मैत्रीचे अनोखे नातेबंध
दोन दिवसां पूर्वी पेशाने डॉक्टर असलेले, अतिशय हळव्या आणि कवी मनाचे तसेच शारीरिक तंदुरुस्तीची आवड असल्याने अनेक अवघड ट्रेक, गड किल्ल्यांची भ्रमंती करणारे परंतु वेळप्रसंगी अजिबात दयामाया न दाखवता पेशंटचे दात लीलया उपटणारे माझे मित्र, डॉक्टर धोंडगे सर यांचा मेसेज आला.
डॉक्टरांच्या वडिलांचे मित्र आजारी असल्याचा निरोप आल्यापासून ते वडील त्या मित्राला जाऊन भेटून आल्याचे आणि तदनंतर दुसऱ्याच दिवशी ते मित्र स्वर्गवासी झाल्याचे व या निमित्ताने यांच्यातील मैत्रीचे महत्त्व दर्शवण्याचा सुंदर प्रयत्न डॉक्टरांनी या सविस्तर वर्णनातून केला.
तो लेख वाचता वाचता माझे मन नकळत भूतकाळात गेले आणि आमच्या घरी असलेल्या आमच्या लाडक्या कुत्र्याचे पिल्लू "शेरा" याच्या आठवणीने मनात गर्दी केली. मित्र म्हणजे केवळ माणूसच असेल असे नाही, प्राणी देखील आपला अतिशय चांगला मित्र असू शकतो, त्याच्यात व आपल्यात किती घट्ट नाते असू शकते हे, माझ्या मनातल्या खालील विचारांवरून दिसून येईल. मला खात्री आहे आपण देखील याच्याशी नक्कीच सहमत व्हाल. जागतिक मैत्री दिनी या दिवंगत मित्राची आठवण हीच त्याला श्रद्धांजली ठरेल.
मनातले विचार मी मनातच न ठेवता डॉक्टर साहेबांना पुढील प्रमाणे लिहून पाठवले आणि मन हलके केले. आपणासही ते आवडतील ही अपेक्षा...
सर,
आपल्या वडिलांचे मित्र गेल्यानंतर, त्या घटनेवर आधारित त्यांच्यातील मैत्री बाबत आपण लिहिलेला लेख वाचनात आला. अतिशय सुरेख आणि हृदयस्पर्शी आहे. हा लेख वाचत असताना मला का कोण जाणो, पण एक घटना प्रकर्षाने आठवली. कालपासून तुम्हाला ती सांगण्याची ओढ लागली. या जगात केवळ मनुष्यच नव्हे तर प्राणी देखील अतिशय उत्तम प्रकारे नाते निभावतात. मग ते मैत्रीचे असो, आपुलकीचे, की अजून काही संबंधाने असो.
अशीच एक घटना आमच्याशी संबंधित आहे.
साधारणतः दहा एक वर्षांपूर्वी मला आमच्या भाच्याकडून एक लॅब्रॉडॉर जातीचे कुत्र्याचे पिल्लू मिळाले होते. साधारणतः एखादा महिन्याचे असेल, आम्ही त्याला घरी घेऊन आलो. माझ्या दोघीही मुलींचा फार दिवसांचा अतिशय हट्ट होता, यानिमित्ताने तो पूर्ण झाला. आणि काय सांगावे दोघींनाही त्याचा इतका लळा लागला होता, की उठता - बसता, झोपता - जागता; त्यांना फक्त शेराच दिसायचा. हो, आम्ही त्याचं नाव *शेरा* असं ठेवलं होतं. त्याच्या गोंडस बाललीलांमध्ये आमचा दिवस कसा जायचा ते समजायचे नाही. पोरी तर शाळेतून आल्यावर घरात पाय की दारात पाय, शेरामागे धावायच्या, तोही सतत त्यांच्या मागे मागे करत, त्यांच्या पायात घुटमळत राहायचा, अंगावर उड्या मारायचा. तो कधी शांत, एकटा बसल्याचे आम्हाला आठवतच नाही. जसजसा मोठा होत चालला, तसतसे वयोमानानुसार त्याचे लसीकरण, त्याची औषधे त्याची नोंदणी इत्यादी सर्व सोपस्कार वेळेवर होत होते. जसजसा तो मोठा होत होता तस तशी त्याची भूक वाढत होती. त्याच्यासाठी उकडलेली अंडी सोले पर्यंत देखील त्याला दम निघायचा नाही. तीन-चार अंडे तो क्षणार्धात फस्त करत असे. कालांतराने त्याला गोचीड झाली. दर 2-3 दिवसांनी त्याला साबणाने स्वच्छ आंघोळ घालून, संपूर्ण शरीरभर पसरलेल्या त्याच्या गोचीड काढणे हा एक आमचा नित्याचा कार्यक्रम होऊन बसला. रात्रीच्या वेळेस झोपताना आम्ही हॉलमध्ये त्याच्यासाठी छानसा बिछाना टाकायचो, पण तो पठ्ठ्या, आमची पाठ फिरली रे फिरली, की लगेच बिछान्यावरून सोफ्यावर उडी मारून रात्रभर सोफ्यावर आराम करायचा आणि सकाळी उठून आम्ही खाली आलो की त्याला चाहूल लागायची, आणि इतक्या पटकन उडी मारून पुन्हा आपल्या बिछान्यावर बसून घ्यायचा, जसे काही आज्ञाधारक बालकच.
अशा पद्धतीने त्याच्या अनेक बाललीलांमध्ये आम्ही देखील गुंतत चाललो. मुली देखील इतक्या गुंतल्या ही त्यांचे अभ्यासाकडे देखील दुर्लक्ष व्हायला लागले. मग नाईलाजाने, त्याला दूर करण्याचा निर्णय मला घ्यावा लागला. पण हा निर्णय घेतांना तो योग्य ठिकाणी राहील याची देखील काळजी मला घ्यायची होती. अशातच माझे गावाकडील साडू श्री संतू पा हिरे यांना कुत्र्याची आवश्यकता असल्याचे समजल्याने व त्यांच्याकडे अतिशय योग्य पद्धतीने त्याची देखभाल होईल याची खात्री असल्याने आम्ही शेराला त्यांच्याकडे नेऊन घातले. आम्हा सर्वांसाठीच ही अतिशय वेदनादायी गोष्ट होती. लळा लागलेल्या घरातील एका सदस्याला एकाएकी दूर करणे आम्हा सर्वांनाच खूप जड गेले. दर आठवड्याला तुम्हाला शेराला भेटण्यासाठी घेऊन जाईल अशा आशेवर मुलींची समजूत काढली. यानंतर आम्ही दर आठ - पंधरा दिवसानंतर किंवा फार फार तर महिन्याला त्याला भेटण्यासाठी गावी जात असू. आमची चाहूल लागताच शेरा मोठमोठ्याने उड्या मारू लागे, आवाज करू लागे, आणि आमच्याकडे धावू लागे. जणू काही मी तुम्हाला विसरत नाही हे तो त्याच्या कृतीतून दाखवत असे. शेतातील मोकळे वातावरण, चांगली ठेप यामुळे शेरा हळूहळू मोठा होत चालला होता, दिवसामाजी त्याची ताकदही वाढत होती. त्याला फिरायला घेऊन जाणाऱ्याला तोच ओढून नेत असे.
मध्यंतरीच्या काळात एक घटना घडली. पाटलांनी त्याला थोडफार मोकळे सोडले आणि त्याच संधीचा फायदा घेऊन तो आजूबाजूच्या शेतामध्ये पळाला. शेजारच्या शेतातील विहिरीजवळ साचलेल्या पाण्यात जाऊन मनसोक्त डुंबला., चिखलात लोळला आणि नंतर इकडे तिकडे सैरावैरा धावू लागला लागला. ते पाहताच अगोदरच डूख धरून असलेले शेजारच्या शेतातील साडूंचे भाऊबंदांपैकी एकाने लोखंडी हत्याराने शेरावर वार केला. त्याच्या डोक्याला बोटभर जाडीची खोक पडली. अशा जखमी अवस्थेत त्याला नाशिकला दवाखान्यात आणले गेले. आम्ही देखील तिथे गेलो होतो. एव्हडी मोठी जखम होऊन देखील शेरा अगदी व्यवस्थित होता. यथावकाश जखम भरली, पण अमानवी अत्याचाराने मनावर झालेली जखम मात्र आजतागायत भरली गेली नाही.
कालांतराने तीन चार वर्षा चा झाल्यानंतर शेरा अक्षरशः एखाद्या वाघासारखा दिसू लागला. शेरा इतका उंच व ताकदवान झाला होता की, येणारे जाणारे त्याला घाबरून त्याच्या जवळ जाण्याची हिंमत करीत नसत. त्याला जर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला बांधलेले असेल आणि आपण गेल्यावर आवाज दिला तर इतक्या जोमाने आपल्याकडे उडी मारायचा प्रयत्न करे की, त्यामुळे ट्रॅक्टरची ट्रॉली देखील हालायची.
बंगल्यासमोरच असलेल्या झाडाखाली त्याला बांधलेले असायचे. त्याच्याच बाजूच्या शेतात पुरुषभर उंचीचा ऊस होता. एक दिवस सायंकाळी अंधार पडल्यानंतर, उसातून अचानकपणे आलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला. बांधलेला असल्यामुळे शेराला काहीच हालचाल करता आली नाही. तेवढ्यात घरातून कोणीतरी बाहेर आल्याने वाघाने शेराला सोडून उसात पळ काढला. वाघाच्या हल्ल्याने शेराच्या नरडीला दोन मोठे होल पडले. या परिस्थितीत त्याच्यावर काही उपचार देखील करता येत नव्हते. ते दोन होल इतके मोठे होते की, तोंडातून खाण्यापिण्यासाठी दिलेले दूध - पाणी, अन्न हे त्या होल मधून बाहेर पडायचे. पोटात काहीच जात नसल्यामुळे शेराची तब्येत खालावत चालली.
पाटलांचा आम्हाला निरोप आला, की 3-4 दिवसांपासून तो नुसता पडून आहे, काहीच खात पीत नाही. आम्ही भेटायला गेलो. त्याच्यावर हल्ला झाल्यानंतरचा तेरावा दिवस होता. आमची नुसती चाहूल लागताच, जखमी अवस्थेतील, तीन चार दिवसांपासून आंब्याच्या झाडाखाली एका जागी गलितगात्र होऊन पडून असलेला शेरा खाडकन उठून उभा राहिला. कुठून त्याच्यात अचानक एवढी ताकद आली कोण जाणे आणि लगेच आमच्या अंगावर उडी मारण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागला. त्याची ती अवस्था पाहून आम्हाला अतिशय गलबलून आले, पण काहीच करू शकत नव्हतो. नाईलाजाने संध्याकाळी परत घरी परतलो आणि दुसऱ्याच दिवशी शेरा गेल्याची बातमी आली.
एवढे दिवस आमच्या साठीच तो जिवंत राहिला असे त्या सर्वांचे म्हणणे पडले. याला काय म्हणावे ? कोणता ऋणानुबंध म्हणावे ? कोणती मैत्री म्हणावी ? कोणते संबंध म्हणावे ? काहीच कळत नाही.
पण एक खरं !!! माणसापेक्षा सुद्धा जनावरं जास्त प्रेम करतात आणि त्याची मैत्री हीच खरी मैत्री.
या मैत्रीदिनानिमित्ताने आपण त्याची आठवण करून दिली, त्यामुळे त्याच्याविषयी च्या आठवणींना उजाळा मिळाला. त्याबद्दल आपले देखील खूप धन्यवाद...
विलास घोलप...
छान, श्वान प्रेमी यातील प्रेम व लोभ अनभवू शकतात....
उत्तर द्याहटवाAti sundar lekh
उत्तर द्याहटवा