9. आमची उत्तराखंड चार धाम यात्रा - नववा दिवस - 12/5/22

 आमची उत्तराखंड येथील चारधाम यात्रा दि. १२/५/२२ दिवस - नववा 

बद्रीनाथ हे  उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील एक शहर आणि नगर पंचायत आहे . हिंदूचे सर्वात पवित्र स्थान, आणि भारताच्या चारधाम तीर्थक्षेत्रांच्या चार स्थळांपैकी एक आहे. हे शहर नीलकंठ शिखराच्या जवळ नर आणि नारायण पर्वत रांगांच्या मध्ये आहे.

सकाळी लवकर उठून, आवरून लगेच दर्शनाला गेलो तर दर्शन लवकर मिळेल असा आमचा कयास होता. त्या दृष्टीने आम्ही सकाळी सात वाजताच मंदिराजवळ पोहोचलो देखील. परंतु तिथे पाहतो तो काय,  जवळपास दीड किलोमीटरची लाईन लागलेली होती. नाईलाज होता. लाईनला शेवटी जाऊन उभा राहिलो. 

आम्ही अशा उंचीवर होतो की हात वर केला तर सहज आभाळाला लागेल असा आभास व्हावा. आजूबाजूला सर्व बाजूंनी उंच पर्वतरांगा, त्यावर पसरलेला बर्फ आणि सूर्याच्या किरणात त्याची दिसणारी चमक.. मधूनच येणारे धुके, अतिशय विलोभनीय दृश्य होते हे. वातावरणातील गारवा आणि भाविकांचा सतत चाललेला देवाच्या नावाचा जयजयकार अशा उत्साहवर्धक आणि पवित्र वातावरणात भारून गेल्यासारखेच होत होते. खरोखर धरतीवरील स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच.. याची प्रत्यक्ष अनुभूती येत होती. असे म्हटले जाते की पृथ्वीवर भगवान जर कुठे वास करत असेल तर ते याच मंदिरात. या मंदिरात सहा महिने मानव आणि सहा महिने देवता येथील पूजाअर्चा करत असतात.

 अर्धा ते एक तास झाला तरी लाईन तसुभर देखील पुढे हालायला तयार नव्हती. शेवटी मग आम्ही हात पाय हलवायला सुरुवात केली. हिमालयातील सर्व प्रमुख मंदिरांची संरक्षण व्यवस्था लष्कराकडे असते. बाळासाहेबांच्या नात्यातील एका जवानास संपर्क केला. त्याने, त्याचे जे साथीदार येथे ड्युटीवर होते त्यांना संपर्क केला आणि त्यांच्या मदतीने आम्हाला मंदिरात थेट प्रवेश मिळाला. अन्यथा आमचा आजचा दिवस लाईन मध्येच गेला असता व पुढील सर्व नियोजन बारगळले असते. 

भगवान विष्णूची काळ्या  पाषाणातील (शालिग्राम) मूर्ती अत्यंत सुंदर आणि विलोभनीय  आहे.  केवळ बघतच राहावे ... कितीही बघितले,  कितीही वेळा दर्शन घेतले, तरी मन भरतच नाही... अशी , विचित्र मानसिक अवस्था होते. मुख्य मंदिराच्या बाहेरील सर्व बाजूंनी अनेक देवी देवतांची मंदिरे आहेत. या सर्वांचे मनोभावे दर्शन घेऊन बाहेर पडलो.

पौराणिक कथेनुसार, आदि शंकराचार्यांनी अलकनंदा नदीत शालिग्राम दगडापासून बनवलेली भगवान बद्रीनारायण यांची काळ्या पाषाणातील प्रतिमा शोधून काढली . तिला येथील मूळ  गरम पाण्याच्या कुंडाच्या झऱ्याजवळील एका गुहेत ठेवले होते. सोळाव्या शतकात गढवालच्या राजाने तिची सध्याच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा केल्याचे सांगितले जाते.

पश्चिम गढवालमधील स्वर्गरोहिणी नावाच्या शिखराच्या उतारावर चढत असताना, पांडव एकामागून एक कालबाह्य झाल्याचे संदर्भाने महाभारतात बद्रीनाथच्या सभोवतालच्या पर्वतांचा उल्लेख आहे . पांडव, बद्रीनाथ आणि बद्रीनाथच्या उत्तरेला 4 किमी अंतरावर असलेल्या माना या शहरातून स्वर्गाकडे जात होते . मानामध्ये एक गुहा देखील आहे, जिथे महर्षी व्यासांनी महाभारत लिहिले. 

हेच माना गाव सध्याच्या नेपाळ सीमेवरील भारतातील शेवटचे गाव आहे.

आपल्या प्रियजनांसाठी प्रसाद, फोटो, रुद्राक्ष माळा इत्यादी  खरेदी करून आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो.  परतताना जोशीमठ मार्गे रुद्रप्रयाग जवळील श्रीनगर येथे पोहोचलो.

रस्त्यात लागणाऱ्या देवप्रयाग येथे अलकनंदा व भागीरथी नदीचा संगम आहे. दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या रंगातील वेगळेपण ठळकपणे दिसून येते. 

मुख्य यात्रा तर संपली होती. आता केवळ ऋषिकेश आणि हरिद्वार, दिल्ली मार्गे परतीचा प्रवास एवढे शिल्लक राहिले.

मनावरील मोठे ओझे उतरून मन अगदी हलके झाल्याचे अतिशय स्पष्टपणे अनुभवत होते. एक फार मोठे कार्य आपल्या हातून यशस्वीरीत्या पार पाडल्याचे समाधान जाणवत होते. या भारलेल्या अवस्थेतच श्रीनगर येथील हॉटेलला मुक्कामी पोहोचलो.

हिमालयातील या नऊ दिवसांच्या अतिशय अवघड प्रवासात एक गोष्ट अतिशय ठळकपणे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, एवढ्या अरुंद, वळणवळणाच्या, पर्वतीय आणि अवघड रस्त्याने मार्गक्रमण करत असताना, नऊ दिवसात एकदाही आम्हाला गाडीचा अगर गाडी चालकाचा त्रास झाला नाही. दोन्हीही गाड्यांचे वाहन चालक अतिशय कुशल आणि मनमिळाऊ होते. त्यांच्या कौशल्यामुळे आमची यात्रा सुखरूप पार पडली यात तिळमात्र शंका नाही. त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहे.








टिप्पण्या

  1. खुप खुप सुंदर वर्णन आता धावपळ,टेन्शन संपून घराची आठवण यायला लागली होती मात्र मागचे दहा दिवस कसे गेले हे कळलेच नाही तसेच आता होते आहे घोलप साहेब पुढच्या दिवसाचे प्रवास वर्णन आणि त्यासोबत फोटो कधी टाकतील याची उत्सुकता लागत होती ......पोतदार

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1. आमची श्री जगन्नाथ पुरी यात्रा

2. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - , कोणार्क

4. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - गंगासागर