7. आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस सातवा दि 13/10/22*
आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस सातवा
दि 13/10/22
आजचे नियोजन म्हणजे पहाटे श्री पद्मनाभ स्वामींचे मंदिर दर्शन आणि कन्याकुमारी साठी प्रयाण असे होते.
काल सायंकाळी कोवलम बीच ची मजा घेतल्यानंतर आज पहाटे दोन वाजता उठून तीन वाजता श्री स्वामी पद्मनाभ स्वामी मंदिरात पोहोचलो. साडे तीन ते पाच अशी भेटीची वेळ होती. पहाट असल्यामुळे गर्दी कमी होती. त्यामुळे अतिशय सुंदर दर्शन झाले.
मल्याळम आणि तमिळमधील 'तिरुवनंतपुरम' शहराचे नाव "लॉर्ड अनंताचे शहर" (अनंत हे विष्णूचे रूप आहे ) असे आहे.
जुन्या आख्यायिकेनुसार या सर्व भागात घनदाट अरण्य होते. या जंगलातच विष्णूची मूर्ती मिळाली व तिची स्थापना करण्यात येऊन प्रसिद्ध पद्मनाभस्वामीचे मंदिर बांधण्यात आले. हे हिंदू मंदिर फार जुने असून त्यातील लाकडावरील कोरीव काम आणि गोपुरे प्रसिद्ध आहेत. भिंती उंच असून, यांशिवाय दगडावरील कोरीव कामात रामायण आणि महाभारत यांतील अनेक प्रसंग चित्रित केले आहेत.
मंदिर चेरा शैली आणि द्रविडीयन वास्तुकलेच्या गुंतागुंतीच्या संमिश्रणात बांधले गेले आहे. काही प्रमाणात हे मंदिर तामिळनाडूमधील कन्याकुमारी जिल्ह्यातील तिरुवत्तर येथील आदिकेसव पेरुमल मंदिराची प्रतिकृती आहे असे सांगितले जाते.
प्रमुख देवता पद्मनाभस्वामी ( विष्णू ) आहेत, जे "अनंत शयन" मुद्रेमध्ये विराजमान आहेत. पद्मनाभस्वामी हे त्रावणकोर राजघराण्याचे दैवत आहे .
चार वाजून दहा मिनिटांनी अतिशय मंगलमय वातावरणात अभिषेक व साडेचार वाजता आरती, त्यानंतर भक्तांना प्रसाद वाटप अशा सर्व गोष्टी अनुभवता आल्या. आरती व अभिषेक साठी आम्ही सर्व मुख्य गाभाऱ्यात हजर होतो हे आमचे आहोभाग्य. कायमस्वरूपी स्मरणात राहणारा हा रोमांचकारी अनुभव होता.
त्यानंतर कन्याकुमारीच्या रस्त्याने पाच ते दहा किलोमीटर आत मध्ये गेल्यानंतर पुऊर या ठिकाणी कैराली बॅकवाटर्स नावाचे ठिकाण आहे. बोटीतूनच भुलभुलैया सारखे छोटे छोटे प्रवाह / साठवण असलेल्या जंगलातुन मार्ग काढत पुढे पुढे जात राहायचे. आत जाताना छोटे छोटे कालवे तयार केलेले आहेत. आजूबाजूंनी पूर्ण जंगल, मधून तीन चार फुटाचा कालवा आणि बाजूच्या नारळी व इतर झाडांवर बसलेले विविध पक्षी, जसे किंगफिशर, सि क्रो, इत्यादी बघायला मिळतात. विविध पक्षी, वनस्पती इ यांना अतिशय जवळून पाहत, त्यांची माहिती घेत, आनंद घेत, फोटोग्राफी व शूटिंग करत साधारणतः अर्ध्या तासाने आम्ही नय्या नदी व अरबी समुद्र जेथे एकमेकाला मिळतात तेथे पोहोचलो. अतिशय अद्भुत असा हा अनुभव होता. या संगमाच्या ठिकाणी आत एक बेट तयार झालेले आहे. या बेटाच्या एक बाजूने नदी तर दुसऱ्या बाजूला समुद्र असून येथील वाळू चमकत असल्यामुळे तिला गोल्डन सॅण्ड असे नाव दिले आहे.
येथेच पाण्यामध्ये एका छोट्याशा बेटावर सुंदर असे चर्च वजा माऊंट मेरीचे छान शिल्प उभारण्यात आले आहे. समुद्र अतिशय खोल असल्याने या ठिकाणी कोणालाही समुद्राच्या पाण्यात उतरू दिले जात नाही. अतिशय अवर्णनीय असे हे ठिकाण कोठेतरी मनात साठवत, मनसोक्त फोटोग्राफी करत पुन्हा त्याच बोटींनी परतीच्या प्रवासास निघालो.
बऱ्यापैकी दमछाक झाल्याने सर्वांना छानपैकी भूक लागली होती. खास दाक्षिणात्य पदार्थ मिळतील अशा हॉटेलला थांबून, रस्सम, दाल, चावल, पापड, यासह महाराष्ट्रीयन पोळी, भेंडी इ पदार्थांवर ताव मारला. मी तर हे दाक्षिणात्य लोक ज्या पद्धतीने डाळभात एकत्र करून त्या घासाचा गोळा करून तळ हातावर गोलगोल फिरवून तोंडात टाकतात, तसा प्रयत्न करण्यासाठी दुसरीकडील टेबलावर बसून जेवत असलेल्यांचे काही वेळ निरीक्षण केले व मग प्रयत्न केला, पण नाही जमले. असो
एक मात्र नक्की, प्रवासाला येण्याअगोदर अशा चर्चा ऐकल्या होत्या की दक्षिण भारतातील लोक हिंदी बोलत नाहीत, फक्त इंग्रजी किंवा केरळी/तामिळी बोलतात, महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ येथे मिळत नाहीत त्यामुळे खूप हाल होतात वगैरे वगैरे... परंतु प्रत्यक्षात असे काहीच आढळले नाही.
पुढे प्रवास सुरु ठेवत दुपारी 2 वाजेपर्यंत कन्याकुमारी ला पोहोचलो. जितके मोठे हे नाव व त्याविषयीची मनातली प्रतिमा होती, त्या तुलनेत हे अतिशय छोटे गाव आहे. भारताच्या दक्षिण दिशेला असणाऱ्या भूमीच्या टोकावर असणारे हे गांव पूर्वी केप कॉमोरीन ह्या नावाने देखील ओळखले जायचे. तसेच स्थानिक भाषेत (तमिळ) ह्याचा उच्चार कन्नीकुमरी असा देखील केला जातो. कन्याकुमारीला पोहोचल्यानंतर लगेचच समुद्रात असलेल्या स्वामी विवेकानंद स्मारकाकडे बोटीने निघालो. मोठमोठ्या 3-4 बोटी सातत्याने प्रवाशांना ने आण करीत असतात. फक्त 5 ते 10 मिनिटांचा हा प्रवास, पण आनंद देऊन जातो. स्वामी विवेकानंद स्मारक हे वास्तुकलेचा अत्यंत उत्तम नमुना आहे. एवढ्या मोठ्या समुद्रात एव्हढी मोठी कलाकृती कशी बांधली असेल याचा विचार करूनच डोके गरगरायला होते. मंदिराभोवती चे तिन्ही समुद्रांच्या संगमाचे, डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य खूपच मनोहारी आहे. ( पूर्वेला बंगालचा उपसागर, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पश्चिमेला अरबी समुद्र).
स्वामी विवेकानंदांची अतिशय मनोहारी मूर्ती व या मंदिराच्या आजूबाजूला त्यांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस, त्यांच्या मातेचे आणि पार्वती माता देवीचे पाऊल असलेले मंदिर आहे. तळघरात ध्यान करण्यासाठी ध्यानधारणा केंद्र आहे. या ठिकाणी मनाची एकाग्रता आणि तेथील शांतता याचा मेळ बसला तर स्वर्ग सुखाची अनुभूती येते. बाहेरील लाटांचा येथे अजिबात आवाज येत नाही. सर्वांनी याचा अनुभव घेतला , दुर्दैवाने मी या सर्व सुखापासून वंचित राहिलो.
त्यानंतर समुद्रकिनारीच असलेल्या हॉटेल सी व्ह्यू ला आराम करून सायंकाळी आम्हाला समुद्रात अस्ताला जाणारा सूर्य पहायचा होता. खूप धावपळ करून किनाऱ्यावर पोहोचलो, पण हाय रे दैवा...
आमच्या दुर्दैवाने सूर्यनारायण आमच्यावर रुष्ट झाले होते आणि आणि मेघराजानी देखील आमच्यावर वक्रदृष्टी करून सूर्याला साथ दिली. ढग आणि सूर्य यांच्या चढाओढीत ढगांची सरशी झाली आणि सूर्यास्त बघण्याचे आमचे स्वप्न, स्वप्नच राहिले.
त्यानंतर जड अंतकरणाने तेथून निघून म्युझिकल फाउंटन ला म्युझिकल शो बघण्यासाठी गेलो. तेथील अर्ध्या तासाचा संगीताच्या तालावरील पाणी आणि लाईट यांच्या जुगलबंदीचा हा शो डोळ्यांचे पारणे फेडून गेला. नाराज झालेली मने पुन्हा उल्हसित झाली. असाच शो आपल्याकडे पैठण येथील गार्डन ला देखील होतो.
ते आटोपून लगेच कन्याकुमारी माता मंदिराकडे प्रयाण केले. उशीर झाला असल्याने फारशी गर्दी नव्हती, अतिशय छान दर्शन झाले. हिंदू देवी कुमारीला समर्पित केलेले, हजारो वर्षे जुने, समुद्रकाठावर वसलेले अलंकारिक मंदिर आणि तीर्थस्थळ आहे हे. त्याचप्रमाणे हे मंदिर अतिशय भव्य असून, जुन्या काळाच्या बांधकामाचा तो उत्कृष्ट नमुना आहे. असे मानले जाते की कन्याकुमारी देवी सतत कुमारिका राहिल्यामुळे पर्यटकांना आशीर्वाद मिळतो. येथे मान्यता अशी आहे की देवीच्या आशीर्वादाने अविवाहित लोक चांगले विवाहस्थळ मिळवू शकतात आणि त्वरीत लग्न करू शकतात. त्यानंतर शेवटी हॉटेलला मुक्कामासाठी पोहोचलो.
अशा अशा रीतीने आजचा संपूर्ण दिवस हा भरगच्च कार्यक्रमाने सर्वांना आनंद देऊन गेला...
हा माझा अत्यंत आवडता दिवस होता खूप छान वर्णन👌👌👌💐💐💐👍👍👍राजेन्द्र पोतदार
उत्तर द्याहटवा