8. आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस आठवा दि 14/10/22*
आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस आठवा
दि 14/10/22
काल सायंकाळी ढगांसोबतच्या चढाओढीत, सुर्यदेवाने आम्हाला सुर्यास्ताचा आनंद मिळू दिला नव्हता. पण किमान सूर्योदय तरी पाहायचाच हे ठरवले होते. आजची पहाट सर्वांना सूर्योदयाची एक अद्भुत अनुभूती देणारी ठरली. पहाटे पाच वाजता उठून सर्वजण हॉटेलच्या टेरेसवर जमले आणि समुद्रातून वर येणाऱ्या सूर्याच्या आगमनाची चाहूल देत त्याची सोनेरी प्रभा सर्व आसमंतात पसरू लागली. पाठोपाठ दिवसभरासाठी जगावर राज्य गाजवण्याकरिता सज्ज होत हळूहळू सूर्यदेवाचे आगमन झाले. हॉटेल मधील अनेक पर्यटक देखील आमच्या सोबत ह्या क्षणांचे साक्षीदार झाले होते. एवढेच नव्हे, खाली समुद्रकिनारी तर पर्यटकांचा जणू मेळावाच हे सर्व अनुभवत होता. या रोमांचकारी अनुभवाने सर्वच मंत्रमुग्ध होऊन गेलो.
त्यानंतर सुरू झाला आमचा या दौऱ्यातला सर्वात मोठा प्रवास. सव्वा तीनशे किलोमीटरचा कन्याकुमारी ते रामेश्वरम व धनुष्कोटी हे अंतिम टोक. या प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे एनएच - 44 हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय सुंदर बांधलेला असून त्याची देखभाल देखील उत्तम ठेवलेली आहे. अक्षरशः पोटातले पाणीदेखील हलत नाही. रस्त्याच्या दुतर्फा लागणारी नारळाची आणि ताडामाडाची मोठमोठी झाडे ठिकठिकाणी शेती केल्यासाखी दिसतात. त्यानंतर बराच मोठा पट्टा, जवळपास पंधरा ते वीस किलोमीटर पर्यंत, पवनचक्क्यांचे अक्षरशः जाळे पसरलेले आहे. हे सर्व अदभूत आणि नयनरम्य दृश्य नजरेत साठवत, कधी पेंगुळल्याने बसल्या जागी छोटीशी डुलकी घेत, दुपारी दोन वाजता आम्ही रामेश्वरम च्या अलीकडेच 4 ते 5 किमी अंतरावरील पंबन पूल येथे पोहोचलो.
पंबन पूल हा भारताच्या तमिळनाडू राज्याच्या, रामनाथपुरम जिल्ह्यामधील एक सागरी रेल्वे पूल आहे. मन्नारचे आखात व पाल्कची सामुद्रधुनी ह्या हिंदी महासागराच्या उपसमुद्रांवर बांधला गेलेला ६,७७६ फूट (२,०६५ मी) लांबीचा हा पूल रामेश्वरम द्वीपाला मुख्य भारतीय भूमीसोबत जोडतो. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले रामेश्वरम या गावामध्ये फक्त ह्या पुलाद्वारेच प्रवेश करता येतो. वास्तविकपणे येथे रेल्वेवाहतूकीसाठी एक व मोटार वाहतूकीसाठी एक असे दोन वेगळे पूल अस्तित्वात असून दोन्ही पुलांना एकत्रितपणे पंबन पूल असे म्हटले जाते.
२४ फेब्रुवारी १९१४ मध्ये वाहतुकीस खुला केला गेलेला पंबन रेल्वे पूल भारतामधील सर्वात पहिला सागरी पूल आहे. ह्या जुन्या पुलाच्या शेजारी १९८८ साली मोटार वाहतूक पूल बांधला गेला जो रेल्वे पूलाला पूर्णपणे समांतर आहे. ह्या नवीन रेल्वे पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे, मधूनच दोन भागात उघडणारा हा भव्य आणि देखणा पूल. येथून जहाजांना जाण्यासाठी मार्ग दिला आहे. मात्र हा पूल देशातील असा पहिला पूल असणार आहे, जो मध्यभागावरुन वर जाईल आणि जहाजे त्याखालून जाऊ शकतील.
रामेश्वरमला पोहोचल्यावर आपली मोठी वाहने शहरात नेता येत नाहीत. येथून स्थानिक छोटी वाहने घेऊन आपल्याला शहरात जात येते. शहराच्या सुरवातीलाच असलेल्या, भारताचे माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ वैज्ञानिक भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर यांच्या प्रदर्शनीस भेट देण्यासाठी गेलो. अतिशय सुंदर पद्धतीने बांधकाम व प्रदर्शनीची रचना केलेली आहे. डॉ अब्दुल कलाम यांच्या लहानपणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंतची सर्व जीवन कथाच चित्ररूपाने येथे मांडण्यात आलेली आहे. बरेचसे फोटो हे पोट्रेट स्वरूपात आहेत. त्यांच्या राष्ट्रपती निवासातल्या वैयक्तिक वस्तू, शिलॉंग येथील शेवटच्या दौऱ्यातील त्यांच्याबरोबरच्या वस्तू, त्यांनी संशोधित केलेले विविध रॉकेट्स, त्यांना मिळालेले विविध पारितोषिके, सन्मान चिन्हे, इत्यादींच्या प्रतिकृती येथे ठेवण्यात आलेल्या आहेत. अतिशय प्रेक्षणीय असे हे स्थळ आहे.
त्यानंतर गावातील हनुमान मंदिर, लक्ष्मण कुंड व मंदिर, नटराज मंदिर अशी छोटी मोठी मंदिरे पहात आम्ही भारताचे शेवटचे टोक असलेल्या धनुष्कोडी या पुराणातल्या रामसेतू अर्थात श्रीरामांच्या वानरसेनेने बांधलेला पूल पाहण्यासाठी गेलो. जवळपास 16 किलोमीटर दोन्ही बाजूने समुद्र आणि मधोमध फक्त एकेरी रस्ता असे अतिशय विलोभनीय दृश्य होते. धनुष्कोडी येथे पोहोचल्यावर आपण भारतातल्या शेवटच्या टोकावर येऊन उभे आहोत ही जाणीवच अतिशय अविश्वासनीय व रोमांचकारी आहे. येथून श्रीलंका केवळ 24 किलोमीटर अंतरावर आहे. दुर्बिणी घेऊन बाजार मांडलेल्यांनी आम्हाला त्याचे आभासी दर्शन दाखवण्याचा प्रयत्न केला. परतीच्या प्रवासात रस्त्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर समुद्राच्या मध्ये रावणाचे बंधू श्री बिभिषण राज यांचे मंदिर आहे. असे मानले जाते की, राम-रावण यांच्यातील युद्ध समाप्तीनंतर प्रभू श्रीरामचंद्रांनी रावण वधानंतर श्रीलंकेचा राजा म्हणून विभीषणाचा येथेच राज्याभिषेक केला होता. प्रभू राम, लक्ष्मण, सीता, हनुमान आणि बिभीषण राज यांच्या मूर्ती येथे ठेवण्यात आलेल्या आहेत. तेथून पुढे पुन्हा शहरात परत आल्यावर डॉ अब्दुल कलाम यांचे रामेश्वरम येथील निवासस्थान पाहण्यास गेलो. अतिशय छोट्याशा रस्त्यावरील गल्लीबोळात असलेले, डॉक्टर अब्दुल कलाम यांचे हे निवासस्थान, ते किती साध्या परिस्थितीतून वर आले हे याची लगेच जाणीव करून देते. निवासस्थानाला आता जरी थोडासा व्यावहारिक टच देण्यात आलेला असला तरी येथे देखील त्यांच्या आठवणी सांगणाऱ्या अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
हाताशी वेळ असल्यामुळे आम्ही तसेच श्री रामेश्वरम मंदिर पाहण्यास गेलो. अतिशय भव्य दिव्य आणि अतिशय विस्तीर्ण पसरलेले हे मंदिर त्या काळातल्या वास्तुशिल्पकलेचा अप्रतिम नमुना म्हणावा लागेल. खरोखर त्या काळच्या अभियंतांना दंडवतच घातले पाहिजे. भारतातील चार धामांपैकी एक आणि बारा ज्योतिर्लिंगां पैकी एक असे या स्थानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आत मध्ये फोटोग्राफी, कॅमेरा याला परवानगी नसल्यामुळे फोटोचा आनंद घेता आला नाही, पण त्यामुळे आम्ही लवकर बाहेर पडू शकलो. त्यानंतर रूमवर परतून सुरुची जेवणाचा आस्वाद घेतला आणि झोपी गेलो. या संपूर्ण दौऱ्यातली अजून एक उल्लेखनीय बाब म्हणजे आम्हाला सकाळी मिळणारा नाश्ता आणि रात्रीचे जेवण अतिशय उच्च प्रतीचे असे आहे. नाश्त्याला कमीत कमी सात ते आठ प्रकार आणि जेवणातही व्हेज नॉनव्हेज चे अनेक पदार्थ, तेही अमर्यादित., याचा समावेश असतो. त्याचप्रमाणे देण्यात येणाऱ्या हॉटेलच्या रूम देखील खूप सुंदर आहेत. सर्व प्रकारच्या सुविधा यांनी युक्त अशा या रूम आमचा दिवसभराचा थकवा दूर करतात. आमची प्रवासाची वातानुकूलित गाडी व कुशल सारथी रीजील भैया हेही प्रवासाच्या आनंदात भर घालतात.
APJ Abdul Kalam Museum |
अधून मधून वाचत राहू म्हणजे पुन्हा पुन्हा गेल्याचा आनंद निश्चित मिळेल आणि खऱ्या अर्थाने यात्रा संस्मरणीय राहील यात शंका नाही इतके इत्यंभूत वर्णन👌👌👌👌💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा