10. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - प्रयाग (अलाहाबाद)
आमच्या चार धाम यात्रेतील शेवटचा टप्पा -
श्री जगन्नाथ पुरी यात्रा - प्रयाग (अलाहाबाद)
दिवस 9 - दि. 13.12.2023
श्री जगन्नाथ पुरी यात्रेच्या प्रवासातील आजचा नववा आणि शेवटचा दिवस सकाळी लवकर उठून नाश्ता उरकून आम्ही प्रयाग (अलाहाबाद) च्या दिशेने प्रयाण केले. वाराणसी सोडल्यानंतर पन्नास ते साठ किलोमीटरच्या अंतरावर विंध्याचल या ठिकाणी मातेचे पौराणिक आणि पवित्र असे मंदिर आहे येथे दर्शनासाठी गेलो.
विंध्याचल, हे उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील एक तीर्थक्षेत्र व शक्तीपीठ आहे. येथे असलेले विंध्यवासिनी देवी मंदिर हे एक मोठे आकर्षण आहे. धर्मग्रंथानुसार, विंध्याचल शहर हे दुर्गा देवीचे निवासस्थान आहे असे मानले जाते . महिषासुर या राक्षसाचा वध केल्यावर देवीने राहण्यासाठी विंध्याचल निवडले असे म्हटले जाते. कृष्णाचा जन्म झाला, त्याच रात्री यशोदेच्या पोटातून दुर्गा देवीचा जन्म झाला असे दुर्गा सप्तशतीत लिहिले आहे . कंसाने (मथुरेचा राजा) बाळाच्या शरीराला दगडावर आपटून, चिरडून मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती चमत्कारिकपणे त्याच्या पकडीतून निघून गेली आणि देवीच्या दैवी रूपात बदलली, असे पुराणात म्हटले जाते.
मंदिराच्या बाहेर प्रांगणामध्ये स्वागत कमानी आणि पायऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर काम चालू होते, गर्दीही फारशी नव्हती. अर्ध्या तासात दर्शन झाले आणि लगेचच पुढील प्रवासासाठी निघालो.
आणि इथून सुरू झाला खऱ्या अर्थाने आमच्या यात्रेतील लक्षात राहणारा प्रवास. मागील आठ दिवस बऱ्यापैकी शांत असणारे , स्वतःच्या जोडीदारासोबत यात्रेचा आनंद घेणारे सर्व जण गाडीमध्ये खऱ्या अर्थाने मोकळे झाले. ब्लूटूथ द्वारे गाडीतील स्पीकरवर आम्ही गाणे सुरू केले आणि यात्रेच्या संचालिका सौ शुभांगी सूर्यवंशी वहिनींनी एका गाण्यावर ठेका धरला. मग काय... हळूहळू एक एक जण आणि त्यानंतर एक एक जोडी गाण्यांच्या तालावर थिरकायला लागली. चालत्या गाडीत स्वतःचा तोल सावरत, अरुंद जागेत का होईना... पण प्रत्येकाने जमेल तसा नाचण्याचा आनंद घेतला. गाण्यांमध्ये सर्व इतके रंगून गेले की प्रयाग कधी आले ते कळले देखील नाही.
मी तर म्हणतो हीच तर खरी मजा असते प्रवासाची. चार भिंतींच्या बाहेर पडून, तुम्ही तुमचे पद, प्रतिष्ठा, मोठेपणा सर्व बाजूला ठेवून, सोबत्यांसह जीवनाचा मनसोक्त, मनमुराद आनंद लुटायचा असतो.
प्रयाग ला पोहोचल्यानंतर आम्ही पहिल्याने नेहरू भवन पाहण्यासाठी गेलो.
नेहरू भवन (आनंद भवन) हे प्रयागराज येथील एक ऐतिहासिक संग्रहालय (राष्ट्रीय स्मारक) आहे. नेहरू कुटुंबाशी संबंधित स्वराज भवन (पूर्वीचे आनंद भवन) हे १९३० च्या दशकात मोतीलाल नेहरू यांनी नेहरू कुटुंबाचे निवासस्थान म्हणून विकत घेतले होते. याच परिसरात जवाहर तारांगण देखील बनविण्यात आले आहे. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विवाह देखील येथे झाला होता. या संग्रहालयात सध्या नेहरू व गांधी कुटुंबाशी संबंधित त्याकाळच्या वस्तू, जसे की त्यांचा पलंग, अभ्यासाचा टेबल, सोफा, खुर्च्या इत्यादी संग्रहित करण्यात आलेले आहेत. वेळेअभावी तारांगण चा खेळ पाहता आला नाही.
त्यानंतर आम्ही निघालो ते नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम पाहण्यासाठी.
आपल्या नाशिक प्रमाणेच प्रयाग येथे देखील दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. नदीच्या काठावरच येथील सिंहस्थासाठीची जागा आरक्षित आहे. नाशिकच्या तुलनेत अत्यंत मोठी, जवळपास शंभर ते दीडशे एकर असलेली ही जागा फक्त सिंहस्थासाठी आरक्षित असून त्यावर कुठेही अतिक्रमण दिसले नाही हे विशेष.
आपल्या हिंदू परंपरेत , त्रिवेणी संगम म्हणजे तीन नद्यांचा संगम, अर्थात पवित्र स्थान. येथे स्नान केल्याने एखाद्याची सर्व पापे दूर होतात आणि तो पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त होतो असे मानले जाते. प्रयाग येथे गंगा, यमुना आणि एक पवित्र तिसरी अदृष्य पौराणिक नदी, सरस्वती यांचा त्रिवेणी संगम आहे.
प्रत्यक्ष संगम बघण्यासाठी किनाऱ्यावरून एक दीड किलोमीटर आत असलेल्या संगमावर बोटीने जावे लागते. प्रत्येकी आठ जण अशा तीन बोटींमध्ये आम्ही संगमावर जाण्यासाठी निघालो. द्वारका बेट आणि गंगासागर प्रमाणेच याही ठिकाणी असंख्य समुद्र पक्षी आपल्या बोटीच्या भोवती घिरट्या घालत, त्यांनादिलेल्या खाऊचा फडशा उडवताना दिसत होते.
संगमाच्या ठिकाणी दोन बोटी एकमेकाला समांतर उभ्या करून त्यांच्या मधल्या भागात, पाण्यात उतरण्यासाठी आधार देऊन छोटीशी जागा तयार केली जाते. या ठिकाणी कमरेपर्यंत पाणी असते. येथेच आपण उतरून डुबकी मारायची की झाले स्नान.
आम्ही देखील जवळपास सर्वांनीच येथे स्नान केले. अशा प्रकारच्या चार-पाच बोटींवर स्नानाची व्यवस्था केली आहे. परंतु वाईट असे की, येथे भाविकांसाठी कोणत्याही सुविधा उभारलेल्या नाहीत. स्त्रियांना कपडे बदलण्यासाठी कुठलीही स्वतंत्र व्यवस्था नाही. येथील पुजारी आणि बोटींवरील कर्मचारी हे फक्त येणाऱ्या भाविकांना लुटण्यासाठीच बसले आहेत अशा पद्धतीने वागतात. नुसते संगमावरील बोटीपर्यंत गेले, तरी मानसी २५ रुपये, पाण्याच्या दुधाचा ग्लास नदीला अर्पण केला की २५ रुपये, तीन नारळ ( परत परत वापरले जाणारे) घेतले की दोनशे रुपये, त्यांच्याकडून फोटो काढला की दोनशे रुपये (त्यासाठी तुम्हाला फोटो काढायला बंदी). हे सर्व त्यांच्या सांगण्यावरून जबरदस्तीने करायचे. पवित्र स्थानांवर अशा प्रकारे दूरवरून येणाऱ्या भाविकांची होणारी आर्थिक आणि मानसिक लूट यावर शासनाने नक्कीच निर्बंध आणले पाहिजे असे वाटून जाते.
त्रिवेणी संगमावर, गंगा आणि यमुना त्यांच्या वेगवेगळ्या रंगांनी ओळखता येतात. गंगेचे पाणी स्पष्ट आहे तर यमुनेचे पाणी हिरवट रंगाचे आहे. हे पाहतांना वेगळीच अनुभूती आली.
संगमावर स्नान उरकून प्रसन्न आणि मोकळ्या मनाने परत निघालो.
या यमुनेच्या काठावर, गंगेच्या संगमाजवळ अलाहाबादचा किल्ला आहे . हा किल्ला मुघल सम्राट अकबराने 1583 मध्ये प्रयागराज येथे बांधला होता. अकबराने किल्ल्याला इल्लाहबास (अल्लाहने आशीर्वादित) असे नाव दिले, जे नंतर "अलाहाबाद" झाले. असे म्हणतात...
या किल्ल्यातच अक्षयवट नावाचे पुरातन मंदिर आहे. या ठिकाणी हजारो वर्षांपूर्वीचा वटवृक्ष अद्यापही उभा आहे. या वृक्षाच्या मुळ्या जमिनीत जिथे गेल्या, त्या ठिकाणी भुयारामध्ये प्राचीन छोट्या छोट्या मंदिरांची उभारणी केलेली आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी देखील आपले पिता, राजा दशरथ यांचे श्राद्ध विधी याच ठिकाणी तीन दिवस मुक्काम करून केला होता., अशी आख्यायिका आहे.
येथे दर्शन करून जवळच असलेल्या सुप्रसिद्ध बडे हनुमान मंदिराचे दर्शन घेण्यासाठी गेलो.
संगम आणि किल्ल्याजवळ प्रयागराज येथे गंगा यमुनेच्या काठी हे बडे हनुमानजी मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. संगम शहरात ते बडे हनुमानजी, किल्ले हनुमानजी, लेटे हनुमानजी आणि दाम हनुमानजी म्हणून ओळखले जातात.
मंदिराच्या गर्भगृहात हनुमानाची 20 फुटी मूर्ती स्थापित असून ती मंदिरात जमिनीच्या खाली 8 फूट आहे. हनुमानाची मूर्ती ही आडवी (झोपलेल्या अवस्थेत) आहे. असे म्हणतात की पूर आल्यावर गंगेचे पाणी हनुमानजींना स्पर्श करते आणि त्यानंतर गंगेचे पाणी कमी होते.
अशाप्रकारे हनुमान दर्शनाने आमच्या यात्रेचा समारोप करून, तेथेच किरकोळ खरेदी करून प्रसन्न मनाने हॉटेलवर परतलो.
आमचे मित्र जगदीशजी सोनवणे यांचा तिथीनुसार आज वाढदिवस होता. सर्वांनी त्यांना गाडीमध्ये अगोदरच शुभेच्छा दिल्या होत्या. हॉटेलवर परतल्यावर आम्ही परत एकदा केक कापून आणि शुभेच्छा देऊन, मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा केला...
आजचा दिवस देखील अतिशय व्यस्त परंतु संस्मरणीय असा होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा