9. आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस नववा दि 15/10/22*
दि 15/10/22
दहा दिवसांच्या यात्रेतला आजचा सर्वात महत्त्वाचा दिवस.भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक, आणि चार धामांपैकी एक असलेल्या मंदिरातील श्री रामेश्वरम भगवानाचे दर्शन घेण्यासाठी, पहाटे लवकर उठून समुद्रावर पोहोचलो. सूर्य देवाच्या आगमनापूर्वीच जोडीने समुद्र स्नान केले. जोडीने सूर्याला अर्ध्य वाहिले आणि नंतर तसेच ओलेत्याने मंदिरात पोहोचलो. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे मुख्य मंदिरात प्रवेश करण्या अगोदर येथे रांगेने 22 कुंडांमध्ये स्नान करावे लागते. स्नानाचा प्रत्यक्ष अर्थ न घेता, येथे ठिकठिकाणी ओळीने असे 22 छोटी छोटी कुंड आहेत. त्या ठिकाणी उभा असलेला मंदिराचा सेवेकरी हा आलेल्या भाविकांवर कुंडातील पाण्याचा बादलीने शिडकावा करतो किंवा थोडे थोडे पाणी डोक्यावर शिंपडत जातो. अशा रीतीने 22 कुंडांचे स्नान करून आम्ही मुख्य मंदिरात पोहोचलो. अतिशय पवित्र आणि मंगलमय वातावरणात रामेश्वर भगवान आणि विश्वनाथ भगवान यांच्या पिंडीचे यांचे दर्शन घेतले.
रामेश्वरमच्या प्रसिद्ध मंदिर स्थापनेबद्दल अनेक मनोरंजक कथा सांगितल्या जातात. सीतेच्या सुटकेसाठी रामाने लंकेवर कूच केले. त्याने न लढता सीताजींना सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण जेव्हा रावण राजी झाला नाही, तेव्हा त्याने युद्ध केले. या युद्धासाठी रामाला वानरसेनेसह महासागर पार करावा लागला, जे फार कठीण काम होते. मग श्रीरामांनी युद्धातील यश आणि विजयानंतर, आपल्या आराध्य भगवान शिवाची उपासना करण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, समुद्रकिनाऱ्याच्या वाळूतून स्वतःच्या हातांनी शिवलिंग बांधले, तेव्हा भगवान शिव प्रकाशाच्या रूपात प्रकट झाले आणि त्यांनी ते शिवलिंग श्रीरामाला दिले. या लिंगाला श्रीरामांनी रामेश्वरमची उपमा दिली. शिवलिंगाची स्थापना केल्यावर, त्यांनी हनुमानजींना काशीतून शिवलिंग आणण्यास सांगितले. हनुमान पवन-सुत होते. प्रचंड वेगाने ते आकाशातून फिरले, आणि शिवलिंग आणले. श्रीरामांनी रामेश्वर ज्योतिर्लिंगासह काशीच्या लिंगाची स्थापना केली. लहान आकाराच्या या शिवलिंगाला रामनाथ स्वामी असेही म्हणतात. या तीर्थक्षेत्राच्या मुख्य मंदिरात या दोन्ही शिवलिंगांची आजही पूजा केली जाते. हे मुख्य शिवलिंग ज्योतिर्लिंग आहे .
रावण हा देखील सामान्य राक्षस नव्हता . ते महर्षी पुलस्त्य यांचे वंशज आणि वेदांचे विद्वान तसेच भगवान शिवाचे महान भक्त आहेत. त्याचा वध केल्यावर श्रीरामाला खूप वाईट वाटले. ब्रह्महत्येच्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी, श्रीरामाने युद्ध जिंकूनही येथे पूजा केली. रावणाशी झालेल्या या युद्धात त्याच्या संपूर्ण राक्षसी वंशाचा अंत झाला आणि शेवटी सीताजींना मुक्त करून श्रीराम परतले.
असो,
*याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा* या भावनेत आम्ही सर्व मंदिराबाहेर पडलो व पुन्हा हॉटेलला जाऊन परत आंघोळी व नाश्ता करून मदुराई साठी प्रस्थान केले.
रामेश्वरम ते मदुराई हा रस्ता देखील अतिशय चांगला असून, रस्त्याच्या दुतर्फा सर्वत्र नारळीच्या बागांचे दर्शन होते.
मदुराईला पोहोचल्या बरोबर मीनाक्षी मातेचे जगप्रसिद्ध मंदिर पाहण्यास गेलो. या मंदिरालाच अरुलमिगु मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिर किंवा मीनाट्चीअम्मन कोविल (मीनाक्षी आईचे देउळ) असेही म्हणतात. पार्वतीचे मीनाक्षी या रूपात आणि शंकराचे सुंदरेश्वर रूपात येथे मूर्तींच्या रूपात पूजन केले जाते.
अतिशय भव्य दिव्य आणि अतिशय मोठा परिसर असलेले हे मंदिर पुरातन वास्तुकलेचा एक अत्युत्कृष्ट नमुना म्हणावा लागेल. येथील एक सहस्र खांब असलेला सभा मंडप याची साक्ष देतो. मंदिरात चार मुख्य दरवाजे आहेत (गोपुरम) जे एकमेकांसारखे दिसतात. चार गोपुरामांव्यतिरिक्त, मंदिरात इतर अनेक गोपुरम आहेत, जे अनेक तीर्थक्षेत्रांचे प्रवेशद्वार म्हणून काम करतात. मंदिरास एकूण 14 प्रचंड दरवाजे आहेत. त्यापैकी प्रत्येक एक बहु-मजली रचना आहे आणि हजारो पौराणिक कथा आणि इतर अनेक शिल्पे दाखवतो.
अशीही मान्यता आहे की,
देवी मिनाक्षी ही देवी सटवेश्वरीचे रुप आहे. महाराष्ट्रातील देवी सटवेश्वरी ऊर्फ सटवाई मातेला दक्षिण भारतात देवी मिनाक्षी असे संबोधले जाते. देवी मिनाक्षी हिच देवी लक्ष्मी मातेची बहीण आहे.
जगाच्या पाठीवर कुठेही जा, खरेदी म्हटलं की स्त्रियांचा जीव की प्राण. त्यामुळे आम्ही जास्त आढेवेढे न घेता थोडीशी खरेदीची परवानगी दिली. परतीचा प्रवास विमानाचा असल्याने आणि त्यात सामानाच्या वजनाचे बंधन असल्यामुळे खरेदीवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंध आले होते. महिलावर्ग बऱ्यापैकी नाराज झाला (आम्ही मनातून खुश होतो), परंतु नाईलाज होता. त्यांची नाराजी झेलत दर्शन आटोपून रूमवर परतलो, आणि पहिल्या वाहिल्या विमान प्रवासासाठी बॅगा पॅकिंगच्या तयारीला लागलो.
अशा रितीने मुख्य यात्रेचे उद्दिष्ट सफल झाले होते, आता फक्त बू.....म मध्ये बसून सुखरूप पणे मुंबई मार्गे नाशिक ला पोहोचणे बाकी राहिले.
आपला प्रवास सुखाचा होवो हीच प्ररमेश्र्वरचरणी प्रार्थना
उत्तर द्याहटवाधन्यवाद, प्रवास केंव्हाच झाला आहे
उत्तर द्याहटवा👍👍👍
अतिशय सुरेख 👌👌👌💐💐🌹🌹👍👍काही गोष्टी प्रत्यक्ष पाहून माहीत नव्हत्या त्या आता कळल्या🙏🙏
उत्तर द्याहटवा