पहिला दिवस - गुजरातमधील श्री सोमनाथ, द्वारका, पोरबंदर, गिरणार पर्वत इ धार्मिक ठिकाणांना भेटी देण्यासाठी सहल -
पहिला दिवस - 5/3/2023
आज यात्रेचा पहिला दिवस. अतिशय उत्साहाने सर्व जण बरोबर वेळ पाळण्यासाठी धावपळ करीत ठरलेल्या ठिकाणी जमले. अहाहा, काय तो उत्साह होता, एक एकाच्या चेहऱ्यावर... सगळे साठीच्या घरातले, अन लगबग तिशीच्याला लाजवेल अशी. सोबत सगळ्यांना सोडण्यासाठी आलेल्या लेकी, सुना, मुलं, नातवंडं, जावई या सर्वांना देखील हा उत्साह पाहून आश्चर्य वाटलं असेल...
आनंदाची बाब म्हणजे, दत्त महाराजांच्या आदेशावरून, हाय कोर्टाला देखील माघार घेत सूर्यवंशी वहिणींचा व पर्यायाने त्यांच्या बहिणीचा गिरणार मार्ग खुला करावा लागला. पहीलटकरणी सारखे नाविनपन दूर झाल्यावर काळे साहेब, सलादे साहेब, साडू कोल्हे सर हेही मिसळून गेले, बाकीचे सर्व मुरलेले आंबे !!!
गप्पांच्या नादात अन जेवणाच्या जागेच्या शोधात, वेड्या वाकड्या रस्त्याने निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत डहाणू कधी आले ते समजलेही नाही. मग काय; मस्त प्लॅटफॉर्मवरच सगळ्यांनी बैठक मांडत सर्वांच्या घरून आलेल्या पंचपक्वाणावर ताव मारत तृप्तीचा ढेकर दिला, अन भल्या पहाटे उठून केलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान महिला वर्गाच्या चेहऱ्यावर दिसले. दरम्यान गाडी ढकलण्याच्या नादात काही जण घामाघूम झाले.
गाडी आली, जागा शोधत स्थानापन्न झाले, अन मग स्वतंत्र रित्या गप्पांचा फड परत रंगला. सोबतीला टाळ चिपळ्यांचे भजन देखील सुरू झाले.
बघता बघता रात्री जेवणाची वेळ झाली. परत दुसरा डबा, अन नंतर झोपायची लगबग.
या दरम्यान पुरुष वर्गाने दोन डबे पूर्ण केले हे वेगळेच....
अहमदाबाद च्या पुढे काय होते हे विचारायचे नाही कारण सर्वच पडले होते...
🫢🫢🫢
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा