10. आमची उत्तराखंड चार धाम यात्रा - दहावा दिवस - 13/5/22

 आमची उत्तराखंड येथील चारधाम यात्रा दि. १३/५/२२ दिवस - दहावा 

आजचा प्रवास हा श्रीनगर (रुद्रप्रयाग) ते ऋषिकेश असा दीडशे किलोमीटरचा होता. सुरुवातीलाच श्रीनगर येथील हॉटेल उर्वशीला टाटा करून, येथील स्थानिक स्वयंभू श्री सिद्धटेक  कमलेश्वर महादेवाचे  मंदिरात दर्शन घेऊन पुढे निघालो. 

संपूर्ण रस्त्याने गंगेची सोबत असते. गंगा नदीच्या खोल व  रुंद पात्रामुळे येथे राफ्टिंग (साहसी नौकानयन) या खेळाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला दिसतो. गंगेच्या किनारी अनेक ठिकाणी याचे केंद्र उभारलेले दिसतात. अनेक साहसी प्रशिक्षित व शिकाऊ जलतरणपटू आपले कौशल्य आजमावित व  प्रशिक्षण घेत असतात. 

दुपारच्या सुमारास ऋषिकेश ला पोहोचलो. येथे  तापमानातील फरक लगेच जाणवतो. गेले दहा दिवस आम्ही हिमालयात अतिशय थंड वातावरणात होतो, मात्र येथे आल्याबरोबर तापमान 35 - 40 अंशापर्यंत गेल्याचे जाणवते. हॉटेलमध्ये पोहोचून फ्रेश होऊन लगेच गंगेकिनारी गेलो. तिथून बोटीने गंगा नदी पार करून, पल्याड तीरावरील गीता मंदिर, विष्णू मंदिर इत्यादी प्राचीन मंदिरे व धार्मिक ठिकाणे बघितली. येताना बोटी ऐवजी राम झुल्यावरून परत आलो. येथून लक्ष्मण झुला चार किलोमीटर अंतरावर असून तो सध्या बंद असल्यामुळे तिकडे जाता आले नाही. 

सायंकाळी गंगेकिनारी आरतीचे आयोजन केलेले असते, ते बघण्यासाठी आम्ही गेलो. असंख्य भाविक येथे जमलेले होते. सर्वत्र लावलेले मोठे दिवे, गंगेच्या वाहत्या थंड पाण्यात त्यांचे दिसणारे प्रतिबिंब, उत्साही भाविकांच्या जयघोष गर्जना अशा प्रसन्न व धार्मिक वातावरणात आरतीस सुरुवात होते आणि संपूर्ण वातावरण भारून टाकले जाते. आम्हालाही पुढे जाऊन प्रत्यक्ष आरती ओवाळण्याचा अनुभव घेता आला. 

आरती नंतर सर्व भाविक मंत्रमुग्ध होऊन संगीताच्या तालावर बेधुंद नाचतात, फुगड्या खेळतात.  हृदयरोग, गुडघेदुखी, कंबरदुखी असे सगळे आजारपण या वातावरणात विसरायला होतात.,  दहा दिवसांचा सर्व थकवा या तीस ते चाळीस मिनिटात कुठल्या कुठे नाहीसा झाला होता.  अशा या मंत्रमुग्ध  वातावरणातून कसेबसे बाहेर येत परतीला निघालो.

 सर्वत्र येणारा अनुभव याही ठिकाणी आम्हाला आला. आमच्यापैकी दोघांच्या चपला गायब होत्या. तसेच हॉटेलवर आलो.  आज राजाभाऊ पोतदार -  सौ चारुश्री वहिनींचा लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे त्याची विशेष व्यवस्था आम्ही गच्चीवर करायला लावली होती.  त्यानुसार सर्वांनी अतिशय उत्साहात लग्नाचा वाढदिवस केक कापून, शुभेच्छा देत साजरा केला.










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1. आमची श्री जगन्नाथ पुरी यात्रा

2. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - , कोणार्क

4. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - गंगासागर