4. आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस चौथा दि 10/10/22*

 *आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस चौथा          दि 10/10/22*


आज सकाळी मुन्नार हून टेकडी साठी प्रयाण केले.  रस्त्यात वंदनमेडू येथे दक्षिण भारतातील सर्वात मोठे गणपती मंदिर आहे.  या गणपतीची मूर्ती 38 फूट उंच असून काळ्या दगडात अतिशय रेखीवपणे घडवली आहे. ही भारतातील एकमेव गणेश मूर्ती अशी आहे की जिला वेलचीचा प्रसाद चढवला जातो. गणाधीशाचे मनोभावे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. साधारणतः बारा वाजेच्या दरम्यान आम्ही कुमिली अर्थात टेकडी येथे पोहोचलो.  एकदा मुन्नार सोडले की मग पर्वतीय प्रदेश संपून सपाट प्रदेश सुरू होतो.  या टेकडी गावाच्या  मध्यान्नी अंदाजे दोन एकर जागेत हत्तीवर सफारी करता येते. त्यासाठी एक मानवनिर्मित कृत्रिम जंगल बनवण्यात आले आहे. आम्ही आतापर्यंत लहान मुलांना उंटावर, घोड्यावर, हत्तीवर बसवले, पण स्वतः मात्र कधी बसलो नव्हतो.  आमच्यापैकी काहींनी ती हौस येथे, जोडीने हत्तीवर बसून पूर्ण केली.  अंदाजे दहा फूट उंचीचे ते अजस्त्र हत्ती,  त्यावर बनविलेल्या अंबारीवजा आसनावर आपण बसायचे आणि मग तो डुलत डुलत एक मोठा चक्कर मारून आपल्याला परत जागेवर आणतो.  केदारनाथ यात्रेदरम्यान मी दोनदा घोड्यावरून पडलेलो असल्यामुळे पूर्ण वेळ जीव मुठीत धरूनच हत्तीवर बसलो होतो.  उतरल्यावर हत्ती त्याची सोंड आपल्या डोक्यावर ठेवून आपल्याला आशीर्वाद देतो (अर्थातच काही देणगीच्या बदल्यात ) मात्र हे फारच मनोरंजक होते. त्यानंतर येथील इंटर ग्राउंड हॉटेल येथे ताजेतवाने होऊन लगेचच तीन वाजेच्या दरम्यान जंगल सफारी साठी बाहेर पडलो.  जंगल सफारीसाठी आम्हाला तीन जीप गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली होती. जंगल सुरू झाल्यावर जीपचे वरचे हूड काढून टाकले जाते, जेणेकरून सर्वांना जंगल दर्शन होईल. सर्वजण आम्ही अतिशय उत्सुक व आतुर होतो या जंगल सफारीसाठी. सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे कोठे तरी वाघ, हरणे इत्यादी प्राणी बघायला मिळतील अशी अपेक्षा होती.   गाव सोडल्यावर कच्च्या रस्त्याने गाड्या जंगलाकडे निघाल्या (जंगल कसले ते फक्त माळरानच होते. ह्यापेक्षा चांगली जंगले तर आमच्या पेठ - सुरगाण्याला आहेत).  रस्त्याने दुतर्फा गवती चहा उगवलेला होता . परंतु फक्त उजाड टेकड्या व्यतिरिक्त कोठेही एखादा प्राणी अगर एखादे चीटपाखरू देखील आम्हाला दर्शन द्यायला तयार नव्हते. शेवटी गाड्या एका उंच डोंगराच्या पायथ्याशी येऊन थांबल्या. हे जंगल सफारीचे शेवटचे टोक होते. आम्ही अजूनही मोठ्या आशेने जंगलाकडे पाहत होतो.  सरते शेवटी गाडीवानाने उंच डोंगरकड्यावर कुठलातरी एक काळा ठिपका हालचाल करताना दाखवून तो गवा असल्याचे आम्हाला सांगितले.  आम्ही फक्त त्याच्याकडे पाहून मान डोलावत राहिलो. या एका ठिपक्यासारख्या दिसणाऱ्या गव्याच्या आकृतीला बघून जंगल सफारीचे फसवे समाधान मानत ( मनातल्या मनात शिव्या घालत) टेकडीला परतलो.  रस्त्यात टपरीवर मिळालेला चहा मात्र सर्वांना ताजतवाना करून गेला. 

 टेकडी येथे सायंकाळी कथकली / मार्शल आर्ट कार्यक्रमाचे आयोजन होते.  ते पाहण्यासाठी आम्ही गेलो. तीन कलाकारांपैकी एक गायक-वादक आणि दोघे नर्तक.  दाक्षिणात्य पद्धतीचा पेहराव केलेले दोघेही कलाकारा मोठ्या ताकदीचे होते.  विशेष म्हणजे नृत्यादरम्यान त्यांचे डोळे आणि चेहऱ्यावरील हावभाव अतिशय वाखाणण्यासारखे होते.  मात्र नृत्यादरम्यान देवाची भूमिका साकार केलेल्या ज्या कलाकाराला आम्ही स्टेजवर भेटून वंदन केले, ज्याच्या सोबत फोटो काढला,  त्याच कलाकाराला मागच्या दरवाज्याने गुटखा खाऊन पचकन थुंकताना पाहून खूप किळस आली, आणि त्याच्या विषयीचा आदर क्षणात नाहीसा झाला.  तेथून होटेलवर आल्यावर  हॉटेल व्यवस्थापनाने आमच्या विनंतीनुसार आम्हास थोड्यावेळासाठी एक हॉल व माइक सिस्टीम उपलब्ध करून दिली होती.  तेथे सर्वांनीच दिवसभराचा थकवा, आजारपण, आपले वय, मान ई. सर्व काही विसरून वेगवेगळ्या गाण्यांवर मनसोक्त नाचण्याचा आनंद घेतला. शिवाजीराव, बाळासाहेब, जाधवसाहेब यांचा संबळावरील नाच तर अफलातून होता. सरते शेवटी बाळासाहेबांनी सादर केलेल्या  मंगलाष्टकाने आजच्या दिवसाची समाप्ती झाली. आवाजातील दमदारपणामुळे बाळासाहेबांचे मंगलाष्टक एवढ्या उच्च प्रतीचे होते की हॉटेलात असलेल्या अनेक जणांनी आम्हाला येथे लग्न आहे का म्हणून विचारले. सर्व थकलेले असल्यामुळे जेवून लगेच निद्रेच्या अधीन झालो....

टिप्पण्या

  1. असे काही तंतोतंत वर्णन की आजच जाऊन आलो
    मस्त👌👌👌👍👍🙏🙏
    Great
    उद्याची वाट पाहतो--- राजेन्द्र पोतदार

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1. आमची श्री जगन्नाथ पुरी यात्रा

2. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - , कोणार्क

4. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - गंगासागर