सहावा दिवस - गुजरातमधील श्री सोमनाथ, द्वारका, पोरबंदर, गिरणार पर्वत इ धार्मिक ठिकाणांना भेटी देण्यासाठी सहल -
सहावा दिवस - 10/2/23
यात्रा खऱ्या अर्थाने काल संपली. आज परतीच्या प्रवासाची औपचारिकता बाकी. सकाळी लवकर आवरून सर्व नाश्त्याला जमले. आज परतीच्या प्रवासा व्यतिरिक्त कोठे जायचे नसल्याने सर्व तसे निवांत होते, पण इतक्या लवकर यात्रा संपल्याची रुखरुख कोठेतरी प्रत्येकाच्या मनात होती. अजून 4-5 दिवस तरी यात्रा असावी असे वाटत होते. जुन्यांचे एकमेकांशी संबंध होतेच पण नव्याने ग्रुप मध्ये सहभागी झालेल्या काळे, कोल्हे, सलादे, खैरनार व नेरकर कुटुंब यांच्याशीही सर्वांचे 5 दिवसांतच मैत्रीचे व सलोख्याचे ऋणानुबंध निर्माण झाले. अशा भावुक वातावरणातच सर्व असतांनाच, काका व सौ शुभांगी वहिनींनी समारोपाच्या कार्यक्रमाची तयारी केली. प्रत्येकाने यात्रेदरम्यान आपल्याला आलेले अनुभव कथन केले. मातोश्री कडून आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या व दिलेल्या सहकार्या बद्दल आभार व्यक्त केले आणि भविष्यातील यात्रेला असेच सहकार्य, शुभेच्छा आणि प्रतिसाद लाभेल अशा प्रकारची ग्वाही दिली. त्यानंतर लगेचच जुनागड येथून सुरेंद्रनगर पर्यंतच्या प्रवासास सुरवात केली. आरक्षण केलेली ट्रेन सुरेंद्र नगर पासून निघणार असल्याने हा द्राविडी प्राणायाम करावा लागला. गाडी थोडी लेट झाल्याने धाकधूक वाढली होती, पण अर्धा तास अगोदर सुरेंद्र नगर ला पोहोचलो आणि लगेच धावपळ करीत पुढची गाडी पकडली. या सर्वात प्रत्येकाचीच खूप धावपळ झाली. हाश हुश करत सर्वांनी एकदाच्या जागा पकडल्या अन सुस्कारा सोडला..
पुढे बायकांच्या अन पुरुषांच्या वेगवेगळ्या गप्पा रंगल्या, अहमदाबाद आल्यावर सर्वानीच थोडे थोडे खावुन घेतले अन डहाणू पर्यंतच्या 4 तासांच्या झोपेसाठी पथारी टाकली...
11.02.23
आज पहाटे चार वाजेच्या दरम्यान गाडी डहाणू रोड स्टेशनला पोहोचली लगबगिने सर्व खाली उतरलो आणि गाडीला टाटा बाय-बाय केले. नाशिकला घेऊन जाण्यासाठी आमची गाडी स्टेशनला हजरच होती. लगेचच नाशिकचा प्रवास सुरू केला आणि आठ वाजेच्या आसपास जव्हार, त्रंबक मार्गे नाशिकला पोहोचलो. अशा रीतीने आमच्या या छोटेखानी यात्रेचा सुंदर समारोप झाला पुन्हा सर्वांनी एकमेकांचा निरोप घेऊन परत लवकर भेटण्याच्या आश्वासनासह सर्वांचा निरोप घेतला
धन्यवाद मातोश्री ....
🙏🙏🙏
संपू्णपणे आम्हीच ही यात्रा करतो आहोत असा भास होतो आहे.
उत्तर द्याहटवा