11-12. आमची उत्तराखंड चार धाम यात्रा - अकरावा-बारावा दिवस - 14-15/5/22

 आमची उत्तराखंड येथील चारधाम यात्रा 

दि. १४-१५/५/२२ 

दिवस - अकरावा-बारावा 

14.5.22

यात्रेच्या नियोजनाप्रमाणे आजचा दिवस हरिद्वार येथील मुक्काम व उद्या निघून दिल्ली मार्गे नाशिकला प्रयाण असा होता., परंतु हरिद्वार येथे फक्त मनसादेवी व चंडी देवी ही दोनच ठिकाणी बघावयाची असल्यामुळे बराचसा वेळ हाती राहणार होता, त्यामुळे आम्ही दुपारपर्यंत ही दोन्ही स्थळे करून, मुक्कामासाठी दिल्लीची निवड केली, जेणेकरून, उद्या दुपारपर्यंत होईल तेवढे दिल्ली दर्शन करता येईल. त्याप्रमाणे नियोजन केले. 

हरिद्वार येथील गंगा घाटावरील आरती पहिल्या दिवशीच झाली होती. त्यामुळे आकर्षण असलेले मनसादेवी मंदिर पाहण्यास गेलो. 

हे मंदिर हिमालयाच्या दक्षिणेकडील पर्वत शृंखला असलेल्या शिवालिक टेकड्यांवर बिल्व पर्वतावर स्थित आहे . हे बिल्व तीर्थ म्हणून ओळखले जाते. 

शिवाची मनुष्य रूपातील मानसकन्या माता मनसा देवी हिच्या दर्शनाने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात., अशी मान्यता आहे.  उंच पर्वतावर वसलेल्या मातेच्या या मंदिरासाठी पायऱ्यांसोबतच रोपवेची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. अनेक भक्त येथे आल्यावर आपली इच्छा व्यक्त करून  येथील झाडाला एक धागा बांधतात आणि कालांतराने इच्छा पूर्ण झाल्यावर पुन्हा तो धागा सोडण्यासाठी येतात अशी मान्यता आहे. देवी मातेच्या मंदिरा सोबतच इतरही काही मंदिरे येथे आहेत. उंच टेकडीवरून गंगेच्या आजूबाजूने असलेले संपूर्ण हरिद्वार खूपच सुंदर दिसते. 

येथून तीन किलोमीटर अंतरावर समोरच्याच दुसऱ्या टेकडीवर चंडी मातेचे मंदिर आहे.  हे मंदिर हिमालयाच्या दक्षिणेकडील पर्वत शृंखला असलेल्या शिवालिक टेकड्यांच्या पूर्व - नील पर्वताच्या शिखरावर आहे.  राक्षस शुंभ आणि निशुंभ यांनी एकत्रितपणे चंडिका देवीला मारण्याचा प्रयत्न केला,  त्यावेळी देवीने त्यांचा वध केला आणि त्यानंतर चंडिकेने नील पर्वताच्या शिखरावर थोडावेळ विश्रांती घेतल्याचे सांगितले जाते.  तसेच पर्वत रांगेत असलेल्या दोन शिखरांना शुंभ आणि निशुंभ म्हणतात. ही दोन्ही मंदिरे हरिद्वारमधील पंचतीर्थांपैकी एक आहे. येथे जाण्यासाठी देखील रोपवेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे फारसा त्रास न होता दोन्हीही ठिकाणांची दर्शनं व्यवस्थित झाली. फक्त ऊन भरपूर होते, एवढाच काय तो त्रास. 

यानंतर लगेचच गाडीत बसून दिल्लीसाठी प्रयाण केले. अतिशय सुंदर रस्ते, आजूबाजूला अनेक मोठमोठया आस्थापना जसे की पतंजली योग विद्यापीठ वगैरे वगैरे.. सायंकाळपर्यंत दिल्ली येथे पोहोचलो. दुसऱ्या दिवसासाठी गाड्यांचे नियोजन केले.

15.5.22

आज सकाळी आठ साडेआठला गाड्या तयारच होत्या. तीन गाड्यांमध्ये आम्ही सर्व दिल्ली दर्शनासाठी निघालो. 

आमच्या ड्रायव्हरने नवी दिल्लीतील प्रमुख आकर्षण असलेले राजपथ, राष्ट्रपती भवन, संसद भवन, विविध देशांचे दुतावास,  मंत्री व खासदारांचा निवासी भाग, विविध विभागांचे राष्ट्रीय कार्यालय असे सर्व, शक्यतो गाडीतूनच दाखवत  जुन्या दिल्लीतील एका प्रसिद्ध अशा छोले भटूरे च्या हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी नेले. येथे अनेक मोठमोठ्या राजनैतिक व्यक्ती, मोठमोठे खेळाडू नाश्त्यासाठी येतात असे आमच्या ड्रायव्हरने सांगितले व त्यामुळेच तो आम्हाला येथे घेऊन गेला. एका अरुंद गल्लीत एक छोटेखाणी दुकान वजा हॉटेल आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे खरोखर गुणवत्ता अतिशय चांगली होती. 

त्यानंतर पुढे इंडिया गेट, लोटस टेम्पल बघून ग्रेटर नोयडातील स्वामीनारायण मंदिर दर्शनासाठी गेलो. जगातील 50 पेक्षा अधिक देशांमध्ये शाखा असलेले हे एक सर्वात मोठे मंदिर. जवळपास दीडशे एकरामध्ये बांधलेले. बांधकाम अतिशय भव्यदिव्य. राजस्थानी कारागिरांचे कोरीव काम आणि येथील शिस्त व स्वच्छता अप्रतिम. यामुळेच येथील वातावरण हे आपसूक अतिशय धीर गंभीर व पवित्र भासते. मनोभावे दर्शन घेऊन, सर्व मंदिर डोळ्यांमध्ये साठवत पुन्हा परतीला निघालो. 

रस्त्यात कुतुबमिनार येथे भेट दिली. इतिहासकालीन बांधकामाचा अति उत्तम नमुना म्हणून याकडे पाहिले जाते. परतीच्या गाडीची वेळ होत आली होती, म्हणून तेथून ड्रायव्हरने आम्हाला परस्पर दिल्ली स्टेशनवर सोडले. नावाप्रमाणे जॉली असलेल्या जॉलीसिंग ड्रायव्हरने आम्हाला दिवसभर गाईड आणि चालक अशा दोन्ही भूमिकेतून माहिती देत आमचे भरपूर मनोरंजन केले. बरोबर पाच वाजता गाडीने दिल्ली स्टेशन सोडले आणि आमच्या बारा दिवसाच्या यात्रेचा समारोप होऊन परतीच्या प्रवासाला लागलो. 

मंदिरे उघडल्यानंतर पहिल्याच आठवड्यात आम्ही सर्व ठिकाणी गेलो असल्यामुळे आम्हाला फार काही त्रास झाला नाही. परंतु आम्ही ऋषिकेशला  आल्यानंतर मिळालेल्या बातम्यांवरून यात्रेसाठी अचानक खूप गर्दी वाढल्यामुळे अनेक ठिकाणी चेंगराचेंगरी झाली तर काही वेळेस यात्रा थांबवण्याची देखील वेळ आली होती. आठ दिवसांत 70 ते 80 यात्रेकरूंचे जीव गेले.  सैन्याकडे यात्रेचा ताबा देण्यात आला. आम्ही सुदैवी की आम्ही यात न अडकता सुखरूप खाली उतरून आलो.

थोड्याच वेळात आमच्यासाठी एक सरप्राईज होते. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे जोडीदारांनी दिल्लीतूनच गाडीमध्ये केक मागवण्याची व्यवस्था केली व चालत्या गाडीत केक कापून लग्नाचा वाढदिवस साजरा करून आम्हाला सुखद धक्का दिला. रात्रभर च्या प्रवासानंतर सकाळी आठ वाजता नाशिक रोडला पोहोचलो आणि खऱ्या अर्थाने यात्रेची सांगता झाली.

बारा दिवस घराबाहेर होतो परंतु एकदाही घराची कोणाला आठवण आली नाही. सर्व एकमेकांशी अगदी  मिसळून गेले होते. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात, स्वभावाला औषध नसते. परंतु आमचे चारधाम पैकी पहिलेच आणि सर्वात अवघड धाम श्री केदारनाथ ची यात्रा अतिशय सुखरूपपणे पार पडली.  गालबोट होते ते फक्त यात्रा आयोजकाचे. सिक्स सिझन ट्रॅव्हल्स मालकास दुषणे द्यावी तेवढी थोडीच आहेत. त्याचे विरुद्ध गुन्हा देखील दाखल करता येऊ शकतो, परंतु देवदर्शन करून आल्यामुळे हे करणे आम्हास योग्य वाटले नाही, म्हणून मोठ्या मनाने त्याला माफ करून टाकले.

 आता पुढील उद्दिष्ट दुसरे धाम...


















टिप्पण्या

  1. श्री घोलप साहेबांनी उत्तराखंड चारधाम यात्रेचे १ ते १२ दिवसाचे प्रवास वर्णन चपखल शब्दांचा वापर करुन अतिशय वाचनीय केले. एक वर्षाच्या कालावधीनंतर देखील सर्व बारीक सारीक गोष्टींचा समावेश केला, तसेच काही ठिकाणांचे फोटोग्राफ्स प्रदर्शित केले त्यामुळे आपण प्रत्यक्ष त्या स्थळांना भेट देत असल्याची अनुभूती घेता आली. प्रत्येक दिवसाचे वर्णन वाचण्यासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. हे सर्व फक्त आपणच करु शकता.
    आपण वर्षा नंतर पुन्हा एकदा चारधाम यात्रा दर्शन घडवुन आणले त्याबद्दल आपले आभार!!..🙏🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1. आमची श्री जगन्नाथ पुरी यात्रा

2. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - , कोणार्क

4. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - गंगासागर