10. आमची दक्षिण भारत यात्रा - दिवस दहावा दि 16/10/22*
आमची दक्षिण भारत यात्रा दिवस दहावा - दि 16/10/22
यात्रेचा शेवट
आजचा यात्रेचा अखेरचा दिवस. हा परतीच्या प्रवासाचा दिवस खूप लवकर आला, इतक्या लवकर दहा दिवसांचा प्रवास संपला याच्यावर विश्वासच बसत नव्हता. सर्वांच्या सहवासात दहा दिवस कसे सरले हे कोणालाही कळले नाही. सर्व समवयस्क असल्यामुळे एकमेकांना सांभाळून घेणे, एकमेकांची काळजी घेणे या गुणवैशिष्ट्यांमुळे आपसात कोणताही दुरावा किंवा कोणतीही रुष्टता, नाराजी न येता प्रवास अतिशय छान पार पडला.
त्याचा उत्तरार्ध म्हणजे आजचा परतीचा प्रवास. सकाळी आठ वाजता मदुराई येथून मुंबईचे विमान असल्यामुळे आम्ही लवकर उठून आमच्या दहा दिवसाच्या यात्रेच्या कुशल सारथ्याचा सत्कार केला. त्याला प्रेमाची भेट दिली . अतिशय सुरक्षित आणि कौशल्यपूर्ण ड्रायव्हिंग, अतिशय शांत व प्रेमळ व्यक्तिमत्व असलेला हा आमचा रिजिल भैया. त्याच्यामुळेच आमची ही दहा दिवसाची यात्रा निर्विघ्नपणे पार पडू शकली.
साडेसहाला विमानतळावर पोहोचलो. माझ्यासह अजून तीन ते चार जणांचा हा पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे अतिशय उत्सुकता व कुतूहल होते. चेक इन चे सर्व सोपस्कार पार पडले आणि एकदाचे आम्ही गॅलरीत येऊन बसलो. थोड्याच वेळात विमानाचे आगमन झाले आणि आमची पळापळ सुरू झाली. या दरम्यान नरेश बोरसेचा एक बोर्डिंग पास सापडेनासा झाल्याने एकदम पोटात गोळा आला, पण नशिबाने चेक इन काउंटर वर तो मिळून आला. एक एक जोडी करून सर्व विमानात पोहोचलो. अवाढव्य असे धूड. अनेक जण आमच्यासारखे नवखे, तर अनेक जण सराईत. सुदैवाने आमच्या प्रत्येक जोडीला एक विंडो सीट मिळाली होती. थोड्याच वेळात आमच्या या बू ssssम ने मुंबईकडे झेप घेतली. टेक ऑफ करताना पोटात गोळा आला पण पहिलटकरणी सारख्या पोटातील कळा सहन करत आम्ही पहिल्या उड्डाणाचा आनंद घेतला. विमान हळूहळू आकाशात झेपावले, ढगात शिरले आणि वाऱ्यावर स्वार झाले. थोड्याच वेळात बाहेरची मजा घेता घेता आम्ही देखील या वातावरणाशी समरस होऊन गेलो. या आधी भरपूर ऐकलेले असल्यामुळे हवाई सुंदरींची धावपळ बघत, काय काय फुकट देतात याची वाट बघत होतो. अखेर त्या आल्या आणि त्यांनी प्रत्येकाला नाष्टा व कॉफी किंवा थंड पेय दिले. त्याचा आस्वाद घेता घेता मुंबई जवळ आली आणि वरून समुद्र व मुंबईच्या इमारती दिसू लागल्या. क्षणात विमान खाली झोपवले आणि आवाज करत करत विमानतळावर थांबले. सर्व सोपस्कार करून बाहेर आलो. या रीतीने पहिलाच विमान प्रवास संस्मरणीय ठरला. विमानतळावरूनच परतीच्या प्रवासासाठी गाड्यांची सोय केलेली असल्यामुळे, लगेच 4 गाड्यांमध्ये बसलो आणि नाशिकच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
अशा प्रकारे सहा तारखेला रात्री नासिक रोड वरून रेल्वेने सुरू झालेला प्रवास हा आज 16 तारखेला मुंबईहून नाशिकच्या दिशेने खाजगी गाडीने प्रवास करीत संपन्न झाला. अतिशय संस्मरणीय आणि आनंदी अशा अजून एका यात्रेचा हा समारोप आहे. दहा दिवसात सर्वांचे एकमेकांशी झालेले जवळीकीचे संबंध, आपसात निर्माण झालेला ऋणानुबंध - पहिल्या दोन दिवस एकमेकींना अहोजाहो करणाऱ्या महिला, चार-पाच दिवसातच एकमेकीला एकेरी नावाने संबोधू लागल्या, यातच सर्व काही आले. जातांना सर्वांच्याच मनात कालवा कालवा होत होती. दहा दिवसाची साथ आता सोडायची होती, परत आपल्या आपल्या कामधंद्याला सुरुवात करायची होती. हे दहा दिवस आमच्या सर्वांच्या आयुष्यात अतिशय चांगली ऊर्जा व बदल देऊन गेले. यात्रेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्धल मातोश्री व सूर्यवंशी काकांचे विशेष आभार मानत, पुन्हा एकदा मातोश्रीसह नवीन प्रवासाच्या निमित्ताने भेटण्याच्या आणाभाका घेत सर्वांनी जड अंतकरणाने एकमेकाचा निरोप घेतला.
🙏🙏🙏
खूपच छान सर
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवा