8. आमची उत्तराखंड चार धाम यात्रा - आठवा दिवस - 11/5/22
आमची उत्तराखंड येथील चारधाम यात्रा दि. ११/५/२२ दिवस - आठवा
मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे पंच केदार मंदिरांमध्ये भगवान शिवाच्या दर्शनाची यात्रा पूर्ण केल्यानंतर , भगवान विष्णूचे बद्रीनाथ मंदिरात दर्शन घेणे हा एक अलिखित धार्मिक विधी मानला जातो. आता आमचे शेवटचे उद्दिष्ट तेच आहे.
आजचा दिवस हा बद्रीनाथ पर्यंतचा 180 किमी चा केवळ प्रवास असणार आहे. कालचा थकवा, जागरण यामुळे आज निवांतपणे सकाळी 10 वाजेच्या सुमारास प्रवासास सुरवात केली. कालच्या थरारक यात्रेविषयी किती अन काय सांगू असे प्रत्येकाला झाले होते. आपले अनुभव इतरांना सांगण्यासाठी प्रत्येक जण आतूर होता.
पुढे गुप्तकाशी जवळ उखीमठ (ओखीमठ) हे रुद्रप्रयाग जिल्ह्यातील एक लहान शहर आणि हिंदू तीर्थक्षेत्र आहे. हिवाळ्यात, केदारनाथ मंदिर आणि मध्यमहेश्वर मंदिरातील मूर्ती उखीमठ येथे आणल्या जातात आणि सहा महिने येथे पूजा केली जाते . बाणासुराची मुलगी उषा आणि भगवान कृष्णाचा नातू अनिरुद्ध यांचा विवाह येथे पार पडला. उषाच्या नावावरून या जागेला उषामठ असे नाव पडले, जे आता उखीमठ म्हणून ओळखले जाते.
हिवाळ्यात, केदारनाथ आणि मध्यमहेश्वर मंदिरे, या परिसरात होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील बर्फवृष्टीमुळे बंद असतात. त्यामुळे केदारनाथ आणि मध्यमहेश्वरच्या मूर्ती उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात आणून हिवाळ्यातील 6 महिने येथेच पूजा केली जाते. आमच्या दुर्दैवाने येथे आम्हाला दर्शन घेता आले नाही.
हा देवभूमीचा संपूर्ण प्रदेशच हिमालयाची पर्वतशिखरे, दऱ्या - खोऱ्यानीं व जंगलातील वृक्ष राजीने व्यापलेला असल्याने त्याचे वर्णन तरी किती आणि कसे करावे. आपले शब्द अपुरे पडतात. एकच करू शकतो. होता होईल तितके डोळ्यात व मनात साठवित जायचे. आणि हेच करीत मार्गक्रमण सुरू होते. रस्त्यात नगरासु येथील एका हॉटेलात फार दिवसांनी महाराष्ट्रीयन पध्दतीचे जेवण मिळाल्याने सर्वच सुखावले.
फाटा येथून निघाल्यानंतर रुद्रप्रयाग जिल्ह्यातील अगस्त्यामुनी, तीलवारा, नगरासू, कर्णप्रयाग, नंदप्रयाग, पिपलकोटी, हेलम अशा अलकनंदा नदीच्या काठावरील गावांमधून जात पुढे रस्त्याने जोशी मठ आणि शेवट बद्रीनाथ येथे पोहोचता येते.
केदारनाथ प्रमाणेच हिवाळ्यात, बद्रीनाथ मंदिर तेथे होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील बर्फवृष्टीमुळे बंद असते. त्यामुळे बद्रीनाथची मूर्ती जोशीमठ येथील श्रीनृसिंह मंदिरात आणून हिवाळ्यातील 6 महिने येथेच पूजा केली जाते. आमच्या दुर्दैवाने येथेही आम्हाला दर्शन घेता आले नाही. पण घेतलेल्या माहितीनुसार
जोशीमठ, हे ज्योतिर्मठ नावानेही ओळखले जाते, हे हिमालयातील अनेक गिर्यारोहण मोहिमा, ट्रेकिंग ट्रेल्स आणि बद्रीनाथसारख्या तीर्थक्षेत्रांचे प्रवेशद्वार असून, हे आदि शंकराने स्थापन केलेल्या चार प्रमुख पिठांपैकी एक आहे
जोशीमठ छावणी हे उत्तराखंडमधील भारतीय लष्कराच्या महत्त्वाच्या लष्करी केंद्रांपैकी एक आहे . 2013 च्या केदारनाथ पूरग्रस्तांच्या बचावासाठी हे बेस कॅम्प म्हणून वापरले गेले.
नृसिंहाचे (भगवान विष्णूचे) प्राचीन मंदिर हे जोशीमठाचे मुख्य मंदिर आहे असून यात शंकराचार्यांनी स्थापित केलेली भगवान नृसिंहाची मूर्ती आहे.
एक मान्यतेनुसार या मूर्तीचा डावा हात केसांसारखा पातळ झाला आहे. ज्या दिवशी तो खंडित होईल त्या दिवशी बद्रीनाथच्या वाटेवर वसलेले नर-नारायण पर्वत जोडून एक होतील आणि सध्याच्या मंदिरातून केदारनाथ आणि भगवान बद्रीनाथ अदृश्य होऊन जोशीमठापासून 10 किमी अंतरावर असलेल्या भविष्य केदार मंदिरात पुन्हा प्रकट होतील.
ही सर्व माहिती घेत, शिव, विष्णू व समर्थांच्या नामाचा जप करीत रात्री 11.30 वा बद्रीनाथ ला पोहोचलो. रस्त्यात अनेक ठिकाणी भुसस्खलन झालेले आढळले. त्यामुळेच पर्यटकांना रस्त्यावर थांबू दिले जात नाही. थंडी भयानक होती. 2 ते 3 अंशाच्या दरम्यान तापमान खाली आलेले होते.
येथेही आम्हाला नियोजनातील अव्यवस्थेचा फटका बसला. ऐन वेळेवर रूम्स, त्याही फक्त 3 देण्यात आल्या. देण्यात आलेले जेवण अतिशय खालच्या प्रतीचे होते. केवळ नाईलाज म्हणून आम्हास हे सहन करावे लागले.
असो...
सुंदर अत्यंत सुंदर घोलप जी आम्ही दिनांक 18 5 2023 रोजी उत्तराखंड यात्रा करणार आहोत पण त्याआधीच यात्रा केल्याचा आनंद अनुभव आपल्या प्रवास वर्णनाने खूप मजा आली प्रत्यक्ष प्रवास केल्याचा आनंद मिळाला आपला हा अनुभव आम्हाला उत्तराखंड प्रवास करताना उपयोगी पडेल त्याबद्दल शंकाच नाही त्याबद्दल पुनश्च धन्यवाद देत आहे नरेश बोरसे
उत्तर द्याहटवा