सह्याद्री मित्र संमेलन नाशिक - दि. 7 जुलै 2023


नाशिक मधील नामवंत ट्रेकर्स च्या ग्रुप ने 
बघितलेलं " एक स्वप्न.. 
 कै.अविनाश जोशी स्मृतिप्रीत्यर्थ
" सह्याद्री मित्र संमेलन नाशिक - 2023 " 

आपल्या नाशिकला जसा धार्मिक आणि पौराणिकतेचा वारसा लाभला आहे, तसाच गड, किल्ले, डोंगररांगा, पर्वत या सर्वांचा देखील गौरवास्पद वारसा लाभलेला आहे.  सह्याद्री आमच्या नाशिकची पाठराखण करतो. कळसुबाईची पर्वतरांग आम्हाला आधार देण्याचे काम करते. सह्याद्री आणि कळसुबाईच्या अंगणात / कुशीत खेळणारी तिची असंख्य लेकरे म्हणजेच आमचे सह्याद्री प्रेमी, गिरीप्रेमी अर्थात ट्रेकर्स
या नाशकात व नाशिकच्या परिसरात आणि संपूर्ण महाराष्ट्रातच ट्रेकर्सच्या अनेक संस्था, भटकंती कट्टे कार्यरत आहेत. त्यांच्याकडून सातत्याने अनेक मोहिमा, चढाया यांचे आयोजन करण्यात येत असते. अनेक जण वैयक्तिकरित्या देखील सातत्याने गिरी भ्रमंती करत असतात . मग अशा या सर्व गिरी प्रेमींना एकत्र आणून, त्यांचे संमेलन भरवून, त्यांच्या अनुभवातून विचारांची देवाणघेवाण घडवून आणली, तर सर्वांनाच त्याचा फायदा होईल या उदात्त भावनेतून आमचे मित्र ज्येष्ठ गिरी प्रेमी, गिर्यारोहक आणि नामवंत फोटोग्राफर श्री संजय नाना अमृतकर आणि त्यांची संपूर्ण टीम (ज्ञात-अज्ञात सर्व सहकारी) कामाला लागली . 

बघता बघता नियोजनाला मूर्त स्वरूप येत गेले . विविध गोष्टींचा विचार झाला,  असंख्य सहकारी मदतीस उभे राहिले आणि सर्वांच्या अथक परिश्रमातून शेवटी सात जुलै चा हा गिरीप्रेमींचा महाकुंभमेळा प्रथमतः नाशिक मध्ये भरवण्यात आला. अत्यंत बारकाईने केलेले अत्युकृष्ठ नियोजन हे या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य होते. कार्यक्रमाच्या अगोदर सर्वांना आमंत्रण पाठवली गेली. कार्यक्रमाची वृत्तपत्र, रेडिओ , सर्व सोशल मीडिया या सर्वांच्या माध्यमातून सुंदरशी जाहिरात केली गेली.  सर्वांना कार्यक्रमासाठी हजर राहण्याचे आग्रही आमंत्रण आणि आवाहन करण्यात आले.
" तुम्ही कोणीही असा.. डॉक्टर, इंजिनिअर, वकील, व्यवसायिक,  विद्यार्थी वा गृहिणी....जर तुम्ही मराठी (महाराष्ट्र धर्म अनुसरणारे सर्वच मराठी) आहात तर तुम्ही सर्वच सह्याद्रीची लेकरं आहात.... तुमचा सह्याद्रीशी संपर्क असेल तर उत्तम, नसेल तर सह्याद्रीशी तुमची नाळ जुळवून घ्या..... आज उत्तम संधी आहे, असं समजा आज कालिदास कलामंदिर येथे तुमचा आणि सह्याद्रीचा व्रतबंध सोहळा आहे.... ही संधी चुकवू नका. जागा मिळाली नाही मिळाली तरी सभागृहात कसेही दाखल व्हा.... कोण सोबत आहे नाही त्याचा विचार करू नका.... पार्किंग आहे- नाही त्याची कुरकुर करू नका.. सर्व सबबींना तडीपार करा आणि गाठा थेट कालिदास कलामंदिर.... तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. 
  नोकरी, धंदा .. इतर अनेक समस्या
हा जीवनाचा भाग आहे..पण " सह्याद्री मित्र संमेलन..हा बघण्याचा व अनुभवण्याचा 
सुवर्ण योग आहे., एवढं लक्षात ठेवा."  
अशी भावनिक साद घालण्यात आली

तत्पुर्वी 5 दिवस अगोदर म्हणजे 2 जुलै रोजी नाशिक मधील विविध गिर्यारोहण संस्थांचे सदस्य आणि पदाधिकारी, निसर्ग प्रेमी आणि निरगुडपाडा ग्राम पंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत *निरगुडपाडा ते शेरीचापाडा* या मार्गास *कै अविनाश जोशी काका निसर्गवाट* असे नाव देण्यात आले आणि त्याच्या पाटी चे अनावरण करण्यात आले.

आणि बघता बघता 7 जुलै उजाडला. कार्यकर्त्यांची तर धावपळ विचारायलाच नको. आदल्या दिवशी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करीत बाहेर गावाहून आलेल्या इतर ट्रेकर्स व गिरी प्रेमींना सामोरे जात, त्यांची राहण्याची व सर्व व्यवस्था पाहण्यात हे मावळे दंग होते.  सर्वजण आपापल्या वाट्याला आलेली कामे अगदी उत्साहाने, घरचे कार्य असल्यासारखे धावपळ करत पार पाडत होते.  मग ते स्टेज डेकोरेटर्स असो, पुस्तकांचे नियोजन करणारे असो, रांगोळीचा ग्रुप असो किंवा हॉलमध्ये बैठक व्यवस्था पाहणारे असो. आणि हेही सर्व काही शांततेत. कुठलीही गडबड गोंधळ न करता,  बडेजाव न मिरवता, अतिशय नम्रपणे सामोरे जात. हे विशेष.





  दुपारचे तीन वाजले आणि सगळीकडून रस्ते कालिदास कला मंदिर कडे वाहायला लागले. दुपारी साडेतीन वाजताच समोर असलेले भव्य वाहन तळ पूर्णपणे भरून गेले, गाडी लावायला जागा शिल्लक राहिली नाही. तीच अवस्था कलामंदिराची देखील. दुपारी तीन वाजल्यापासून गिरी प्रेमींनी कालिदास कला मंदिर मध्ये जमायला सुरुवात केली आणि बघता बघता साडेतीन ते पावणेचार पर्यंत संपूर्ण हॉल खचाखच भरला . चार वाजता कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेस लोक बाहेर गर्दी करून उभे होते.


बहुप्रतिक्षित,  बहुचर्चित, सर्वांची उत्सुकता ताणून धरलेला, हा आगळावेगळा आणि पहिलाच कार्यक्रम, बरोबर चारच्या ठोक्याला सुरू झाला...

संमेलनाची सुरवात झाली ती जल्लोषपूर्ण, ढोलताशांच्या गजरात. त्यामुळे अतिशय रोमांचक अशी वातावरण निर्मिती झाली. 


त्यापाठोपाठ हरहर महादेवाच्या ललकारीत शिवछत्रपतींचा जयजयकार संपूर्ण सभागृहाला वेगळ्याच वातावरणात घेऊन गेला. 

त्यानंतर एसलपेलीयर शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीताचे सुंदर असे सादरीकरण केले. त्याने सभागृहाचे वातावरण भरून टाकले. 

यातून थोडे सावरायला देखील वेळ न देता नाशिकमधील एक नृत्यसंस्थेच्या युवतींनी कथकनृत्यातुन छत्रपती शिवरायांच्या आरतीचे देखणे सादरीकरण करून हा कार्यक्रम कोणत्या उंचीवर जाणार आहे याची झलकच दिली. 


मग आदरणीय सर्वश्री हरिषभाई कापडिया,  आनंद पाळंदे,  उष:प्रभा पागे, रंगरावअण्णा पाटील, डॉ. सुनील वर्तक या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून खऱ्या अर्थाने संमेलनाला सुरुवात झाली.



संमेलनाची रूपरेषा, महत्त्व  मा डॉ .सुधीरजी संकलेचा सर  यांनी आपल्या ओघवत्या  प्रास्ताविकात विषद केले. 

तद्नंतर डोंगरवाटा कार , गुरुवर्य श्री आनंद पाळंदे काकांची  ओळख डॉ अमर आडके सर यांनी सुंदर शब्दात करून दिली.

याप्रसंगी बोलतांना पाळंदे काकांनी, 
आनंदासाठी गिर्यारोहण करा, बाबासाहेब पुरंदरे चे राजा शिवछत्रपती वाचा, गो. नि. दांडेकरांचे दुर्गदर्शन अभ्यासा, वसंत लिमयेंचे धुंद स्वच्छंद वाचा,  मगच गिरिभ्रमणासाठी  बाहेर पडा, गिरीभ्रमणाचा आनंद घ्या, आधुनिक तंत्रज्ञान व सहित्यांचा योग्य वापर करून, ट्रेकिंग मध्ये कोणत्याही प्रकारचा अट्टाहास न करता अपघात टाळा, आनंदाने दुर्गवारी करतांना शिस्त पाळा. तुमच्या उत्साहात निष्काळजीपणाला थारा नको, आपण सर्व ह्या सह्याद्रीचे वारकरी आहोत, हे लक्षात ठेवून त्या वारीचे पावित्र्य जपत, या सह्याद्रीचा मनसोक्त आनंद घ्या असे सर्वांना मार्गदर्शन केले. 


याप्रसंगी मा श्री रंगराव आण्णा पाटील यांचे हस्ते मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 



यानंतर नाशिकच्या सुप्रसिद्ध अशा वैनतेय गिर्यारोहन गिरिभ्रमन नाशिक या मा तात्यासाहेब शिरवाडकर यांनी नाव ठेवलेल्या संस्थेचे संस्थापक, जेष्ठ गिर्यारोही  कै. अविनाश जोशी काकांचा जीवनपट उलगडणारी अप्रतिम अशी ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली.

 लगेचच गिरीकंदराज राजगडावरील ध्वनिचित्रफिल्म सादर झाली. 

एका पाठोपाठ एक अशा सादरीकरणांनी प्रेक्षकांना जागेवर खिळवून ठेवले होते भान हरपून, मंत्रमुग्ध होऊन सर्वजण कार्यक्रम पहात होते. 

यानंतर श्री  स्वप्नील पवार यांनी  स्वीडन येथील एका उपक्रमाचे स्लाईड शो द्वारे उदाहरण देऊन 
सह्याद्री रानवाटा - एक अभिनव प्रयोग तसेच त्या अनुषंगाने विविध नवीन प्रयोग करता येतील का याविषयी विचार करायला लावले,. दुर्दैवाने काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा स्लाईड शो व्यवस्थित बघता आला नाही पण त्यांनी चर्चेद्वारे आपला मुद्दा व्यवस्थितपणे गिरीप्रेमींपर्यंत  पोहोचविला.
 
यानंतर सादर झाला, तो कार्यक्रमातील एक महत्त्वाचा भाग, म्हणजे स्मरणिकेचे प्रकाशन. अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने सादर केलेल्या या उपक्रमात, वारकऱ्यांच्या खांद्यावरील दिंडीतून स्मरणिका आणून मान्यवरांच्या हस्ते तिचे प्रकाशन करण्यात आले.



यावेळी सामाजिक दायित्व म्हणून संमेलनात सर्वानुमते पुढील प्रमाणे ठराव मंजूर करण्यात आले.  - 
1.  प्रस्तावित अंजनेरी ते  ब्रह्मगिरी रोपवे ला विरोध.
2. प्लास्टिक व कचरा मुक्त सह्याद्री साठी प्रयत्न.
3. लग्न कार्यातले मावळ्यांचे वेष घेऊन सेवा देण्यास बंदी करणे.

कै जोशी काकांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित सह्याद्री मित्र संमेलनातील मानाचा पहिला सह्याद्री रत्न पुरस्कार यावेळी ट्रेकिंग मधील भीष्माचार्य,  Track the sahyadri आणि Himalayan journal यासह 50 एक पुस्तकांचे लेखक श्री हरिषभाई कपाडिया यांना,  गुरूवर्य पाळंदे काकांच्या हस्ते देण्यात आला. सह्याद्रीने हिमालयाचा सन्मान करावा अशा प्रकारचे दृष्य यावेळेस दिसून आले. एक ट्रेकिंगचा गुरू तर दुसरा महागुरु. याप्रसंगी या अलौकिक दृश्याचे सर्व गिरीप्रेमी साक्षीदार होते. संपूर्ण कलादालनाने त्यांना उभे राहून टाळ्यांच्या गजरात मानाची वंदना दिली. 

या प्रसंगी इतरही काही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 

विशेष उल्लेखनीय कार्य -  नाशिक क्लाईंबर्स आणि रेस्क्यूअर्स क्लब




 विशेष संस्थात्मक उल्लेखनीय कार्य - चक्रम हायकर्स संस्था


दुर्गसंवर्धन टीम आॕफ द इयर -  बा रायगड परिवार


विशेष  उल्लेखनीय कामगिरी - डॉ हितेंद्र महाजन
                                 आणि डॉ महेंद्र महाजन

ब्लॉगर आॕफ द इयर - श्री प्रांजल वाघ

बहुआयामी ट्रेकर  - श्री दिलीप वाटवे


ट्रेकर आॕफ द इयर - श्री नितीन मोरे


छायाचित्र डीएसएलआर  - श्री संग्राम गोवर्धने


छायाचित्र लँड्स्केप - श्री  पृथ्वीराज शिंदे 


गाईड ऑफ द इअर (उत्कृष्ट वाट्याड्या) - श्री कमळू पोकळा.

कमळू चा पुरस्कार सर्वांचीच दाद मिळवून गेला..

याप्रसंगी धुळ्याच्या काळे कुटुंबीयांनी आपल्या भावाच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन संस्थांना प्रत्येकी 25000 रुपयांचे पारितोषिक दिले व यापुढे ही प्रत्येक वर्षी असाच पुरस्कार देण्याचे जाहीर केले., आणि आपल्या सामाजिक दायित्व व दातृत्वाचा परिचय दिला. 

या सर्वांवर कळस म्हणजे हरिषभाई यांचे  गिरीदुर्गांचे अभ्यासपूर्ण स्लाईड प्रेझेंटेशन व त्यांचे अनुभवी बोल. 
" सह्याद्रीचे गिरीभ्रमण आणि हिमालयाचे गिरीभ्रमण या दोन्हींमध्ये खूप फरक आहे. सह्याद्रीचा एक दिवसाचा ट्रेक म्हणजे हिमालयाचा दहा दिवसांचा ट्रेक. त्याच प्रमाणे सह्याद्रीचा ट्रेक म्हणजे जिवंत अनुभव तर हिमालयातील ट्रेक एका ठराविक ठिकाणानंतर निर्मनुष्य, काहीच मिळत नाही.. सह्याद्रीत पावलापावलावर माणसे भेटतात, ते तुम्हाला मनापासून मदत करतात. देश आणि जागतिक पातळीवर मला आजपर्यंत अनेक पारितोषिके मिळाली. पण येथे आपल्याच सह्याद्रीच्या, घरच्या माणसांनी केलेला सत्कार हा सर्वोत्कृष्ट असे मी मानतो." 
यावेळी हरीश भाईंनी त्या काळातील सह्याद्रीच्या विविध गड किल्ल्यांचे दुर्मिळ छायाचित्रे आणि त्यावर त्यांची अभ्यासपूर्ण माहिती याचे अप्रतिम सादरीकरण सादर केले, अनमोल माहिती हरिषभाई यांच्या मुखातून प्रत्यक्ष ऐकायला मिळाली.  

पहिल्याच संमेलनाच्या निमित्ताने गिरिप्रेमींची मांदियाळी दिसून आली. आयोजकांच्या अत्युकृष्ठ नियोजन व आदरतिथ्याला सर्वांनी भरभरून दाद दिली. पुढचे संमेलन देखील असेच अप्रतिम असेल यात कोणालाही शंकाच नाही. 
न भूतो..ना भविष्य असे हे अविस्मरणीय संमेलन नाशिक ला  ट्रेकिंग हब आॕफ इंडिया ची ओळख मिळवून देण्याचे  स्वप्न दाखवून गेले..


संपूर्ण कार्यक्रमात स्वानंद चे सूत्रसंचालन आणि समय सूचकता वाखाण्यासारखी होती.


 विद्या विनयेन शोभते...या उक्तीप्रमाणे सह्याद्री मित्र संमेलनाचे सर्वेसर्वा श्री संजयनाना अमृतकर आणि त्यांचे सर्व सहकारी हे चुकूनही व्यासपीठावर दिसले नाहीत किंवा कोणत्याही वक्त्याच्या भाषणात त्यांनी आपला नामोल्लेख होऊ दिला नाही. आलेल्या प्रत्येकाला बसायला जागा देतांना स्वतः जमिनीवर बसले होते हे विशेष. 


या सर्वांना मन:पूर्वक अभिनंदन व इतका सुंदर कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल आभार आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. 
💐💐💐

थोडक्यात कार्यक्रम ...


टिप्पण्या

  1. वाह! सोहळा जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहिला. आम्ही हाच ब्लॅाग अल्बम म्हणुन सेव्ह करू. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  2. खरोखरच काल चा कार्यक्रम अनोखा होता , आज काल अशे कार्यक्रम बघायला मिळत नाहीत , सगळी कडे आपले स्वतःचे किंवा दुसऱ्याचे प्रमोशन , किंवा माझा काय फायदा , व्यवसाईक धार्मिक व राजकीय सोडुन बिना तिकिटांचा कार्यक्रम होणे शक्यच नाही. पण नानांनी व त्यांच्या सहकार्यांनी जोशी काकांच्या स्मरणार्थ असा काही उपक्रम करुन दाखवला की आजही ह्या जगात निस्वार्थपणे जात धर्म व धंदा सोडुन कोणी विचार करु शकतो… मी म्हणतो हाच खरा मानव धर्म जो ह्या लोकांनी जगाला दाखवुन दिला. धन्यवाद आपण लिहिलेला ब्लॅग सर्व समावेशक आहे. असेच लिहीत रहा व शेअर करत जा.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1. आमची श्री जगन्नाथ पुरी यात्रा

2. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - , कोणार्क

4. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - गंगासागर