आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस सहावा दि 12/10/22

 आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस सहावा 

दि 12/10/22


आजचा प्रवास हा आलेप्पी ते त्रिवेंद्रम - अंदाजे १५५ किलोमीटरचा होता.  सकाळी हाऊस बोट वर नाश्ता करून  पुढील प्रवासास निघालो. अतिशय आल्हाददायक वातावरण ... नेहमीप्रमाणे सकाळची भजने, गाणे म्हणत मार्गक्रमण सुरू झाले.  शहर सोडल्यानंतर पुढे रस्त्याच्या दुतर्फा रबराचे मळे दिसू लागले.  रबराच्या झाडाचा चिक काढण्यासाठी प्रत्येक झाडाला ठराविक प्रकारचा काप देऊन त्याच्या टोकाशी भांडे लटकविण्यात येते.  या भांड्यांमध्ये जमा होणाऱ्या चिकापासून रबर व त्यापासून पुढे विविध वस्तू बनवतात.  रबराची ही झाडे नारळीच्या झाडांसारखेच अतिशय उंच होती.  गाडीमध्ये सोबत आणलेला, खाऊ रस्त्याने मिळणारी फळे, चहा, नारळ पाणी इत्यादीचा आस्वाद घेत, कधी गाडीतील टीव्हीवर पिक्चर बघत,  गाणे ऐकत, त्रिवेंद्रम पासून अवघ्या 15-16 किलोमीटर अलीकडे असलेल्या कोवलम बीच वर कधी पोहोचलो ते समजले देखील नाही. रस्त्यात एक गोष्ट प्रामुख्याने दिसली, ती म्हणजे किनारपट्टी असल्याने सर्व घरे / गावे ही रस्त्यांवरच दिसून आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरे व दुकाने. एक गाव केंव्हा संपले व दुसरे कधी सुरू झाले हे समजत नव्हते, इतके त्या घरांच्या बाबतीतले सातत्य दिसून आले. संपुर्ण प्रवासात शहाळांच्या (नारळाच्या) बाबतीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे,  कोकण असो वा केरळ, नारळाचे आगार असून देखील येथे शहाळे स्वस्त मिळाले नाहीत. नाशिकच्या भावात सर्वत्र घ्यावी लागली.  असो...

 कोवलम बीच वर पोहोचलो आणि अतिशय मनोहारी दृश्य समोर उभे ठाकले. अथांग पसरलेला समुद्र,  किनाऱ्याकडे झेपावत येणाऱ्या त्याच्या उंच आणि अवखळ लाटा..  किनाऱ्यावर एका बाजूला दाट झाडी.  सर्वच अतिशय सुंदर आणि नयनरम्य... याची अधिक माहिती घेतली असता,  -  

कोवलम हा आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला जाणारा समुद्रकिनारा आहे, ज्याला तीन किनारे जोडलेले आहेत. 1930 पासून हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. या समुद्रकिनाऱ्यावर एक प्रचंड खडकाळ टेरेस बांधण्यात आली आहे, जी शांत पाण्याचे सुंदर दृश्य निर्माण करते आणि आंघोळीसाठी हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे.

या बीचवर सुट्टी घालवण्याचे अनेक पर्याय आहेत. वाळूवर सूर्यस्नान, पोहणे, हर्बल बॉडी मसाज,इ.  उष्णकटिबंधीय प्रदेश असल्यामुळे सूर्याची उष्णता इतकी तीव्र असते की तुम्हाला तुमच्या त्वचेवर काही मिनिटांत उन्हाचे चटके जाणवतात असे सांगितले जाते.


या ठिकाणी येऊन समुद्रात स्नान करण्याची मजा न घेता तरच नवल.  सर्वांनीच अतिशय मनसोक्तपणे समुद्रात डुबण्याचा , अंघोळीचा आनंद लुटला...  आणि त्यानंतर पुढे अवघ्या 16 किमी अंतरावर असलेल्या त्रिवेंद्रमला हॉटेलवर पोहोचलो.

तिरुअनंतपुरं किंवा तिरुवनंतपुरम् ऊर्फ त्रिवेंद्रम् हे  केरळ राज्याच्या राजधानीचे शहर आहे. हे शहर तिरुवनंतपुरम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. येथे पद्मनाभ विष्णूचे मंदिर आहे.

या त्रिवेंद्रमचा इतिहास पाहिला असता,  पूर्वीच्या त्रावणकोर संस्थानची व हल्लीच्या केरळ राज्याची ही राजधानी.  कोचीन पासून 220 तर कन्याकुमारीपासून  ८५ किमी. अंतरावर, समुद्रकिनाऱ्यापासून ३ किमी. आत समुद्रसपाटीपासून ७६ मी. उंचीवर हे शहर वसले आहे. शहराचा परिसर हिरव्यागार वनश्रीने नटलेला आहे.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1. आमची श्री जगन्नाथ पुरी यात्रा

2. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - , कोणार्क

4. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - गंगासागर