पाचवा दिवस - गुजरातमधील श्री सोमनाथ, द्वारका, पोरबंदर, गिरणार पर्वत इ धार्मिक ठिकाणांना भेटी देण्यासाठी सहल -

 पाचवा दिवस - 9/2/23

आज यात्रेचा अखेरचा दिवस.  दिवसही महत्त्वाचा. गिरणार पर्वत चढाई करायची, दत्त महाराजांचे दर्शन घ्यायचे...

गिरनार पर्वत हा जुनागडपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर आहे. हा गुजरातमधील गिरिमाला पर्वतांचा समूह आहे. गिरनार पर्वत हे हिंदूंचे पवित्र स्थान आहे आणि जैन धर्मियांच्या पाच महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. गिरनारचे मूळ नाव हे गिरीनारायण असून त्याचा अपभ्रंश होऊन त्याला गिरनार असे म्हटले जाते.

हे स्‍थान दत्तोपासनेचें एक प्राचीन केंद्र आहे. हे दत्तमंदिर गिरनार पर्वताच्या एका शिखरावर आहे.  यांच्या अनेक शिखरांपैकी अंबामाता, गोरखनाथ, नेमिनाथ, गुरुदत्तात्रेय व कालिका ही विशेष प्रसिद्ध आहेत. गोरखनाथ सर्वांत उंच आहे. 

 गिरनारला जाण्यास रिक्षा / बस अशी वाहने व वर चढून जाण्यास डोल्या मिळतात. हा पर्वत बराच उंच असून त्याच्या सर्वोच्च शिखरावर गुरू गोरखनाथाचे मंदिर आहे आणि याच्या खालोखाल असलेल्या शिखरावर चढण्यास पायऱ्या आहेत. 

सर्वांनाच अतिशय उत्सुकता लागलेली; तितकीच धाकधूकही... आपण चढू शकू की नाही ??? 

पण आजचा वार गुरुवार - श्री गुरुदत्ताचा वार, आणि त्यातही संकष्टी चतुर्थी. त्यामुळे काही झाले तरी गडावर जायचेच हा निर्धार सर्वांचा पक्का होता. अगदी वेळ पडलीच तर डोली करून जायचे, पण जायचेच;  याच निर्धाराने सकाळी सहा वाजताच हॉटेल हुन निघून रिक्षाने गिरणार येथे पोहोचलो. सात ते आठ ची रोपवेची बुकिंग होती. गिरनार पर्वत चढाई करायची म्हणजे दहा हजार पायऱ्या चढउतार करायच्या. परंतु  त्यात रोपवेची सोय झाल्यामुळे अर्धे अंतर पाच मिनिटात कापले जाते. चढायचा महत्त्वाचा व अवघड टप्पा यामुळे पार होतो. तिथून पुढे आपल्याला पायी चालायचे. 

 सातला पोहोचून देखील जवळपास 100 एक भाविक आमच्या पुढे होते. परंतु रोपवे फास्ट असल्यामुळे पटपट नंबर लागत गेला. सुरुवातीलाच चेकिंग करताना प्लॅस्टिकचे पाण्याची बाटली, प्लास्टिक बॅग मधील खाण्याचे पदार्थ सोबत नेता येत नाही असा नियम आहे. त्यामुळे चेकिंग पॉईंट वरच आमच्या पाण्याच्या बाटल्या टाकून द्याव्या लागल्या. प्लास्टिकच्या बॅगमध्ये घेतलेल्या खाण्याच्या वस्तू कागदाच्या रॅपर मध्ये किंवा दुसऱ्या साध्या पिशवीमध्ये ओतून घ्यावे लागले. 

रोपवे ने वरती पोहोचल्यावर अंबा मातेचे मंदिर लागते, अंबामाता शिखरावरील अंबेचे देवालय एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. त्याच्यापुढे गेल्यानंतर गोरक्षनाथ महाराजांचा मंदिर व शेवटी दत्त महाराजांचे मंदिर आहे.  तीन शिखरांवर तीन मंदिरे आहेत.  गोरखशिखर ही गोरखनाथाची आणि गुरूशिखऱ ही दत्तात्रेयाची तपोभूमी म्हणून दाखविली जाते. 

 अंबामाता मंदिरापासून काठया घेऊन प्रत्येकाने आपापल्या परीने चालायला सुरुवात केली.  पायऱ्या छोट्या असल्यामुळे त्याचप्रमाणे रस्ता चढ उताराचा असल्यामुळे त्रास न होता चालणे सोपे वाटत होते. आम्हाला तर पांडवलेणी वर रोज केलेल्या सरावापेक्षाही ही चढाई सोपी वाटत होती. सोबत काठी असल्यामुळे चालणे अधिकच सोपे वाटले. रस्त्यात 2 ते 3 ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय आहे.  रस्त्यात कुठेही न थांबता तासाभरात थेट दत्त महाराजांच्या मंदिरापर्यंत पोहोचलो. दत्त महाराजांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेऊन पावन झाल्यासारखे झाले. मूर्ती देखील अतिशय सुबक आणि सुरेख आहे. अगदी डोंगराच्या टोकावर आणि अतिशय छोटी जागा साधारणता दहा बाय दहाची जागा; एवढ्याच  जागेत मंदिर असल्यामुळे तेथे आपल्याला थांबता येत नाही मिनिटाभरात दर्शन घेऊन लगेच खाली उतरावे लागते. कारण पायऱ्यांचा मार्ग एकेरी आणि जागा छोटी असल्यामुळे लगेच गर्दी होते. त्यामुळे एवढे कष्ट घेऊन, एवढ्या लांब वर येऊन महाराजांच्या चरणी पाच मिनिटे देखील बसता येत नाही किंवा पाच मिनिटे दर्शन घेऊन डोळ्यांत मूर्ती साठवून देखील घेता येत नाही.  याने मन न भरल्यामुळे रुखरुख लागते.  असो दर्शन झाले हे देखील एक भाग्यच. 

परतीच्या प्रवासात दत्त महाराजांची धुनी आहे. येथे मूर्तीचे दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ ही घेता येतो. तेथून पुन्हा परतीच्या मार्गावर वर चढण्याचा मार्ग थोडा कठीण आहे, तोच जातानी सोपा होता. अशी मान्यता आहे की श्री गोरक्षनाथ यांचा अहंकार कमी करण्यासाठी श्री दत्त महाराजांनी त्यांना अटी घालून त्यांना गिरणार पर्वताच्या 16 प्रदक्षिणा घालणे भाग पाडले व त्यांचा अहंकार दूर केला. त्यावर गोरक्षनाथांनी क्षमा याचना केल्यानंतर,  माझ्या भेटीसाठी आलेला प्रत्येक भक्त आधी तुझे दर्शन घेऊन मग माझ्या दर्शनाला येईल असा वर श्री दत्तात्रयांनी गोरक्षनाथांना दिला. त्यामुळे आधी श्री गोरक्षनाथ यांचे मंदिर आहे. 

तसेच दर्शनासाठी जातांना प्रत्येक भक्तासोबत दत्त माऊली असतात, त्यामुळे चढण सोपी जाते. परंतु परतीच्या प्रवासात दत्त महाराज सोबत नसल्याने परतीचा मार्ग थोडा अवघड जातो.  अशा अनेक मान्यता असल्याने त्यांचे दाखले देने अवघड आहे. याच्या पुष्ट्यार्थ

एक अजून दृष्टांत आम्ही प्रत्यक्ष अनुभवला. दर्शनासाठी जातांना दत्त महाराजांचे प्रिय मानले जाणारे श्वान (म्हणजे प्रत्यक्ष महाराजच) आमचे सोबत शेवटपर्यंत चालत आले, मी त्याला खाण्यासाठी काही देण्याचा प्रयत्न केला पण  त्यांनी ते नाकारले. परतीच्या प्रवासात मात्र ते कुठेच दिसले नाही. अदभूत असा अनुभव होता. सद्गुरूचा अनुग्रह होऊन त्यांचे बोलावणे आल्याखेरीज तुमची यात्रा घडत नाही त्याचप्रमाणे येथील पायऱ्यांचा चढ उतार हा जीवनातील चढ उताराला कसे धीराने सामोरे जायचे हे शिकवितो. आमच्यातील काहींना हा अनुभव आला, तसेच काहींनी आपली तब्येत साथ देत नसतांना केवळ प्रबळ इच्छाशक्ती च्या जोरावर डोलीच्या साहाय्याने यात्रा पूर्ण केली. 

परतीच्या प्रवासात पुन्हा वरती आल्यावर गोरक्षनाथ महाराज मंदिराचे दर्शन घेऊन समोर अंबा मातेचे मंदिर व रोपवे नजरेच्या टप्प्यात आले की आपली यात्रा संपत आल्याचे कळते आणि अधिक उत्साहाने राहिलेले अंतर आपण लवकर पूर्ण करतो. 

जैनांचे बाविसावे तीर्थंकर भगवान नेमिनाथ याचे निर्वाण गिरनारवर झाले. नेमिनाथ शिखरावर त्याचे भव्य व संपन्न देवालय आहे. रोप वे ने खाली उतरत असतांना, किंवा पायी गेल्यास रस्त्यावरच त्याचे दर्शन घेता येते. 

 या यात्रेत बीड येथून आलेला 25 ते 30 भाविकांचा ग्रुप भेटला, 45 दिवसांपासून बीड पासून पायी चालत आले आणि गिरनार पर्वताच्या पूर्ण दहा हजार पायऱ्या देखील पायी चढले. यामध्ये तीस वर्षाच्या तरुणापासून ते 70 -  75 वर्षापर्यंतच्या वृद्धांचा समावेश होता. हे पाहून स्वतःचीच लाज वाटली. 

आमच्यातही वर चढतांना कोल्हे सर जोडी तर उतरतांना श्री नेरकर साहेब जोडीने प्रथम क्रमांक पटकावला, त्याबद्दल त्यांचे सर्वानी अभिनंदन केले.  रोपवेने खाली उतरलो, आणि फार मोठे कार्य पार पडल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकू लागले. यात्रा सफल झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ठळकपणे जाणवत होता. 

 *याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा...

रूमवर येऊन आराम करून सर्वांनी सायंकाळी जुनागड शहरातील मेन रोडवर फेरफटका मारला, खरेदी केली. अशा प्रकारे यात्रेचा शेवटचा दिवस संपला आता उद्या सकाळी परतीच्या प्रवासाला निघणार....

टिप्पण्या

  1. साक्षात गुरुदत्त माऊलींचे दर्शन झाले असे वाटते, वाचून खरोखर दर्शनाची इच्छा प्रबळ होते...

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1. आमची श्री जगन्नाथ पुरी यात्रा

2. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - , कोणार्क

4. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - गंगासागर