चौथा दिवस - गुजरातमधील श्री सोमनाथ, द्वारका, पोरबंदर, गिरणार पर्वत इ धार्मिक ठिकाणांना भेटी देण्यासाठी सहल -
चौथा दिवस - 8/2/2023
यात्रेच्या कार्यक्रमातला आजचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे श्री द्वारकाधीश यांचे दर्शन . सकाळी सहालाच उठून साडेसहाच्या आरतीच्या हिशोबाने सर्वजण मंदिरात पोहोचलो.
द्वारकाधीश मंदिर , ज्याला जगत मंदिर , निज मंदिर आणि द्वारकाधीश असेही म्हणतात, असे हे श्रीकृष्णाला समर्पित हिंदू मंदिर आहे. याची येथे द्वारकाधीश किंवा 'द्वारकेचा राजा' या नावाने पूजा केली जाते . हे मंदिर भारतातील हिंदू तीर्थक्षेत्र असलेल्या चार धामपैकी एक आहे .
72 खांबांवर बांधलेली ही पाच मजली इमारत आहे मंदिराला दोन महत्त्वाचे प्रवेशद्वार आहेत, एक मुख्य प्रवेशद्वार आहे ज्याला मोक्षद्वार म्हणतात (म्हणजे "मोक्षाचे द्वार") आणि बाहेर पडण्याचा दरवाजा जो स्वर्गद्वार म्हणून ओळखला जातो .
आमच्यासारख्याच आरतीला आलेल्यांचीच फक्त गर्दी होती. आरती आटोपल्यानंतर गर्दीतील दर्शनाने मन न भरल्याने पुन्हा एकदा सर्वांनी जाऊन निवांत दर्शन घेतले. मंदिर व मंदिर परिसरातील सर्व छोट्या-मोठया देवतांची मंदिरे पाहण्यात बराच वेळ गेला. मंदिर अतिशय प्राचीन असून मंदिराला असंख्य गोपुरे आहेत. असे दगडाचे बांधकाम आजच्या काळात अशक्यच. माता रुक्मिणी, राधामाता, श्री बलदेव/बलराम आदि कृष्णाच्या समकालीन अनेक पात्रांची मंदिरे आहेत. आरतीचे वातावरण अतिशय प्रसन्न व धुंद करणारे आणि भक्तिमय होते. त्याला जोड सकाळच्या आरती च्या वेळेस वाजवण्यात येणाऱ्या नगारा आणि घंटा नादाची. आरती झाल्यानंतर बाहेर पडून सर्वांनी एकत्र जमून फुगड्या खेळल्या, भक्ती नाच केला आणि एका वेगळ्याच वातावरणात पोहोचलो. ऋषिकेश ला ही अनुभूती आम्ही घेतली होती.
त्यानंतर एक ग्रुप फोटो काढला आणि जमेल तशी थोडीशी प्रसाद खरेदी करून हॉटेलला परतलो.
नाश्ता झाल्यानंतर पोरबंदर रस्त्याने नव्याने विकसित होत असलेल्या शिवराजपुर येथील बीचवर गेलो. शिवराजपूर गावाजवळ, हा एक पांढरा-वाळूचा समुद्रकिनारा आहे ज्यात निळसर, स्वच्छ पाणी आहे. समुद्र खोल आहे त्यामुळे पाण्यात उतरण्याची परवानगी नाही, परंतु बोटिंग व स्कुबा डायविंग चे एक दोन प्रकार सुरू झालेले आहेत. त्याचा आनंद घेता येतो. लहान होऊन सर्वांनी बोटिंग चा आनंद लुटला व पुढे निघालो.
परतीच्या रस्त्यात मूळ द्वारका लागते. जरासंधाचा वध भिमाच्याच हातून होणे विधीलिखित असल्यामुळे श्रीकृष्णाने बलरामा सह मूळ द्वारका येथे प्रस्थान केले व एक दिवस येथे मुक्काम केला. परमेश्वराची ही लीला माहित नसल्यामुळे युद्ध सोडून पळाला म्हणून श्रीकृष्णाला रणछोडदास म्हटले गेले. याचीच आठवण म्हणून मूळ द्वारकेत श्रीकृष्णाचे मंदिर आहे.
पुढे रस्त्यात पोरबंदर लागते. येथे पोहोचल्यावर श्रीकृष्णाचा सखा परममित्र श्री सुदामा यांचे मंदिर पाहण्यासाठी गेलो. श्रीकृष्ण व सुदामा उज्जैनच्या सांदीपनी ऋषींच्या आश्रमात एकत्र सहाध्यायी होते. त्यांची घनिष्ठ मैत्री अखेरपर्यंत टिकली. श्रीकृष्ण गोकुळात जन्मला, मथुरेत वाढला आणि द्वारकेवर राज्य केले . सुदामा श्रीकृष्ण यांस भेटण्यासाठी गेले गेले असता श्रीकृष्णाने त्यांना काहीच दिले नाही. व्यथीत होऊन सुदामा घरी परतले, परंतु घरी आल्यावर श्रीकृष्णाच्या लीलेची प्रचिती आली. त्यांचे राहते घर व पूर्ण नगरी ही सोन्याने बनवली गेली होती कालांतराने सोनेरी नगरी समुद्रात बुडाली व गोमती किनारी नवीन द्वारका स्थापन झाली. त्या काळात श्रीकृष्णाचे वास्तव्य बेट द्वारका येथे असायचे. श्री सुदामा यांच्या मंदिराचे आवारातच एक चक्रव्यूह रचना करण्यात आली आहे . तो चक्रव्यूह पूर्ण करणाऱ्याच्या इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. (???) . आम्हीही उत्सुकतेपोटी चक्रव्यूह पूर्ण केला.
20 व्या शतकाच्या सुरुवातीस बांधलेले , सुदामा मंदिर पोरबंदरच्या गजबजलेल्या बाजारपेठेच्या मध्यभागी उभे आहे. हलक्या गुलाबी रंगाचे मंदिर झाडांच्या सानिध्यात उभे आहे. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा विश्वासू मित्र सुदामा यांच्यातील मैत्रीच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिर साधे आहे पण संगमरवरी खांबांनी सुशोभित केलेले आहे.
मंदिर पाहून झाल्यावर जवळच असलेल्या महात्मा गांधींच्या जन्मस्थानी म्हणजेच कीर्ती मंदिर पाहण्यासाठी गेलो.
कीर्ती मंदिर हे पोरबंदर मधील मोहनदास करमचंद गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या स्मरणार्थ स्थापित केले गेलेले एक स्मारक आहे. येथे गांधी कुटुंबाचे वडिलोपार्जित घर आहे, जिथे महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला होता.
या स्मारकाच्या एका बाजूला ज्या घरात गांधीजींचा जन्म झाला ती खोली असून, तीन मजली रचना असलेला वाडा भरपूर मोठा असून त्यात 2 ते 3 दालनात महात्मा गांधींचे विविध फोटो त्यांनी वापरलेल्या विविध वस्तू, त्यांना मिळालेल्या भेटवस्तू, पुस्तके आणि त्यांचा प्रसिद्ध चरखा ठेवण्यात आलेला आहे. पण एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या मानाने स्मारक तितकेसे संपन्न वाटले नाही. आम्ही रामेश्वर दौऱ्यात माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे स्मारक पाहिले होते ते यापेक्षा काही पटीने चांगले होते. यानंतर गुजरातचा फेमस ढोकळा व खाकरा खाण्याची इच्छा असल्याने त्याचा आस्वाद घेतला आणि पुढील प्रवासास निघालो .
रस्त्याने अनेक ठिकाणी पाणथळ जागांवर बाहेरच्या देशांमधून स्थलांतरित होऊन आलेले अनेक पक्षी बघायला मिळाले . रस्त्यात गहू, हरभरा, आणि बडीसोप यांचे मोठमोठे शेतं बघायला मिळाली.
आजच्या प्रवासात स्त्रियांनीच सत्ता गाजवली. पूर्ण प्रवासात त्यांच्या गाण्याच्या भेंड्या, भजने इत्यादी सुरू होते, त्यामुळे आमची अनायासे करमणूक झाली .
सायंकाळी सातच्या दरम्यान जुनागड गिरनार येथे पोहोचलो. जुनागढ हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे. हे जुनागढ जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. उद्या सकाळी गिरणार पर्वतावर जायचे असल्याने रात्री लवकर जेवणे आटोपून झोपी गेलो.
प्रत्यक्ष द्वारकाधीशाचे दर्शन, सुदामाचे मंदिर आणि महात्मा गाधीजींच्या स्मारकाचे सुंदर वर्णन, उत्तम लिखाण....
उत्तर द्याहटवा