तीसरा दिवस - गुजरातमधील श्री सोमनाथ, द्वारका, पोरबंदर, गिरणार पर्वत इ धार्मिक ठिकाणांना भेटी देण्यासाठी सहल -

 तिसरा दिवस - 7/3/2023

नव्या उत्साहाने नव्या दिवसाची सकाळ उगवली . काकांच्या आदेशानुसार सर्वजण नाश्त्यासाठी जमले. हॉटेलच्या आवारात केवळ फोटोग्राफीसाठी छानशा सिंह आणि हरणांच्या मूर्ती (पुतळे) ठेवलेल्या आहेत. त्यांच्यासोबत आपण फोटोग्राफीचा  आनंद घेऊ शकतो.  काहींनी काल राहिलेले सिंहासोबतचे  फोटो सेशनची हौस भागवून घेतली. सर्वांनी पोटभर नाश्त्याचा आस्वाद घेतला आणि द्वारके साठी रवाना झालो.

रस्त्याच्या दुतर्फा विस्तीर्ण पसरलेल्या नारळीच्या बागा, अतिशय सुंदर रस्ता, आणि बाजूनेच असलेला अरबी समुद्र;  मनाला रिझवित होता.  त्याचवेळी

गाडीत रंगलेला भक्ति रसाचा महापूर वाहू लागला होता. अनेकांचा अनेक दिवसांपासून दबलेला आवाज स्वयंस्फूर्तीने  बाहेर येत होता.  सर्वांच्याच कलागुणांना येथे वाव असल्याने अतिशय मजा आली. वातावरण अतिशय धुंद होऊन गेले होते

हरिभक्त परायण बाळूदादा महाराज विहीतगावकर आणि आध्यात्मिक, योगगुरु नेरकर दादा यांच्या *कानडा राजा* ने महेश काळे व राहुल देशपांडे यांच्यातील जुगलबंदी आठवली. शुभांगी वहिनींचा *विठ्ठल जागर* सर्वांना वेगळ्याच विश्वात घेऊन गेला,  साथसोबतीसाठी अवंतीवहिनी, चारुवाहिनी आणी कोरस साठी पुरुष मंडळी होतेच. 

मधेच एका ठिकाणी बाजूच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटन स्थळ विकसित होत आहे.  या ठिकाणी थांबल्यावर सर्वांनी फोटोग्राफी आणि उंटावर / घोड्यावर बसून हौस भागवली. आतापर्यंत फक्त लग्नातच घोड्यावर बसणे किंवा लहान मुलांना उंटावर बसवून चक्कर मारणे एवढा प्रकार माहीत होता. आज तो उंटावर जोडीने बसून, रपेट मारून प्रत्यक्ष अनुभवला. मजा आली. 

प्रवासातल्या अशा या उत्साही, भक्तीमय आणि सुंदर वातावरणात द्वारका कधी आले ते समजलेच नाही. अर्थात मध्यंतरी जेवणासाठी थांबलो. नंतर थोडा वेळ पुरुष मंडळींनी ही गाडीमध्ये टाळ कुठून भक्तिकार्यात थोडासा हातभार लावला हे विसरायला नको. 

 द्वारके जवळ गावाच्या बाहेर  माधोपुर येथे रुक्मिणी मातेचे मंदिर आहे.  भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण करून द्वारका येथे आणले. येताना रस्त्यात रुक्मिणीला तहान लागली असता कृष्णाने पायाच्या अंगठ्याने पाणी निर्माण केले. परंतु तिने, सोबत असलेल्या दुर्वास ऋषींना पिण्यासाठी पाणी विचारले नाही. त्यामुळे दुर्वास ऋषींना राग येऊन त्यांनी शाप दिला की बारा वर्ष तुम्ही दोघे वनवासी रहाल. त्यामुळे मातेचे मंदिर गावाबाहेर 2 किमी वर व कृष्णाचे मंदिर गावात आहे. दुसऱ्या शापामुळे द्वारकेच्या आसपासच्या 19 किलोमीटरच्या परिसरात विहीर खणली असता गोडे पाणी लागत नाही.  कारण सर्वत्र समुद्राचे खारट पाणी आहे,  येथे गोडे पाणी विकत आणावे लागते.  

हे मंदिर देवी रुक्मिणी ( भगवान कृष्णाची मुख्य राणी, प्रिय पत्नी आणि द्वापर युगातील देवी लक्ष्मीचा अवतार ) यांना समर्पित असून, मंदिर 2,500 वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. परंतु सध्याच्या स्वरूपात ते 12 व्या शतकातील असल्याचे अनुमान काढले जाते. द्वारकेची यात्रा द्वारकेश्वरी रुक्मिणी महाराणीचे दर्शन घेतल्यावरच पूर्ण होते.

येथून वीस किलोमीटर वर बेट द्वारका आहे, तेथे जाण्यासाठी निघालो. 

ओखा येथे गाडीतून उतरून,  दोन ते तीन किलोमीटर अंतरावर समुद्रात असलेल्या बेटावर जाण्यासाठी बोटीचा वापर करावा लागतो. बोटीची क्षमता कितीही असले तरी 80 ते 100 -  सव्वाशे लोक जसे जमेल तसे भरतात.  

बेट द्वारका हा प्राचीन द्वारका शहराचाच भाग मानला जातो . महाभारत आणि स्कंद पुराण भारतीय महाकाव्य यानुसार बेट द्वारका हे शहर कृष्णाचे निवासस्थान आहे . 

प्रत्यक्ष पाहिले तर हे छोटसं गाव वसलेले असून असे सांगितले जाते की येथे मुस्लिमांची वस्तीच 70 टक्के आहे . 

श्रीकृष्णाचे मूळ मंदिर हे अतिशय जुने असून त्या मंदिराला आता वरून बांधकाम करून आधुनिक करण्याचा प्रयत्न होतो आहे. एवढ्या पवित्र व मोठ्या स्थळाच्या मानाने येथे सोयी सुविधांचा अभाव आहे. नियोजन शून्यतेमुळे येथे अतिशय अस्वच्छता व गलिच्छपणा आढळून येतो.  एक चांगली गोष्ट म्हणजे आता समुद्रावरून पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे ते पूर्ण झाल्यावर बोटीने जाण्याची गरज होणार नाही व बेटाचा विकास होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. 

 श्रीकृष्ण व सुदामाची भेट येथेच झाली होती, त्यामुळे याला भेट द्वारका व बेट द्वारका असे म्हणतात.  थोर कृष्णभक्त संत मीराबाई या  आपल्या जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात कृष्णाचे दर्शन घेण्यासाठी येथे आल्या होत्या. येथेच श्रीकृष्णाची अखेरची भेट घेऊन त्यांनी देह ठेवला.,  त्यामुळे याला भेट द्वारका असे म्हणतात. या बेटाचा आकार शंखासारखा असल्याने त्याला शंखपूर असेही म्हणतात.  तसेच येथे शंख भरपूर प्रमाणात असल्यामुळे देखील  त्याला शंखपूर म्हणतात अशीही मान्यता आहे.  नक्की काय ते माहीत नाही. मूळ द्वारका येथेच समुद्राच्या पाण्याखाली गाडली गेली आहे असे मानले जाते.  

द्वारका ते बेट द्वारका या वीस किलोमीटरच्या प्रवासात आहे आपल्याला दोन्ही बाजूने मिठागरे दिसतात. येथेच टाटा केमिकल्स - टाटा सॉल्ट ही कंपनी आहे.  

द्वारकेस जाताना या मार्गावरच नागेश्वर गावात, श्री नागेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक स्थान  लागते. येथे भगवान शिवाची नागाच्या तर माता पार्वतीची नागिनींच्या रुपात पूजा केली जाते, त्यामुळे येथे शिवलिंग देखील नागाच्या रुपात आहे. 

श्री नागेश्वर मंदिरात पोहोचलो आणि आमच्या नशिबाने लगेचच आरती सुरू झाली. पंधरा मिनिटे आरतीच्या भक्तिमय वातावरणात सर्व अतिशय रममाण होऊन गेले होते. पूर्णपणे मंतरलेले वातावरण,.   भगवंताच्या  बाबतीत तल्लीन होणे काय असते , याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेतला.  

यानंतर द्वारकेत कामत ग्रुपच्या हॉटेलवर येऊन स्टार ग्रुप हॉटेलच्या सुख सोयी आणि सुग्रास जेवण काय असते याची पुनश्च अनुभूती घेतली.  उद्या चारधाम पैकी एक श्री द्वारिका येथे पहाटे दर्शनासाठी जायचे असल्यामुळे सर्वच लवकर झोपी गेले...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1. आमची श्री जगन्नाथ पुरी यात्रा

2. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - , कोणार्क

4. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - गंगासागर