आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस पाचवा दि 11/10/22

 *आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस पाचवा          दि 11/10/22*


आजचा दिवस हा टेकडी ते आलेप्पी हा दीडशे किलोमीटर प्रवासाचा व हाउसबोटीवरील मुक्कामाचा होता.  येथे एक आठवण प्रकर्षाने होते ती म्हणजे,  दररोज सकाळी लवकर उठल्यावर, नाश्त्याला एकत्र जमले की,  माऊली अर्थात बाळासाहेब यांनी पूर्ण यात्रेदरम्यान पाळलेले एक तत्व.  ते म्हणजे स्वतःच्या हाताने सर्वांना सकाळी सकाळी अष्टगंध लावून एक प्रकारे धार्मिक वातावरणाची सुरुवात करत असत. मुक्कामी असलेले हॉटेल पेपरवाइन (इंटर ग्रँड हॉटेल) चा परिसर अतिशय सुरेख होता.  परिसरातील बगिच्या मध्ये पुन्हा एकदा सर्वांनी मनसोक्त फोटोग्राफीचा आनंद घेतला आणि नाश्त्यानंतर पुढील प्रवासास निघालो.  

आलेप्पी या शहराला खरे तर आलपूझा असे नाव आहे, पण व्यवहारात मात्र आलेप्पी असेच रूढ झाले आहे. 

अलप्पुळा शहर एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. येथील कालवे व निसर्गरम्य खारकच्छांमुळे ह्यास पुर्वेकडील व्हेनिस (Venice of the East) असेही म्हणतात. वेंबनाड सरोवराच्या दक्षिण टोकास स्थित असल्यामुळे अलाप्पुळाहून निवासी बोटीमधून २-३ दिवसांची सफर हे येथील मोठे आकर्षण आहे.

दुपारी साधारणतः एक वाजेच्या दरम्यान आम्ही आलेप्पीला पोहोचल्यावर लगेचच एका छोट्या बोटीने, मोठ्या हाऊसबोटी कडे गेलो आणि हाऊसबोटवर चढल्याबरोबर लगेचच बोट फेरीसाठी निघाली.   कच्च्या घराची उपमा देता येईल अशा एका बोटीवर एक, चार, आठ रूम अशाप्रकारे स्वयंपाकासह सर्व सुविधायुक्त बोटी येथे मोठ्या संख्येने आहेत.  खोल पाण्यातील बोटीवर प्रवास करताना तिच्या उघड्या डेकवर बसून जेवण, मनोरंजन, त्यातले त्यात त्यावर पत्ते खेळण्याचा आनंद अफलातून होता. कल्पना करा... बोट पाण्यातून चालली आहे. आजूबाजूला सर्वत्र पाणीच पाणी.  इतर बोटी देखील मागे पुढे आहेत.  वरती मोकळे आकाश. मंद , हलकीशी दमट हवा. आणि त्यात बोटीवरचे नॉनव्हेज जेवण. काय मजा येत असेल.  अशातच पुढे गेल्यावर एका ठिकाणी एका किनाऱ्यावर एक छोटीसे मासे मार्केट बनविलेले आहे. येथे खवय्यांना विविध प्रकारचे मासे, खेकडे इत्यादी प्रकार कच्च्या स्वरूपात उपलब्ध असतात.  आम्ही देखील ते घेऊन बनवण्यासाठी खानसामाच्या सुपूर्द केले.  घेतलेले मोठे मासे हातात घेऊन फोटोसेशन देखील झाले.  बोट चालकाच्या परवानगीने सर्वांनीच बोटचालकाच्या सीटवर बसून, चक्र हातात घेऊन, जणू काही स्वतःच बोट चालवित आहे अशा आविर्भावात फोटो काढले. ही ही एक हौस...

त्यानंतर कोणाच्या तरी कल्पनेतून जोडीने डेकच्या किनाऱ्यावर उभे राहून,  दोन्ही हात लांब करून टायटॅनिक पोज मध्ये फोटोग्राफीची हौस भागवली. ग्रुपमध्ये असताना फोटोग्राफीची देखील एक मजा आहे.  एकाने एका पोझमध्ये फोटो काढला की, बाकी सर्वांचे त्या पोझमध्ये फोटो आलेच पाहिजेत हा ग्रुप चा अलिखित नियम... असो,  माणूस एकदा का घराबाहेर पडला की ग्रुप मध्ये सगळे व्याप, ताणतणाव विसरून मनापासून तो निसर्गाचा आनंद घेतो.  माणसाच्या मानसिक सुदृढतेसाठी  असे वर्षातून किमान एकदा तरी बाहेर पडणे फार गरजेचे आहे असे मला वाटते. 

 बोट पुन्हा  किनाऱ्याला आणली गेली.  खोल पाण्यातच बोटीवर आमचा मुक्काम राहील अशी आमची धारणा होती, परंतु येथे रात्रीच्या वेळेस बोट समुद्रात थांबवता येत नाही असा नियम आहे, त्यामुळे बोट रात्रीच्या वेळी किनाऱ्यावर आणून उभी करतात. तिच्यात आपण मुक्काम करू शकतो.  खानसामाकडे दिलेल्या माशांसह इतर अन्नपदार्थांनी रात्रीच्या जेवणात लज्जत आणली. खुल्या आकाशात डेकवर बसून सर्वांसह एकत्र भोजनाची  मजाच काही और होती. त्यानंतर सर्वांना उत्सुकता होती ती पाण्यावर तरंगणाऱ्या बोटीमध्ये आपापल्या रूममध्ये जाऊन झोपण्याचा अनुभव घेण्याची. पण प्रत्यक्षात थोडीशी निराशाच झाली.  बोटी या किनाऱ्याला लावलेल्या असल्यामुळे तेथे सर्वत्र साचलेल्या दाट पानवेलींमध्ये असणाऱ्या डासांचे साम्राज्य व त्या साचलेल्या पाण्याला येत असलेला एक प्रकारचा कुबट वास,.  यामुळे अपेक्षित आनंदावर विरजण पडले. कसेबसे झोपलो. 

आयुष्यात पाण्यावर रात्रभर झोपण्याचा हाही एक वेगळाच अनुभव या निमित्ताने घेता आला...

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1. आमची श्री जगन्नाथ पुरी यात्रा

2. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - , कोणार्क

4. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - गंगासागर