशनवर आलो. थोडा वेळ वाट पाहायला लावल्यावर बरोबर साडेदहा वाजता ट्रेन आली आणि गयाला जाण्यासाठी आम्ही ट्रेनमध्ये बसलो. थोड्याच वेळात लगेच निद्रा देवतेच्या आधीन झालो. आजचा दिवस खरोखरच अतिशय आनंदात आणि प्रसन्न वातावरणात गेला.
ईको पार्क
दक्षिणेश्वर काली मंदिर
बेलूर मठ
रात्रीचा हावडा ब्रिज
Very Very happy anniversary nicely celebrated with good कलकत्ता दर्शन
उत्तर द्याहटवा