7. आमची उत्तराखंड चार धाम यात्रा - सातवा दिवस - 10/5/22

 आमची उत्तराखंड येथील चारधाम यात्रा दि. १०/५/२२ दिवस - सातवा 

मागील लेखात लिहिल्याप्रमाणे उत्तराखंड येथील चारधाम पैकी यमुनोत्री व केदारनाथ या दोन स्थळांना भेट देण्यासाठी कोणत्याही प्रकारे वाहनाची सोय नाही. येथे पायी अगर खेचरावरच जावे लागते. केदारनाथ साठी हेलिकॉप्टर सेवा आहे, पण ती पूर्णपणे वातावरणावर अवलंबून असते. 

आम्हाला शेवटपर्यंत हेलिकॉप्टर सेवा न मिळाल्याने आम्ही पहाटे 3 ला निघून सोनप्रयाग पर्यंत आमची गाडी, तेथून स्थानिक जीपने गौरीकुंडा पर्यंत पोहोचलो. येथे पुन्हा काठ्या खरेदी केल्या. (या काठ्यांचा मोठा किस्सा आहे, पण तो नंतर केंव्हा तरी). गर्दी एवढी होती की तुमची एकमेकांपासून ताटातूट होतेच. तरीही आम्ही दोन ग्रुप मध्ये एकत्र राहू शकलो.

गौरीकुंडाला पोहोचेपर्यंत पहाटेचे पाच वाजले होते, तरीही खूप उजेड पडलेला होता. येथे गरम पाण्याचे कुंड आहे. त्यात आंघोळी उरकल्या. येथे आम्हाला श्रीरामपूर येथील सैन्य दलातील जवानांचा एक ग्रुप भेटला. दुर्दैवाने गौरीकुंडावरच त्यांच्यापैकी एकाची पँट चोरीला जाऊन पंधरा-वीस हजाराचे नुकसान झाले. असो गर्दी आली की चोर आलेच. त्यांना तर ही सुवर्णसंधी. आवरून चहा घेऊन पुढे निघालो.

केदारनाथ साठी गौरीकुंडपासून 22 किलोमीटर (14 मैल) चढाईने पोहोचावे लागते . यमुनोत्री प्रमाणेच येथे देखील डोली, पिट्टू किंवा खेचर याचा पर्याय उपलब्ध असतो. जवळपास 18 ते 22 किलोमीटरचे अंतर डोंगरावरील चढण आहे. अतिशय अवघड वळणावळणाचा, ओबडधोबड आणि खूप अरुंद रस्ता., केवळ  सात ते आठ फुट रुंदीचा.  त्यात डोंगर पायी चढणारे, डोलीत बसून चढणारे,  घोड्यावरून जाणारे आणि पिट्टूत बसून जाणारे आणि तशाच प्रकारे परत येणारे भाविक. गर्दीच्या वेळेस चालणे तर अतिशय अवघड असते. जे धडधाकट आहेत किंवा पायऱ्या चढून जाऊ शकतात, ते पायी निघतात.  ज्यांना पायी शक्य नाही ते  घोड्यावरून जातात, ज्यांना घोड्यावरून देखील शक्य नाही ते डोली करून किंवा पिट्टू ला प्राधान्य देतात.   हर प्रकारे आपल्या देवापर्यंत पोहोचायचेच या भावनेतून लोक यातून सोयीचा पर्याय निवडतात. 

येथे गौरीकुंड येथील संस्थानच्या कार्यालयात घोडा चालक व यात्री यांची नोंद करून पैसे भरल्यानंतर पावती देतात. ती पावती आपण केदारनाथ ला वर पोहोचल्यावर घोडा चालकाकडे सुपूर्द करायची असते. शक्यतो उंच व दणकट घोडा निवडला म्हणजे चिंता नसते. आम्ही देखील सर्व जण घोड्यावर/खेचरावर  निघालो. माझ्या दुर्दैवाने म्हणा किंवा अज्ञानामुळे म्हणा, माझा घोडा छोटा निवडला गेला. 

आणि अशा रीतीने आमचा अतिशय उत्सुकता लागून राहिलेला प्रवास प्रत्यक्षात सुरू झाला. 

 रस्त्याने चालताना घोडे / खेचर यांची लीद, मलमूत्र किंवा पडणारा पाऊस यांच्यामुळे रस्ता अतिशय निसरडा होतो,. बऱ्याचदा पाय सटकणे किंवा घोड्यांचा पाय सटकून, सवारीसह खाली पडणे या गोष्टी घडतात.  रस्त्याच्या एका बाजूने उंचच उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूने खोलवर पसरलेली दरी., त्याचप्रमाणे डोंगराकडील बाजूच्या कडा अनेक ठिकाणी रस्त्यावर खाली आलेल्या आहेत. त्यामुळे घोड्यावर बसलेल्यांना खूप लक्ष ठेवावे लागते, कधी कपाळमोक्ष होईल हे सांगता येत नाही.

बसण्याची देखील एक कला आहे . जेव्हा वर चढत असतो, त्यावेळेस पुढे वाकून बसायचे असते आणि जेव्हा आपण रस्ता उतरत असतो, त्यावेळेस आपला पूर्ण भार मागच्या बाजूला घेऊन पाय रिकीबीत अडकवून पुढे लांब करायचे असतात जेणेकरून तुम्ही संतुलितपणे बसू शकतात.  अशा अवघड परिस्थितीत वाटचाल करावी लागते. अनेक ठिकाणी आपल्या शहरातील रस्त्यांसारखे ट्रॅफिक जॅमच्या घटनाही आढळतात. रस्त्यात ठिकठिकाणी लिंबू सरबत, थंडपेय, नाश्ता इत्यादींची छोटी छोटी दुकाने आहेत. 

रस्त्यात काही ठिकाणी घोड्यांना पाणी पाजणे, थोडी विश्रांती देणे, चालकाला चहा, नाश्ता देणे ई साठी थोडा थोडा वेळ घेऊन मार्गक्रमण सुरू असते. घोडेचालक सतत घोड्याशी बोलत , त्याला प्रोत्साहित करीत चालवीत/पळवीत असतो. बरोबरीने आपल्या बरोबर, कधी सोबत्यांबरोबर गप्पा मारत असतो. अशात मोठया उत्सुकतेने व अधिरपणाने आजूबाजूचे नयनरम्य, भीतीदायक दृश्य बघत, कधी मधूनच येणाऱ्या पावसाची मजा घेत दऱ्या, डोंगर बघत प्रवास सुरु असतो. आमच्या नशिबाने आम्हाला कुठेही पाऊस लागला नाही. 

रस्त्यात दोन ते तीन ठिकाणी पर्वत शिखरावरून खाली दरी पर्यंत वाहून आलेला व जमा झालेला बर्फ आहे. तो पार करून आपल्याला डोंगरकपारीने पुढे मार्गक्रमण करावे लागते. प्रत्यक्ष बर्फात चालण्याचे समाधान येथे मिळाले.

माझे नशीब मात्र मला येथेही आडवे आले. पहिल्याने एका ठिकाणी माझ्या घोड्याचा पाय सरकला व त्याच्यासह मी खाली पडलो. परंतु थोडासा सावध असल्यामुळे मला फार काही इजा झाली नाही. परत काही किलोमीटर अंतर पुढे गेल्यावर, परत एकदा घोडयाचा तोच पाय घसरला व मी जोराने खाली पडलो. माझा डावा पाय खाली - त्यावर घोडा - उजवा पाय वरच्या बाजूला रिकीबीत अडकलेला - मी अशा अवघड स्थितीत खाली पडून राहिलो. दोघा तिघांनी पाय मोकळे करून घोड्याला व मग मला उठवले.  नशिबाने फ्रॅक्चर नव्हते, परंतु मार चांगला लागला होता. दुर्दैवाने एकही जोडीदार मागेपुढे किंवा सोबत नव्हता. मी बराच वेळ थांबून पुढे जायचे की नाही याचा अंदाज घेतला. घोडा चालक मुलगा ऐकायला तयार नव्हता, " साहब मै आपको ठिक से ले जाऊंगा,  आप डरो मत" असे म्हणत मला प्रोत्साहित करत धीर देत होता. तोही घाबरून गेला होता, पण त्याची भीती वेगळी होती. मी नकार दिला तर त्याचा रोज बुडणार होता.  केदारनाथ दर्शनाची उत्कट व प्रबळ इच्छा, भीतीने का होईना, पण चढा आल्यावर उतरून घ्यायचे व थोडं सोपं वाटलं की घोड्यावर परत बसायचे असे ठरवून मी पुन्हा सवार झालो आणि शेवटपर्यंत पोहोचलो. भोलेनाथाचा आशीर्वाद होता, मी दोन्ही वेळेस दरीच्या बाजूने पडलो नाही.  (त्याने सांगितले नाही, पण मला बाकीच्या चालकांकडून कळाले की माझ्या घोड्याच्या पायाची नाल निखळलेली होती म्हणून त्याचा पाय वारंवार सटकत होता) (हा प्रसंग कायमस्वरूपी मनावर कोरला गेला. चार धाम यात्रेला गेलेला माणूस परत आला तर आपला... असे जुने लोक का म्हणत ते मी प्रत्यक्ष अनुभवले.)

घोडेतळापासून मंदिर साधारणपणे 2 किमी असून, पायीच जावे लागते. आजूबाजूला सर्व बाजूंनी केवळ आणि केवळ बर्फाच्छादित डोंगर दिसत होते. अतिशय थंड आणि उल्हसित वातावरण. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक तर देव भेटिचा आनंद किंवा देव भेटीची उत्सुकता दिसून येत होती. याला स्वर्ग का म्हणतात ते तिथे प्रत्यक्ष अनुभवायला येत होते. या परिस्थितीचे वर्णन करायला माझेच काय,  कोणाचेही शब्द फिके पडावेत. एक बाजूला सैन्यांचे तंबू, व  यात्रेकरूंना राहण्यासाठी काही खाजगी समूहांचे तंबू,  डाव्या हाताला हेलिकॉप्टर तळ,  दर दोन मिनिटाला उड्डाण घेणारे किंवा वरती येणारे  हेलिकॉप्टर, सतत कानावर पडणारी त्यांची घरघर,.  पुढे मंदिरापासून अर्धा किमी अंतरावर यात्रेकरूंची दर्शनासाठीची रांग लागली. आम्ही येथे मुक्काम करणार नसल्यामुळे एवढा वेळ घालवणे शक्य नव्हते, म्हणून थेट मंदिरापर्यंत जाऊन एका पुजाऱ्याच्या मदतीने मंदिरात प्रवेश मिळवला. गर्दीतच ढकला-ढकलीत काही मिनिटांचेच दर्शन झाले व बाहेर आलो. आतापर्यंत केवळ, फोटो, पिक्चर मधेच पाहिलेल्या  मंदिर व परिसराचे  मनसोक्तपणे प्रत्यक्ष अवलोकन करत राहिलो. ज्या शिळेमुळे 2013 च्या प्रलयामध्ये मंदिर सुरक्षित राहिले, त्या भीम शिळेला प्रदक्षिणा घातली, श्रद्धेने नमस्कार केला. ही शिळा म्हणजे एक चमत्कारच आहे. कुठून आणि कशी आली असावी याचा उलगडाच होत नाही, मती गुंग होते विचार करून. 

हिंदू पौराणिक कथांनुसार , शिवाचे सर्वात पवित्र हिंदू मंदिर म्हणून मान्यता असलेले हे मंदिर सुरुवातीला पांडवांनी बांधले होते आणि ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले आणि सर्वात उंच आहे.  

गढवाल प्रदेश, भगवान शिव आणि पंच केदार मंदिरांच्या निर्मितीशी संबंधित अनेक लोककथा सांगितल्या जातात.

पंच केदार बद्दलची एक लोककथा पांडवांशी संबंधित आहे.  महाभारतातील युद्धात पांडवांनी  कौरवांचा पराभव करून ठार मारले . युद्धादरम्यान आपल्या भावांची व ब्रह्मवृंदाची हत्या आपल्या हातून झाल्याने (भ्रातृहत्त्या व ब्रह्महत्या) या पापांचे प्रायश्चित करण्याची त्यांची इच्छा होती . त्यासाठी ते  शिवाच्या शोधण्यासाठी निघाले. प्रथम, ते शिव भगवंताच्या आवडत्या वाराणसी (काशी) या पवित्र शहरात गेले. पण युद्धातील अगणित मृत्यू आणि अप्रामाणिकपणामुळे शिव भगवान खूप चिडले होते आणि त्यामुळे पांडवांना त्यांना टाळायचे होते.   म्हणून, देवाने बैलाचे ( नंदी ) रूप धारण केले आणि ते गढवाल प्रदेशात लपले.

वाराणसीत शिव भगवान न सापडल्याने पांडव हिमालयात गेले . भीम दोन पर्वतांवर उभे राहून शिवाचा शोध घेऊ लागला. त्याने गुप्तकाशी जवळ एक बैल चरताना पाहिला. (गुप्त काशी अर्थात "लपलेली काशी" - हे नाव शिवाच्या स्वतः ला लपविण्याच्या कृतीवरून आले आहे असे म्हणतात). भीमाने तो बैल शिव असल्याचे लगेच ओळखले. भीमाने बैलाला शेपटीने व मागच्या पायांनी पकडले. पण बैलाचे रूप असलेला शिव जमिनीत अदृश्य होऊन नंतर काही भागांमध्ये पुन्हा प्रकट झाला. (केदारनाथमध्ये कुबड, तुंगनाथमध्ये हात, रुद्रनाथमध्ये चेहरा, मध्यमहेश्वरमध्ये नाभी आणि मध्येकल्पेश्वर मध्ये पोट पृष्ठभाग व केस या स्वरूपात)   

दुसऱ्या एका मान्यतेनुसार भीमाने केवळ बैल पकडलाच नाही तर त्याला गायब होण्यापासून थांबवले. परिणामी, बैलाचे पाच तुकडे होऊन हिमालयातील गढवाल भागातील केदारखंडातील पाच ठिकाणी दिसले. (पंच केदार). पांडवांनी मंदिरे बांधून, मोक्षासाठी केदारनाथ येथे ध्यान केले.

उत्तर भारतातील 2013 मध्ये आलेल्या महापुराचा केदारनाथला सर्वात जास्त फटका बसला होता . मंदिर परिसर, आजूबाजूचा परिसर आणि केदारनाथ शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, परंतु उंच पर्वतांवरून वाहणाऱ्या ढिगाऱ्यांमुळे एका बाजूला काही भेगा वगळता मंदिराचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. ढिगाऱ्यांमधील एक मोठा खडक, ज्यामुळे मंदिराचे पुरापासून संरक्षण झाले, त्याला देवाचा खडक (भीम शीळा) म्हणून मोठया श्रद्धेने लोक त्याची पूजा करतात. 

 दर्शन झाले तरीही मन भरत नाही. काहीशा अतृप्त मनाने परतीला लागलो. हे होते कुठे तोपर्यंत पावसाला सुरवात झाली. व दहा मिनिटात थांबला देखील. एके ठिकाणी वाडीवर्हे येथील 65 ते 70 वयोगटातील एक जोडपे भेटले. मानवी मनाचे देखील एक विशेष आहे. परमुलखात आपल्या मुलखातील माणूस भेटले की फार आपुलकी वाटते. सकाळी आठला गौरीकुंडहून चालायला सुरुवात केली होती, ते आता सायंकाळी पाच वाजता वर पोहोचले. त्यांच्याकडे पाहिल्यावर आम्हालाच घोड्याने वर आल्याची लाज वाटली. 

असो पुन्हा घोडे तळावर येऊन घोडे मिळवणे व पायथ्यापर्यंत पोहोचणे हेच उद्दिष्ट समोर होते. अशात संध्याकाळ झाली होती आणि घोडे कमी होते, त्यामुळे व आमच्या शरीराकडे पाहून घोडे मिळणे बऱ्यापैकी अवघड गेले. कसेतरी घोडे मिळाले व परतीचा प्रवास सुरू झाला. चढण्यापेक्षा उतरण्याचा प्रवास अतिशय अवघड होता. उतरतांना घोडे अक्षरशः  उड्या मारत चालतात. सारखे घोड्यावर बसून व चालून इतके थकायला झाले होते की  शेवटचे तीन ते पाच किलोमीटर अंतर हे पायी उतरून जावे अशी प्रबळ इच्छा होत होती.  पण अंधार व पाऊस आणि नवखा प्रदेश यामुळे तसे करण्याची हिंमत झाली नाही. प्रत्येकाचीच हीच गत होती. शेवटी एकदाचे सर्वजण गौरीकुंडला सुखरूप पोहोचलो व तेथून जीपने सोनप्रयाग आणि पुढे आमच्या गाडीने गुप्तकाशी येथे मुक्कामी पोहोचलो.

अशा रीतीने अतिशय उत्सुकता असलेली परंतु अवघड यात्रा, आम्हाला सर्वांना एक अतिशय वेगळा अनुभव व यात्रा सुखरूप पार पडल्याचे समाधान देऊन गेली. आमच्या राजाभाऊ पोतदारांना तर अँजिओप्लास्टी झालेली असताना देखील आम्ही मोठया धाडसाने व हिमतीने वरपर्यंत घेऊन आलो, पण त्यांनी देखील धैर्याने यात्रा पूर्ण केली हे आमच्या यात्रेचे फार मोठे फलित मानावे लागेल. शेवटी तुमची मानसिकता व तुमची इच्छाशक्ती सर्वात महत्त्वाची, अर्थात त्याला परमेश्वराची साथ देखील पाहिजेच.

पंच केदार मंदिरांमध्ये भगवान शिवाच्या दर्शनाची यात्रा पूर्ण केल्यानंतर , भगवान विष्णूचे बद्रीनाथ मंदिरात दर्शन घेणे हा एक अलिखित धार्मिक विधी मानला जातो. आता आमचे शेवटचे उद्दिष्ट तेच आहे.














टिप्पण्या

  1. वा व विलास अतिशय अवघड दिव्यसच्‍या प्रवासाचे कुठला ही प्रासंग किन्‍वा बाब नविसर्त मोजक्‍या शब्ददत्त वर्णवर्ण्‍वर्णन केल्‍या खुप खुप चान मनपुर्वक अभिनंदन व अभार. माझ्या बाबीत म्हटल तार मी अँजिओप्लास्टी झाली 4 stain टकले ले EF ३५% pan भोलेनाथ कृपेने कुतुल्यहि त्रसविना मस्त दर्शन करुन्न आनन्दत खाली आलो

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद घोलप साहेब आमची झालेली परेशानी तुम्ही वर्णन केली त्यामुळे इतर यात्रेकरू गौरीकुंडावर सावधगिरी बाळगतील अशी अशा व्यक्त करतो.

    उत्तर द्याहटवा
  3. सर, खरच इतकं सुंदर लिखाण अचुत गोडबोले च्या माझी प्रवास वर्णने यातच वाचली आणि आता तुमची वर्णने.. खूपच अप्रतिम सगळं कस स्वच्छ डोळ्यांसमोर उभं राहतं.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1. आमची श्री जगन्नाथ पुरी यात्रा

2. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - , कोणार्क

4. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - गंगासागर