2. आमची दक्षिण भारत यात्रा - दुसरा दिवस दि. 8/10/22*

 *आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस दुसरा                  दि 8/10/22*

सकाळी बरोबर आठ वाजेच्या दरम्यान गाडी त्रिशूल येथे पोहोचल्यावर लगेचच आमच्यासाठी स्टेशनवर पुढील 8 दिवसांसाठी लागणारी वातानुकूलित गाडी तयार होती. खऱ्या अर्थाने नऊ दिवस व  आठ रात्रीच्या प्रवासाची सुरुवात झाली. लगेचच आम्ही मुन्नार साठी प्रयाण केले. रस्त्यातच श्री गुरुवायूर नावाचे पवित्र स्थान आहे., तेथे भेट दिली.

गुरुवायूर मंदिर केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील गुरुवायूर शहरात आहे. मंदिराच्या गाभार्‍यात श्रीकृष्णाची मूर्ती स्थापित आहे. मंदिरात बसवलेली मूर्ती शिल्पकलेचा अनोखा नमुना आहे. गुरुवायूर मंदिर 5000 वर्षे जुने आहे. या मंदिरात फक्त हिंदूच पूजा करू शकतात हे विशेष. 

हे केरळच्या हिंदूंसाठी सर्वात महत्वाच्या प्रार्थना स्थळांपैकी एक आहे. यालाच भूलोकावरील वैकुंठ, पृथ्वीवरील विष्णूचे पवित्र निवासस्थान म्हणून देखील ओळखले जाते. गुरुवायूर मंदिराची प्रमुख देवता श्रीविष्णू आहे, ज्याची पूजा कृष्ण अवतार म्हणून केली जाते. येथे श्री कृष्णाला *गुरुवायुरप्पन* असे म्हटले जाते, जे साक्षात भगवान श्रीकृष्णाचे बालस्वरूप आहेत. 

या नावाविषयी एक पौराणिक कथा सांगितली जाते - एका आख्यायिकेनुसार, भगवान श्रीकृष्णाने द्वारकेत मूर्तीची स्थापना केली. एकदा द्वारकेत भीषण पूर आला तेव्हा ही मूर्ती वाहून गेली आणि बृहस्पतीला (गुरूला) ही तरंगणारी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती मिळाली. त्यांनी वायुच्या मदतीने ही मूर्ती वाचवली.

या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी बृहस्पती पृथ्वीवर योग्य जागा शोधू लागले. शोधता शोधता तो केरळला पोहोचला, जिथे त्याने भगवान शिव आणि माता पार्वतीचे दर्शन घेतले. शिवाने सांगितले की, हे स्थान सर्वात योग्य आहे, त्यामुळे येथे मूर्तीची स्थापना करावी. त्यानंतर गुरु (बृहस्पति) आणि वायु (वायु देवता) यांनी मूर्तीवर अभिषेक करून तिची स्थापना केली आणि देवाने त्यांना वरदान दिले की *गुरू आणि वायु यांनी मूर्तीची स्थापना केल्यामुळे हे स्थान ' *गुरुवायूर* ' म्हणून ओळखले जाईल.* तेव्हापासून हे पवित्र स्थान या नावाने प्रसिद्ध आहे. येथे दर्शनासाठी पुरुषांना उघड्या अंगाने कमरेला फक्त लुंगी अथवा धोती आणि स्त्रियांना पांढरे कुर्ती किंवा साडी नेसूनच मंदिरात जावे लागते,  इतर सर्व धार्मिक स्थळांप्रमाणे येथे देखील दर्शनासाठीचा घोळ आढळून आलाच.  आम्हालाही त्याला तोंड द्यावेच लागले, नाईलाज होता, वेळेचे बंधन होते. ते सर्व आटोपून पुढे मुन्नार साठी निघालो.  वाटेत लागणाऱ्या म्यानमार (देश नव्हे) या एका उंच उंच धबधब्याजवळ थांबून त्याचे निसर्ग सौंदर्य व फोटोग्राफीचा मनसोक्त आनंद लुटला.  येथे मला एक मात्र प्रकर्षाने जाणवले की माणूस हल्ली मोबाईलच्या इतका आहारी गेला आहे की जे निसर्गसौंदर्य डोळ्यात किंवा मनात साठवून ठेवायचे ते अगोदर तो मोबाईल काढतो, फोटो किंवा सेल्फी घेतो,  आणि तो लगेच इतरांपर्यंत स्वतःच्या स्टेटस मार्फत पोहोचवतो. याचा त्याला फार मोठेपण वाटतो.. असो. कालाय तसमे नमः . प्रवासात पावसाने देखील हजेरी लावली. मुन्नार पर्यंतच्या रस्त्यात अनेक ठिकाणी घाट,  वळणे चढ-उतार भरपूर आहेत. पावसाची कमतरता होती ती देखील त्याने भरून काढली. मुन्नारच्या अगोदरच  दहा-बारा किलोमीटर  अलीकडे घाटामध्ये डोंगर उतारावर हॉटेल टी कॅसल येथे आमचा मुक्काम होता. दिवसभराचा त्रिशूर ते मुन्नार असा जवळपास 160 किलोमीटरचा प्रवास करून सर्वच थकले होते. जेवण करून लगेच सर्व झोपण्यास गेले . जेवण अर्थातच अतिशय लाजवाब होते...

टिप्पण्या

  1. खूपच सुंदर वर्णन. धन्यवाद सर यात्रा करवल्याबद्दल लेखन खूप छान.

    उत्तर द्याहटवा
  2. सर माझी प्रवास वर्णने (लेखक आठ वत नाही) वाचलय का? त्याच दर्जाचं लिखाण. काहीशी शैलीही तीच.. डोळ्यांसमोर चित्र उभ राहत. धन्यवाद! यासाठी की आम्हालाही सफर घडऊन आणली

    उत्तर द्याहटवा
  3. खूप खूप छान🙏🙏🌹🌹💐💐👍👍
    [काय हो केरळची आठवण येते का👌👍

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

1. आमची श्री जगन्नाथ पुरी यात्रा

2. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - , कोणार्क

4. श्री जगन्नाथ पुरी यात्रा - गंगासागर