दुसरा दिवस - गुजरातमधील श्री सोमनाथ, द्वारका, पोरबंदर, गिरणार पर्वत इ धार्मिक ठिकाणांना भेटी देण्यासाठी सहल -

 दुसरा दिवस - 6/2/23

पूर्वीच्या काळी सैनिक राजे राजवाडे हे घोड्यावर झोपा घेत. आम्ही मात्र चाकांवर झोप घेऊन 6 वाजताच उठून  बसलो.  बरोबर सात वाजता गाडी वेरावळ ला पोहोचली.  इच्छित स्थळी वेळेत पोहोचल्याच्या आनंदातच घेण्यास आलेल्या मोठ्या गाडीतून हॉटेलवर पोहोचलो. ताजेतवाने होऊन , नाश्ता करून सोमेश्वर भगवान यांचे दर्शन घेण्यासाठी प्रस्थान केले . 

सोरठी सोमनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. सोमनाथ मंदिर, ज्याला सोमनाथ मंदिर किंवा देव पाटण असेही म्हणतात, हे भारताच्या गुजरातमधील प्रभास पाटण, वेरावळ येथे स्थित एक हिंदू मंदिर आहे. हे हिंदूंसाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे आणि शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी ते पहिले मानले जाते.  हे वेरावळ रेल्वे जंक्शनच्या आग्नेयेस सुमारे 7 किमी  आहे. 

आपल्या नाशिकच्या नवीन स्वामींनारायन मंदिराप्रमाणे  दगडी बांधकाम असलेले हे अतिशय पुरातन मंदिर हजारो वर्षांपासून समुद्रकाठी दिमाखात उभे आहे.  भगवान शंकराचे शिवलिंग आणि मूर्ती अतिशय सुबक आणि देखणी आहे . संपूर्ण मंदिराला आतल्या बाजूने सोन्याचा मुलामा केलेला आहे. दोन्ही हातांच्या कवेत मावणार नाही एवढा मोठा कळस देखील पूर्णपणे सोन्याचा आहे.  या मंदिराच्या वैभवावर महमूद गजनी, औरंगजेब बादशहा व इतर अनेक समकालीन मुघल सरदारांनी आक्रमणे केली. पोर्तुगीज देखील यात मागे राहिले नाही. येथील हजारो टन सोने, हिरे मानके, जड जवाहिर लुटून नेले पण प्रत्येक वेळेस हिंदू राजांनी हे मंदिर पुन्हा उभारले. या मंदिरात कितीही वेळा दर्शन घेतले तरी मन भरत नाही. आम्ही देखील संधी मिळताच दोन दोन मंदिरात जाऊन दर्शन घेतले. 

 त्यानंतर येथील प्रसिद्ध अशा पवित्र त्रिवेणी संगमवर आम्ही गेलो. हीरण,  कपिला आणि सरस्वती च्या या संगमावर  कबुतरांबरोबरच असंख्य संख्येने समुद्री पक्षी जमलेले होते.  अतिशय नयनरम्य असे दृश्य होते.  

त्यानंतर येथील प्रसिद्ध अशा  भालका तीर्थ येथे भेट दिली.  भगवान श्रीकृष्णाने आपले अवतार कार्य संपवण्यासाठी या स्थळाची निवड केली होती. याच ठिकाणी त्यांनी त्यांच्या अगाध लीलेने, शिकाऱ्याकरवी स्वतः वर बाण चालविला व नर देहाचा त्याग केला.  अशी मान्यता आहे की, 

महाभारत युद्धाच्या 36 वर्षे उलटल्यानंतर, एका उत्सवात यादवांमध्ये भांडण झाले , त्यात त्यांनी एकमेकांना मारले. कृष्णाचा मोठा भाऊ बलराम यांनी योगाद्वारे देहत्याग केला . कृष्ण वनात गेले आणि एका झाडाखाली ध्यान करू लागले. एक शिकारी *जाराने* कृष्णाच्या अर्धवट दिसणाऱ्या डावा पायाला,  हरणासारखा समजून बाण मारला. जाराला आपली चूक समजली. त्यावर, कृष्णाने जाराला सांगितले की, "हे जारा, तू तुझ्या मागील जन्मात वाली होतास, त्रेतायुगात राम म्हणून मीच तुला मारला होता . इथे तुला ते करण्याची संधी मिळाली.  या जगात सर्व काही माझ्या इच्छेनुसार केले जाते, यामुळे तुला काळजी करण्याची गरज नाही". मग कृष्ण, त्याच्या भौतिक शरीरासह, त्याच्या शाश्वत निवासस्थानी, गोलोकात परत गेला., या घटनेवरून कृष्णाच्या पृथ्वीवरून निघून गेल्याला पुष्टी मिळते. 

अशा या पवित्र स्थानाचे दर्शन घेऊन पुढे आम्ही गोलोक धाम तीर्थ बघितले. अतिशय विस्तीर्ण अशा आवारात नदीकाठी गीता मंदिर,  लक्ष्मीनारायण मंदिर , श्रीकृष्ण चरण पादुका,  श्री बलदेवजी गुफा,  श्री काशी विश्वनाथ मंदिर,  श्री भिम नाथ मंदिर यांचे एकत्रिकरण केलेले आहे. 

दुपारी थोडा आराम करून , वामकुक्षी घेऊन सायं. सहा वाजता पुन्हा श्री सोमेश्वर मंदिरात गेलो.  सायंकाळच्या आरतीनंतर येथे लेझर शो चे आयोजन करण्यात येते. अतिशय पवित्र आणि भारलेल्या - उत्साही वातावरणात अशी आरती संपन्न झाल्यावर लगेचच लेझर शो सुरू झाला. आवाजाचे जादूगार महानायक अमिताभजी बच्चन यांच्या आवाजात , 

श्री सोमेश्वर महाराज मंदिराची स्थापनेपासून ची कथा पूर्णपणे दृकश्राव्य स्वरूपात दाखविण्यात येते. लेझर व आजूबाजूच्या लाईट्स आणि जोडीला दमदार आवाज यांचा अतिशय सुरेख संगम साधला गेल्यामुळे लेझर शो अजिबात कंटाळवाणा होत नाही. अविस्मरणीय असाच हा अनुभव होता. 

पुन्हा हॉटेलवर रात्रीचे जेवण आणि उद्याच्या प्रवासाची आखणी करून एकमेकांचा निरोप घेतला आणि निद्रिस्त झालो....

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1. आमची श्री जगन्नाथ पुरी यात्रा

2. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - , कोणार्क

4. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - गंगासागर