4. आमची उत्तराखंड चार धाम यात्रा - चौथा दिवस - 7/5/22
आमची उत्तराखंड येथील चारधाम यात्रा
दि. ७/५/२२ (दिवस - चौथा)
बारकोटहुन गंगोत्री ला जाण्यासाठी उत्तर काशी मार्गे जावे लागते. अतिशय अवघड रस्ता असल्यामुळे रस्त्यात उत्तरकाशी येथे मुक्काम करावा लागतो. आम्हीही सकाळी लवकर उठून ताजेतवाने होऊन उत्तरकाशीसाठी रवाना झालो. त्या अगोदर बारकोट येथील हॉटेलच्या गच्चीमध्ये उभे राहिल्यावर जे नयनरम्य दृश्य समोर दिसत होते ते खरोखर अवर्णनीय असेच होते. निसर्गाने भरभरून आपले दान यांच्या पदरात दिले आहे. जिकडे पहावे तिकडे मोठमोठे डोंगर, त्यावर पसरलेली उंच उंच झाडांची प्रचंड वृक्षराजी. रस्त्याने लागणाऱ्या अशाच अनेक ठिकाणांचा आनंद घेत, फोटोग्राफी करत प्रवास चालला होता. ड्रायव्हर ने राजमार्ग सोडून एक शॉर्टकट्ने गाडी घेतली होती. रस्ता अत्यंत अवघड, वळणावळणाचा, ओबडधोबड होता, जर गाडीचे टायर पंचर झाले तर दूर दूर पर्यंत कोणतीही मदत मिळणे अवघड,. आम्ही तर जीव मुठीत घेऊनच बसलो होतो. रस्त्यात एका उंचशा ठिकाणी एक छोटीशी वस्ती वजा गाव होते. तेथे नवनाथांपैकी मिननाथांचे मंदिर पाहून व तेथील दर्शन घेतल्यावर खूप हायसे वाटले. जिवात जीव आल्यासारखे वाटले. येथे टोप्या, शॉल, इ. थोडीसी खरेदी देखील झाली.
यथावकाश उत्तरकाशीला पोहोचलो. हॉटेलला जाण्या अगोदरच गावात अतिशय सुप्रसिद्ध असलेल्या श्री काशी विश्वेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी गेलो.
श्री काशी विश्वनाथ मंदिर हे हिंदूंच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी सर्वात प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे. हे मंदिर भागीरथी नदीच्या काठी वसलेले आहे. भागीरथी नदी गंगोत्री धाम येथून येते. मंदिराच्या आजूबाजूला भव्य अशी पर्वतराजी आढळते.
उत्तरकाशीतील हे मंदिर त्याच्या लोकप्रियतेमुळे चार धाम यात्रेचा एक भाग मानले जाते, जे यात्रेकरू गंगोत्री धामला भेट देतात, ते नक्कीच उत्तरकाशीच्या या प्रसिद्ध मंदिरात भगवान शंकराचे दर्शन घेतात. असे मानले जाते की हे मंदिर परशुरामाने बांधले होते.
श्री काशी विश्वनाथ मंदिरात भगवान शिवाच्या शिवलिंगा बरोबरच, मंदिराच्या गर्भगृहात देवी पार्वती आणि भगवान गणेश देखील आहेत. मंदिराच्या बाहेरच्या खोलीत नंदिनी आहे. साक्षी गोपाळ आणि ऋषी मार्कंडेय यांची मूर्ती ध्यानस्त आहे.
विश्वनाथ मंदिरासमोर शक्ती मंदिर आहे, जे देवी पार्वतीला समर्पित आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे एक प्रचंड आणि जड त्रिशूळ - ज्याची उंची सुमारे 26 फूट आहे. आईची शक्ती येथे एक विशाल त्रिशूळ म्हणून पाहिली जाते, जे त्रिशूल 1500 वर्षांहून अधिक जुने असल्याचा अंदाज आहे आणि हे त्रिशूल उत्तराखंडमधील सर्वात प्राचीन अवशेषांपैकी एक मानले जाते. देवी दुर्गाने ही शक्ती भूतांवर फेकली होतीअसे म्हणतात.
त्रिशूलाचे एक आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे ते तुमच्या संपूर्ण शरीराच्या बळाने हलवता येत नाही, परंतु तुम्ही ज्या क्षणी तुमच्या एका बोटाने दबाव टाकता त्या क्षणी ते कंप पावते.
येथुन हॉटेलवर पोहोचलो. येथे सुरवातीला ठरवलेल्या हॉटेल पेक्षा दुसरेच हॉटेल दिले गेले व तेथेही 14 जणांसाठी फक्त 3 रूम्स.
जेवणाचीही ऐसी की तैसी. मग काय, मस्तपैकी सोबत असलेल्या भेळीचे पुडे काढले. सोबत घेतलेले कांदे - कैऱ्या कापून, सोबतीला घरून आणलेल्या विविध पराठे, चटण्या, लाडू इ. अगदी गावरान बेत. सगळ्यांनी गोलाकार बसून सर्व पदार्थांवर मनसोक्त ताव मारला. रात्रीचे जेवण म्हणजे खिचडी भात, बटाट्याची भाजी. या भागात आल्यावर जेवणाचीही एक विशेषता दिसून आली, ती म्हणजे प्रत्येक ठिकाणी बटाट्याचा मनसोक्त वापर. सकाळ्च्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सर्वात बटाटे. त्यामुळे दोन दिवसातच बटाटे नकोसे झाले. यात्रेचा मूळ उद्देश निसर्ग/प्रकृती दर्शन व देवदर्शन असल्यामुळे या अडचणी कडे आम्ही दुर्लक्ष करत गेलो. सायंकाळी बराच काळ लाईट ही नव्हती. रात्री लवकरच गप्पांच्या नादात केंव्हा निद्राधीन झालो ते कळाले देखील नाही.
ड्रायव्हर ने short cut मारला तो प्रसंग अजुन ही अठवतो Thrilling प्रवास केला आम्ही तो प्रवासात घर गाव पूर्ण विसृण गेलो होतो अप्रतिम निसर्ग डोल्या त साठवुन घेत होतो
उत्तर द्याहटवाविलास एक वर्षाने सुधा खुप छान वर्णन
मस्त मस्त,,,,,, पोतदार