6. आमची उत्तराखंड चार धाम यात्रा - सहावा दिवस - 9/5/22
आमची उत्तराखंड येथील चारधाम यात्रा दि. ९/५/२२ दिवस - सहावा
काल गंगोत्री चे दर्शन आटोपल्यानंतर आजचा दिवस हा केदारनाथच्या दिशेने उत्तर काशी ते गुप्तकाशी असा केवळ प्रवासाचाच होता. उत्तर काशी शहर सोडताना नदीकाठी दोन्ही बाजूने डोंगरउतारावर वसलेले हे विस्तीर्ण पसरलेले शहर आपले खरे रुपडे दाखवते.
विशेषतः बैठ्या आकाराचे किंवा जास्तीत जास्त 2 ते 3 मजली उंच व लांबच लांब आकाराच्या रंगीत इमारती. जवळपास सर्व घरांना रंग दिलेला दिसतो. त्यामुळे नजारा अतिशय खुलून दिसतो. आजूबाजूचे वातावरण देखील या सौन्दर्यामध्ये भर घालते. डोंगर रांगा, त्याच्या उतारावर झाडी, झाडांमध्ये घरे, त्याही खाली नदीचे झुळझुळ वाहणारे पाणी अतिशय मनोहारी दृश्य. काय निसर्गाची किमया आहे !!! जबरदस्त !!!
थोडे पुढे गेल्यानंतर डोंगर उतारांवरच शेती केलेली दिसते. येथे पर्वतीय प्रदेशामुळे शेतीला विस्तीर्ण असे क्षेत्र नाही. डोंगर उतारावरच थोड्या थोड्या अंतरावर बांध घालून शेती केली जाते. ही बांधाची शेते देखील दुरून खूपच सुंदर दिसतात.
चमीयाला, चिरबटीया, तीलवाडा (रुद्रप्रयाग) अशी गावे पार करीत आम्ही सायंकाळी मुक्कामी पोहोचलो. येथेही अव्यवस्थेची पुनः येरे माझ्या मागल्या.. ऐन वेळी हॉटेल बदलेले गेले, पुन्हा 3-4 जण मिळून एक रूम..
अर्थात आम्ही याकडे आता दुर्लक्ष करायला शिकलो होतो. कारण आता यात्रा सुखरूप पार पाडायची होती. उद्या केदारनाथ साठी लवकर निघायचे असल्याने रात्री 2 ला उठून 3 पर्यंत निघायचे होते. त्यामुळे व दिवसभराच्या प्रवासाच्या थकव्याने गप्पा मारत सर्व लगेच झोपी गेलो.
केदारनाथला जाण्यासाठी सर्व खाजगी गाड्या सोनप्रयाग पर्यंत जातात. सोनप्रयाग येथून गौरीकुंडापर्यंत साधारण दहा ते पंधरा किलोमीटरचे अंतर हे तेथील स्थानिक जीप गाड्यांमधून किंवा बसने प्रवास करून करायचा असतो व गौरीकुंड येथून केदारनाथला चढाई करण्यासाठी सुरुवात करायची असते.
रस्त्यातील निसर्गाचे सुंदर रेखाटन
उत्तर द्याहटवा