3. आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस तिसरा - दि 9/10/22
*आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस तिसरा - दि 9/10/22*
आजचा दिवस हा मुन्नार येथे चहाचे मळे, चहाचे उत्पादन करणारी कंपनी, विविध औषधी वनस्पतींचा बगीचा व त्यांचे शोरूम इत्यादीसाठी राखीव होता.
इडुक्की जिल्ह्यातील, देवीकुलम तालुक्यातील मुन्नार ही केरळमधील सर्वात मोठी पंचायत आहे. मुथिरापुझा, नल्लाथन्नी आणि कुंडला या तीन नद्यांच्या संगमावर असलेल्या मोक्याच्या ठिकाणावरून मुन्नारला हे नाव मिळाले. 'मूनू' म्हणजे 'तीन' आणि 'अरू' म्हणजे 'नदी'.
सकाळी ऊठून गॅलरीत आल्यावर एकदम ढगातच असल्यासारखे वाटले. समोरचा डोंगर काहीच दिसत नव्हता. संपूर्णपणे धुक्याची चादर पसरलेली होती. घाटातून जाणाऱ्या वाहनांचा आवाज व दिवे तेवढे दिसत होते.. पाहता पाहता ऊन सावलीचा खेळ सुरू झाला आणि झपाट्याने धुके दूर होण्यास सुरुवात झाली. धुक्याचे ढग उंचावरून खाली येणे आणि पुन्हा त्याच पद्धतीने नाहीसे होणे हा प्रत्यक्ष अनुभव इतक्या जवळून पाहतांनाचे शब्दात वर्णनच करता येत नाही. धुके जाऊन ऊन आल्यावर दिसणारे समोरचे दृश्य अवर्णनीय होते. लांबच लांब पसरलेले एकसारखे दिसणारे चहाचे मळे, त्यातून जाणारी नागमोडी वाट, त्यावरील छोट्या खेळण्यासारखी दिसणारी वाहने...
कितीतरी वेळ या नयनरम्य दृश्याचा आनंद घेत मी गॅलरीत मंत्रमुग्ध उभा होतो. थोड्याफार फरकाने सर्वांची अवस्था ही माझ्यासारखीच होती. या परिस्थितीत देखील आमच्यातल्या काही व्यायाम प्रेमींनी बाहेर फेरफटका मारून आपल्या दैनंदिनीत बदल होऊ दिला नाही.
केरळ हे चहाप्रमाणेच मसाल्याच्या पदार्थांसाठी देखील सुप्रसिद्ध आहे. या मसाल्यांच्या पदार्थासाठी पोषक वातावरण या भागात आहे. मसाल्याच्या पदार्थांच्या मोठमोठ्या बाजारपेठा केरळमध्ये जागोजाग दिसून येतात. नाश्ता करून निघाल्यावर अशाच एका ग्रीनलँड नावाच्या औषधी (आयुर्वेदिक) बागेमध्ये आम्ही फेरफटका मारला. तेथील गाईडने अत्यंत बारकाईने व व्यवहार चातुर्याने आपल्या दैनंदिन वापरात येणाऱ्या सर्व मसाल्याच्या पदार्थांची झाडे दाखवून त्यांचे उपयोग, त्यांची निगा इत्यादी विषयी सविस्तर माहिती दिली. सर्वजण मंत्रमुग्ध होऊन त्याचे म्हणणे ऐकत व झाडांकडे कुतूहलाने बघत गाईड मागे चालत होते. ही फक्त सॅम्पल बाग होती. मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी दुसरीकडे प्रत्येक प्रकारच्या औषधी वनस्पतींची स्वतंत्र शेती असल्याचे सांगण्यात आले. सर्व पाहून झाल्यावर याच वनस्पतींपासून बनविण्यात आलेल्या विविध आजारांवरील औषधांची व मसाल्याच्या पदार्थांची तेथील स्टोअर मधून सर्वांनी आवश्यकतेनुसार खरेदी देखील केली. खरंच येथे आल्यावर निसर्गाची महती कळते.
रस्त्याने पुढे आल्यावर झिप लाईन म्हणून एका ठिकाणी साहसी पर्यटना चा एक प्रकार पाहायला मिळाला. दोन टेकडयाच्या मध्ये रोपवे टाकून, त्यात लोखंडी दोराला लोम्बकळून इकडून तिकडे जायचे व परत यायचे. साधारण पाचशे ते सहाशे मीटरचे हे अंतर दोन्ही बाजूने प्रत्येकी एक ते दीड मिनिटात पार होते. मात्र या छोट्याशा कालावधीत देखील तुमच्या धैर्याचा कस लागतो. कमकुवत हृदयाच्या माणसांचे हे काम नाही. आमच्यातून देखील फक्त दोघे तरुण तुर्क बाळासाहेब आणि धनंजय राव या दोघांनीच झीप लाईन वर सवार होण्याची हिंमत दाखवली. पुढे एका चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीला देखील आम्ही भेट दिली. चॉकलेटच्या फळापासून ते त्याच्या पॅकिंग पर्यंतची सर्व माहिती, विविध चवीसह अनुभवली. लहान मुलांना चॉकलेट खाऊ नको दात कीडतील असे रागावणारे आम्ही, येथे मात्र वेगवेगळ्या फ्लेवरच्या चॉकलेटची चव, आग्रहाने मागून घेत चाखत होतो. आपल्या प्रियजनांना भेट/खाऊ म्हणून खरेदी करण्यात कोणीच हयगय केली नाही.
त्यानंतर एका उंच अशा डोंगर उतारावरील चहाच्या मळ्याजवळ गाडी थांबली. सगळे त्या मळ्यात प्रत्यक्ष पाऊल ठेवण्यासाठी आतुर झाले होते. नील आर्मस्ट्रॉंग व युरी गागारीन हे देखील चंद्रावर पहिले पाऊल ठेवण्यास आतुर नसतील इतके... आत जाण्यासाठी काटेरी कुंपनाला एक छोटेसे दार होते. दरवाजा बंद होता परंतु बाजूने एक अतिशय छोटी वाट मध्ये जाण्यासाठी होती (सापट). त्यातून मध्ये जातांना कसरत करावी लागत होती. पट्टा तोडून बाहेर येऊ पाहणारी ढेरी मध्ये ओढत, बळेबळे बारीक होत स्वतःला कसे तरी आत ढकलण्याचा प्रयत्न करत मध्ये घुसत होतो. या अवघड प्रयत्नांनंतर एकदाचे चहाच्या मळ्यात पाऊल ठेवले अन आनंद गगनात मावेनासा झाला. लहानपणापासून फक्त पुस्तकातच पाहिलेल्या डोंगरउतारावरील लांबच लांब चहाच्या बागा, पाने खुडून पाठीवरील छोट्याशा टोपलीत टाकणाऱ्या स्त्रिया हे चित्र प्रत्यक्षात समोर अवतरले होते. छोट्या छोट्या पानांची, दोन ते तीन फुटाची, दाटी दाटीने लावलेली एकसारखी, एका रेषेत लावल्यासारखी झाडे. या झाडांना अनेक वर्षे आयुष्य असते. सर्व जण अतिशय आनंदित झालेले होते. मग सुरु झाले फोटो सेशन आणि सेल्फि सेशन. आपापल्या परीने प्रत्येक जण वेगवेगळ्या अँगल मधून फोटो काढत होता. कोणी आपल्या अर्धांगिनीच्या खांद्यावर एक हात ठेवून दुसऱ्या हाताने लांब वर पसरलेले शेत आपल्याच पिताश्रींचे आहे अशा अविर्भावात, तर कोणी प्रेयसीला फुल द्यावे तसे आपल्या सहचरणीला चहाचे पान देत. कोणी एकत्र येऊन आगगाडी सारखी पोज देत, तर कोणी कामाला आलेल्या बायकांसारखी पोझ देत.. काय पण एकेक त्या पोजेस अन नखरे ...
शेवटी नाईलाजाने ड्रायव्हर व काकांच्या पाठपुराव्यानंतर तेथून बाहेर पडलो. तिथून पुढे जवळच असलेल्या मुन्नार गावातील चहाचे उत्पादन करणाऱ्या एक प्राचीन कंपनीला भेट दिली. कानन देवण हिल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असे तिचे नाव. त्यांचे चहाचे म्युझियम देखील आहे. चहाच्या पानापासून ते थेट चहा तयार होऊन पॅकिंग पर्यंत त्याचा संपूर्ण प्रवास चित्ररूपाने येथे पहावयास मिळाला. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष चहा तयार कसा करतात याची, मशीनच्या सुरुवातीपासून ते शेवटी वेगवेगळ्या चव व प्रती नुसार वर्गीकरण - पॅकिंगपर्यंतची प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवता आली. या दरम्यान कच्च्या चहाची (पानांचा चोथा) याची चव देखील चाखली. सरते शेवटी येथेच तयार झालेल्या चहा पावडरचा प्रत्यक्ष चहा/कॉफीच्या स्वरूपात आस्वादही घेतला. टी बोर्ड ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून कानन देवन हिल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी च्या इंग्रज काळातील स्थापनेपासून ते आज पर्यंतच्या प्रगतीचा आलेख यावर अर्ध्या तासाची एक डॉक्युमेंटरी देखील येथे दाखविण्यात येते. त्या काळात एवढी मोठी मशीनरी पायथ्यापासून ते डोंगर माथ्यापर्यंत कशी आणली गेली हे देखील त्यात प्रकर्षाने नमूद केले गेले आहे.
सर्व आटोपून पुन्हा रूमवर परतलो. तोपर्यंत सायंकाळ झाली होती. परतीच्या वाटेवर सर्वत्र चहाच्या मळ्यांचेच दृश्य पुन्हा प्रत्येक ठिकाणी दिसत होते. पण आता मात्र सारखे तेच ते बघून त्यातले नवखे पण निघून चालले होते. मनुष्य स्वभावच आहे हा..
रात्रीची जेवनं झाल्यावर स्त्रियांचा एका ठिकाणी गप्पांचा फड तर पुरुषांचा काकांच्या रूम मध्ये जमलेला कट्टा !!!
धमालच धमाल ...
सगळे आनंददायी...
मस्त मस्त👌👌👍👍🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा