माझी ब्रह्मगिरी पर्वत , त्र्यंबकेश्वर (नाशिक) परिक्रमा ...दि 27.8.23

 ब्रह्मगिरी पर्वत , त्र्यंबकेश्वर (नाशिक) परिक्रमा ...


दरवर्षीच्या  श्रावणात  लोक त्रिंबकेश्वर च्या ब्रह्मगिरी पर्वताची परिक्रमा (फेरी) करतात. फेरी लहान आणि मोठी अशा दोन मार्गांनी केली जाते.  त्यांचे अंतर  28 ते 30 आणि 56 ते 62 किमी आहे.

श्रावण महिन्यात शक्यतो तिसर्‍या सोमवारी  च्या फेरीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या एका फेरीने संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य लागते अशी मान्यता आहे. यावेळी लाखो भाविक ही फेरी रात्री सुरू करतात. रविवारी रात्री सुरुवात करून सोमवारी सकाळपर्यंत परिक्रमा संपते.   छोट्या परिक्रमेला साधारणतः सात ते नऊ तास लागतात. या वेळची गर्दी टाळण्यासाठी आताशा अनेक लोक दुसऱ्या किंवा चौथ्या सोमवारी फेरी करतात करतात. 

बरेच लोक गर्दी नको म्हणून आठवड्याच्या इतर दिवशी देखील रमत गमत दिवसा फेरी पूर्ण करतात . रात्रीची फेरी केल्यास प्रवास न जाणवता इतरांसोबत सतत चालत राहत, परिक्रमा पूर्ण होते,. परंतु मग आपण या परिसराच्या निसर्ग सौंदर्याला पारखे होतो.  त्यामुळे आम्ही  निसर्ग सौंदर्य बघायचे म्हणून रात्रीचा प्रवास टाळला आणि रविवारी सकाळी फेरी करायचे ठरवले.

रविवार म्हणजे 27 ऑगस्ट रोजी  माझी बहुप्रतीक्षित, अतिशय उत्कंठावर्धक, आस लागून राहिलेली ब्रह्मगिरी परिक्रमा (फेरी) मित्रवर्य से. नि. सांख्यिकी अधिकारी   श्री जयरामजी गांगुर्डे साहेब, आ. व कु. क. प्र. केंद्र नाशिक चे सांख्यिकी अधिकारी श्री राजेंद्र सूर्यवंशी साहेब, आणि आमचे मित्र से. नि. शितसाखळी तंत्रज्ञ श्री धनंजयजी वाड साहेब या मित्रांसोबत निश्चित करून ठरलेल्या नियोजनाप्रमाणे सकाळी 6.30 ला नाशिक हुन निघून त्र्यंबकला पोहोचलो. श्रीक्षेत्र कुशावर्त येथे लोक अंघोळ करून, त्रिंबकेश्वराचे दर्शन घेऊन फेरीसाठी निघतात. आम्ही घरूनच आंघोळ केलेली असल्यामुळे कुशावर्तावर हात पाय धुवून, त्र्यंबकेश्वरच्या मंदिर कळसाचे दर्शन घेऊन 7.30 ला यात्रेला सुरुवात केली. 

 त्र्यंबकेश्वरहून पुन्हा  नाशिक रस्त्याने मागे  पेगलवाडी फाट्यावरील प्रयागतीर्थापर्यंत यावे लागते. या ठिकाणी आम्ही नाश्ता करून घेतला आणि निघालो. तेथून उजवीकडे घोटी रस्त्याला वळून पहिने गावापर्यंत निघायचे.  नाशिक येथील सायकलिस्ट चा एक ग्रुप, येवला व मालेगाव येथून आलेले अनेक स्त्री पुरुष भाविक,  बँक ऑफ बडोदा च्या संपूर्ण महाराष्ट्राच्या शाखांमधून आलेले सुमारे 250 ते 300 अधिकारी-कर्मचारी भाविक अशी अनेक मंडळी घोळक्या घोळक्याने भेटत होती.  मार्गात ठिकठिकाणी हलका पाऊस आमचा प्रवास सुकर करीत होता.  अधून मधून जय श्रीराम, हर हर महादेव, बम बोले अशा घोषणा ऐकू येत होत्या. 


पावसाळा असल्यामुळे संपूर्ण हिरवळ पसरलेली होती.  दोन्ही बाजूने हिरवेगार डोंगर, मधूनच डोंगरांवर उतरणारे ढग, धुके इत्यादी वातावरण अधिक प्रसन्न करत होते. अशा या प्रसन्न वातावरणात गप्पा मारत मार्गक्रमण सुरू होते. काही अंतरावर प्रसिद्ध पर्यटन स्थळ पाहिने लागले. येथील डोंगरावरून खाली वाहत येणाऱ्या दोन धबधब्या मुळे नेकलेस चा आकार दिसतो. त्यामुळे या ठिकाणाला नेकलेस पॉईंट असे म्हटले जाते.  सर्व निसर्गाची किमया...


सरळ थोडे पुढे गेल्यावर उजव्या हाताला भिवंडी खोडाळा मार्ग लागतो (भिलमाळ फाटा) . या रस्त्याने मार्ग क्रमण करायचे. रस्त्याने अनेक ठिकाणी छोटी छोटी चहा - सरबत ची दुकाने आहेत.  काही ठिकाणी नाश्ता मिळतो, त्यामुळे स्वतः सोबत पाण्याच्या बाटल्या किंवा इतर खाण्याच्या वस्तूंचा भार आणला नाही तरी चालते.  बरोबर असणाऱ्या लोकांमुळे आपणास चालण्याचा थकवा जाणवत नाही.  गप्पांच्या ओघात मार्गक्रमण सुरू राहते. रस्त्याने कोजुर्ली, खोडशी अशी एक दोन छोटी गावे लागतात.  पुढे परत एका ठिकाणी उजवीकडे वळून गौतम ऋषींच्या पर्वताकडे जाणारा रस्ता आहे,  त्या रस्त्याने मार्गक्रमण करायचे. रस्त्यात एक नदी लागते. या नदीकाठी गणेशाचे एक सुंदर मंदिर बांधलेले आहे. सर्व बाजूंनी डोंगर, मध्येच वाहणारी नदी आणि येथील मंदिर, सोबतीला सर्व ठिकाणी भाताची शेते, सोबतीला अधूनमधून पावसाचा शिडकावा... अतिशय पवित्र आणि धुंद अशा वातावरणात येथून थोडे पुढे गेल्यानंतर चढण सुरू होते.  रस्ता सिमेंटने बांधलेला असल्यामुळे फारसा त्रास जाणवत नाही.  काही अंतर पुढे गेल्यावर गौतम ऋषींच्या डोंगराचा पायथा आहे.  येथून पायऱ्या बांधलेल्या आहेत. साधारणतः दीड - दोनशे पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण गौतम ऋषींच्या मंदिराजवळ येतो.  या ठिकाणी गौतम ऋषींनी तपोसाधना केली होती.  त्यांचे वाढते तपोबल सहन न झाल्याने अन्य ऋषींनी त्यांच्यावर गोहत्या केल्याचा आरोप लावून त्यांना शिक्षा म्हणून गंगा पृथ्वीवर आणण्याची आज्ञा केली. त्यावर गौतम ऋषींनी शिवाची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले व त्यांना गंगा पृथ्वीवर आणण्याची विनंती केली. त्यावर शिवाने,  मी तिच्या शिवाय राहणार नाही, मी देखील त्याच ठिकाणी वास करेल असे सांगितले, व त्यांनुसार येथे शिवाचे स्वयंभू स्थान निर्माण झाले.  अशा रीतीने  येथे शिवाचे पवित्र स्थान त्रिंबकेश्वर  व  गंगेचा उगम  ब्रह्मगिरी पर्वतावर झालेला आढळून येतो.  या गौतम ऋषींच्या मंदिराच्या पूर्वेला वैतरणा धरणाचा विस्तीर्ण पसारा तर पश्चिमेला हरिहर गडाची पर्वतरांग दिसते. 

गौतम ऋषि व अहिल्या मातेच्या मंदिराचे दर्शन घेऊन पुन्हा पश्चिम बाजूने डोंगर उतरायला सुरुवात करायची.  काही पायऱ्या उतरुन गेल्यावर पुन्हा सरळ रस्ता लागतो.  आपण थोडे पुढे गेल्यावर उजव्या हाताला संपूर्ण ब्रह्मगिरी पर्वताची रांग, डाव्या हाताला तळेगावचा तलाव, सर्व बाजूंनी फुललेली भातशेती, त्यामागे हरिहर पर्वतरांग. अशा सर्व बाजूंनी हिरव्यागार आणि नयनरम्य वातावरणात मार्गक्रमण करत आपण चालत राहतो.

या सर्व प्रवासात एक करुणादायी तितकेच गमतीशीर गोष्ट जाणवली ती म्हणजे रस्त्यात लागणाऱ्या सर्व गावांतील लहान लहान मुले रस्त्यावर तुमच्याकडे खाऊ किंवा पैसे मागतात. संपूर्ण रस्त्याने सर्वांचे एकच वाक्य टिपिकल होते ते म्हणजे, "खाव (खाऊ) दे नायतर पैसा दे". लहानपणीच अशाप्रकारे भीक मागायची सवय लागणे हे न पटल्यामुळे आम्ही मात्र कोणालाही मदत केली नाही.



 साधारण 8-10 किलोमीटर चालत आल्यावर उजव्या हाताला डोंगरावर मेटघर किल्ला दिसतो, या किल्ल्याच्या पायथ्याला डोंगरावरच एक छोटेसे गाव असून तिथे जाण्यासाठी या खालच्या रस्त्यापासून मार्ग केलेला आहे.  कमानीतून पुढे वर जायचे, तिथून पुढे गंगाद्वार व गंगाद्वारहुन खाली  निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराजवळ उतरतात.  



पण जास्तीत जास्त भाविक हे या मार्गाने न जाता, पुढे जाऊन सापगाव येथे जव्हार रस्त्याला लागतात व तेथून गणेश बारी मार्गे चार किलोमीटर असलेल्या त्र्यंबकेश्वरापर्यंत आल्यावर फेरी पूर्ण होते. 

पावसाची कमतरता शेवटच्या 3 किमी च्या अंतरातील जोरदार पावसामुळे  भरून निघाली. जवळपास 28 किलोमीटरचे हे अंतर पूर्ण करण्यास आम्हाला आठ तास लागले. साडेतीनच्या सुमारास आम्ही त्रंबकला पोहोचलो.  तिथून पुन्हा नाशिक. अशा रीतीने खूप वर्षांची इच्छा असलेली त्यांचा पवित्र आणि धार्मिक अशी ही यात्रा परिक्रमा मित्रांच्या सहवासात व  बरोबरीने सहज पूर्ण झाली., आणि धन्य पावलो...

🙏🙏🙏

टिप्पण्या

  1. खूप सुंदर शब्दात वर्णन केले आहेस, मित्र.

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच सुंदर वर्णन केले आहे.....

    उत्तर द्याहटवा
  3. श्री. घोलप सर, तुमची लेखन शैली खूपच आकर्षक आहे. वाचताना आपण प्रत्यक्ष तेथे आहोत, असे जाणवते.

    उत्तर द्याहटवा
  4. ब्रम्हगिरी परिक्रमेची अत्यंत सविस्तर व सुरेख वर्णन केलेले आहे...
    धन्यवाद घोलप सर.....

    उत्तर द्याहटवा
  5. घोलपजी पहिल्यांनदाच परीक्रमा पूर्ण केली अस वाटायला लागल. मी आणी गांगुर्डेदाजी आम्ही 2017 मध्ये तिसऱ्या सोमवारी परिक्रमा पूर्ण केली परंतु रस्त्यात लागणारे गावे, ऐतिहासिक मंदिरे, आदिवासी लोकांच्या रांनभाज्यांचे प्रकार ,निसर्ग सौंदर्य अश्या बऱ्याच गोष्टींना आम्ही पारखे झालो होतो. खरंच परिक्रमा ही दिवसाचं करावी. धन्यवाद परीक्रमेचे सुंदर वर्णन केल्याबद्दल.

    उत्तर द्याहटवा
  6. वा, विलास /जे. एस. /वाड आणि सूर्यवंशी,. कमाल केलीत राव तुम्ही मंडळींनी.... राजा वाणी असायला हवा होता...... मस्त. हेवा वाटतो तुम्हां सर्वांचा 🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1. आमची श्री जगन्नाथ पुरी यात्रा

2. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - , कोणार्क

4. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - गंगासागर